Site icon Ajinkya Innovations

Constitution अनुच्छेद १०८ : विवक्षित प्रकरणी दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १०८ :
विवक्षित प्रकरणी दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक :
(१) जर एखादे विधेयक एका सभागृहाने पारित करून दुसऱ्या सभागृहाकडे पाठवल्यानंतर,—–
(क) ते विधेयक दुसऱ्या सभागृहाने फेटाळले तर ; किंवा
(ख) विधेयकात करावयाच्या सुधारणेसंबंधी दोन्ही सभागृहांचा अखेर मतभेद झाला असेल तर ; किंवा
(ग) दुसऱ्या सभागृहाला विधेयक मिळाल्याच्या दिनांकापासून ते विधेयक त्यांच्याकडून पारित न होता सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला तर,लोकसभेचे विसर्जन झाल्या कारणाने विधेयक व्यपगत झाले नसेल तर, विधेयकावर विचारविमर्श करण्याच्या व त्यावर मतदान करण्याच्या प्रयोजनार्थ, एक संयुक्त बैठक भरवण्यास सभागृहांना अभिनिमंत्रित करण्याचा आपला उद्देश राष्ट्रपती, सभागृहांची बैठक चालू असल्यास संदेशाद्वारे, किंवा बैठक चालू नसल्यास जाहीर अधिसूचनेद्वारे, त्यांना अधिसूचित करू शकेल :
परंतु असे की, या खंडातील कोणतीही गोष्ट, धन विधेयकास लागू असणार नाही.
(२) खंड (१) मध्ये निर्देशिलेला असा सहा महिन्यांचा कोणताही कालावधी मोजताना त्यामध्ये, ज्या कालावधीत त्या खंडाच्या उपखंड (ग) मध्ये निर्देशिलेल्या सभागृहाची सत्रसमाप्ती झालेली असेल किंवा लागोपाठ चारहून अधिक दिवस ते तहकूब झाले असेल, असा कोणताही कालावधी हिशेबात घेतला जाणार नाही.
(३) राष्ट्रपतीने खंड (१) अन्वये सभागृहांना संयुक्त बैठक भरवण्यास अभिनिमंत्रित करण्याचा आपला उद्देश अधिसूचित केला असेल तर, कोणतेही सभागृह त्या विधेयकाचे काम पुढे चालवणार नाही, पण, राष्ट्रपती, त्याने अधिसूचित केल्याच्या दिनांकानंतर केव्हाही, त्याने त्यात विनिर्दिष्ट केलेल्या प्रयोजनाकरता संयुक्त बैठक भरवण्यास सभागृहांना अभिनिमंत्रित करू शकेल व त्याने तसे केल्यास सभागृहे तद्नुसार बैठक भरवतील.
(४) जर, या दोन सभागृहांच्या संयुक्त बैठकीत संमत झालेल्या असतील अशा काही सुधारणा असल्यास, त्या सुधारणांसह ते विधेयक, दोन्ही सभागृहांच्या उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या बहुमताने पारित झाले तर, या संविधानाच्या प्रयोजनार्थ, ते दोन्ही सभागृहांनी पारित केले असल्याचे मानले जाईल:
परंतु असे की, संयुक्त बैठकीत—–
(क) ते विधेयक एका सभागृहाकडून पारित झालेले असून दुसऱ्या सभागृहांकडून सुधारणांसह पारित झालेले नसेल आणि जेथे त्याचा प्रारंभ झाला त्या सभागृहाकडे परत पाठवण्यात आले नसेल तर, विधेयक पारित होण्याकरता झालेल्या विलंबामुळे विधेयकात ज्या सुधारणा करणे आवश्यक झाले असेल अशा काही सुधारणा असल्यास, त्याहून अन्य कोणतीही सुधारणा विधेयकाला प्रस्तावित केली जाणार नाही ;
(ख) जर ते विधेयक याप्रमाणे पारित होऊन परत पाठवले गेले असेल तर, विधेयकात केवळ पूर्वोक्त अशाच सुधारणा व ज्यांच्याबाबत सभागृहांचे मतैक्य झाले नसेल अशा बाबींशी संबद्ध अशा अन्य सुधारणा प्रस्तावित केल्या जातील ;
आणि या खंडाअन्वये कोणत्या सुधारणा ग्राह्य आहेत त्यासंबंधी, अध्यक्षस्थानी असलेल्या व्यक्तीचा निर्णय अंतिम असेल.
(५) संयुक्त बैठक भरवण्याकरता सभागृहांना अभिनिमंत्रित करण्याचा आपला उद्देश राष्ट्रपतीने अधिसूचित केल्यानंतर, मध्यंतरी लोकसभेचे विसर्जन झाले असेल तरीही, या अनुच्छेदाअन्वये संयुक्त बैठक भरवता येईल आणि तीत विधेयक पारित करता येईल.

Exit mobile version