Constitution सातवी अनुसूची : (अनुच्छेद २४६)

भारताचे संविधान ( राज्यघटना )
सातवी अनुसूची :
(अनुच्छेद २४६)
सूची एक – संघ सूची :
१) भारत व त्याचा प्रत्येक भाग यांचे संरक्षण – संरक्षणाची सिद्धता आणि युद्धकाळात युद्ध चालू ठेवण्यास व ते संपल्यानंतर परिणामकारकपणे सेनाविसर्जन करण्यास साधक होतील अशा सर्व कृती यांसह.
२) नौसेना, भूसेना व वायुसेना; संघराज्याची अन्य कोणतीही सशस्त्र सेना.
१.(२क) संघराज्याची कोणतीही सशस्त्र सेना किंवा संघराज्याच्या नियंत्रणाधीन असणारी अन्य कोणतीही सेना किंवा तिची कोणतीही तुकडी किंवा पथक, कोणत्याही राज्यामध्ये मुलकी सत्तेच्या सहाय्यार्थ प्रतियोजित करणे; याप्रमाणे प्रतियोजन केलेले असतानाच्या काळातील अशा सेनेच्या सदस्यांचे अधिकार, अधिकारिता, विशेषाधिकार आणि दायित्वे.)
३) छावणी क्षेत्रांचे परिसीमन, अशा क्षेत्रांतील स्थानिक स्वराज्य संस्था, छावणी प्राधिकरण घटित करणे व अशा क्षेत्रांतील त्यांचे अधिकार आणि अशा क्षेत्रांतील निवासव्यवस्थेचे (भाडेनियंत्रणासह) विनियमन.
४) नौसैनिकी, भूसैनिकी व वायुसैनिकी कामे.
५) शस्त्रे, अग्निशस्त्रे, दारुगोळा आणि स्फोटक पदार्थ.
६) अणुऊर्जा व तिच्या उत्पादनास आवश्यक असलेली खनिज साधनसंपत्ती.
७) संसदेने कायद्याद्वारे संरक्षणाच्या प्रयोजनार्थ किंवा युद्ध चालू ठेवण्याकरता आवश्यक असल्याचे घोषित केलेले उद्योगधंदे.
८) केंद्रीय गुप्तवार्ता व अन्वेषण केंद्र.
९) संरक्षण, परराष्ट्र व्यवहार किंवा भारताची सुरक्षितता यांच्याशी संबंधित कारणांकरता प्रतिबंधक स्थानबद्धता; अशा स्थानबद्धतेत ठेवलेल्या व्यक्ती.
१०) परराष्ट्र व्यवहार ; ज्यांमुळे संघराज्याचा कोणताही परकीय देशाशी संबंध येतो अशा सर्व बाबी.
११) राजदौतिक, वाणिज्यदौतिक व व्यापारी प्रतिनिधित्व.
१२) संयुक्त राष्ट्र संघटना.
१३) आंतरराष्ट्रीय परिषदा, अधिसंघ व अन्य निकाय यामध्ये सहभागी होणे आणि तेथे झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे.
१४) परदेशांशी तह व करार करणे आणि परदेशांशी केलेले तह, करार व अभिसंधी यांची अंमलबजावणी करणे.
१५) युद्ध व शांतता.
१६) विदेशविषयक अधिकारिता.
१७) नागरिकत्व, नागरिकीकरण व अन्यदेशीय व्यक्ती.
१८) प्रत्यर्पण.
१९) भारतात प्रवेश देणे आणि तेथून उत्प्रवासन व निर्यापन; पारपत्रे व प्रवेशपत्रे.
२०) भारताबाहेरील स्थळांच्या तीर्थयात्रा.
२१) खुल्या सागरात किंवा हवेत केलेली चाचेगिरी व गुन्हे ; भूमीवर किंवा खुल्या सागरात किंवा हवेत राष्ट्रीय कायद्यांच्या विरुद्ध केलेले अपराध.
२२) रेल्वे.
२३) संसदेने केलेल्या कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये राष्ट्रीय महामार्ग असल्याचे घोषित केलेले महामार्ग.
२४) यत्रचालित जलयानांसंबंधी संसदेने कायद्याद्वारे राष्ट्रीय जलमार्ग असल्याचे घोषित केलेल्या देशांतर्गत जलमार्गांवरील नौपरिवहन व नौकानयन ; अशा जलमार्गांवरील पथनियम.
२५) सागरी नौपरिवहन व नौकानयन-भरती-ओहोटीच्या पाण्यावरील नौपरिवहन व नौकानयन यांसह; व्यापारी नाविकांच्या शिक्षणाची व प्रशिक्षणाची सोय आणि राज्ये व अन्य संस्था यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचे व प्रशिक्षणांचे विनियमन.
२६) दीपगृहे – प्रकाशनौका, संकतदीप आणि नौका व विमाने यांच्या सुरक्षिततेकरिता अन्य तरतुदी यांसह.
२७) संसदेने केलेला कायदा किंवा विद्यमान कायदा याद्वारे किंवा त्याअन्वये मोठी बंदरे असल्याचे घोषित केलेली बंदरे-त्यांच्या परिसीमनासह, आणि त्यांतील बंदर प्राधिकरणे घटित करणे व त्यांचे अधिकार.
२८) बंदरावरील पृथक्वास – त्याच्याशी संलग्न असलेली रुग्णालये यांसह, खलाशंची व सागरी रुग्णालये.
२९) हवाईमार्ग, विमाने व हवाई नौकानयन, विमानतळांची सोय, हवाई वाहतूक व विमानतळ यांचे विनियमन व संघटन; विमानसेवेच्या शिक्षणाची व प्रशिक्षणाची सोय आणि राज्ये अन्य संस्था यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचे व प्रशिक्षणाचे विनियमन.
३०) रेल्वेमार्ग, समुद्रमार्ग किंवा हवाईमार्ग याद्वारे किंवा यंत्रचालित जलयानांमधून राष्ट्रीय जलमार्गांनी उतारुंची व मालाची ने-आण.
३१) डाक व तार; दूरध्वनी, बिनतारी यत्रे, प्रसारण व अन्य तत्सम स्वरुपाची दळणवळण साधने.
३२) संघराज्याची मालमत्ता व तिच्यापासून मिळणारा महसूल, पण २.(***) राज्यात असलेल्या मालमत्तेसंबंधात, त्या राज्याच्या विधिविधानाच्या अधीन राहून संसद कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करील तेवढी मर्यादा खेरीजकरुन.
३.(***)
३४) भारतीय संस्थानांच्या अधिपतींच्या संपदांकरता पाल्याधिकरणे.
३५) संघराज्याचे लोकऋण.
३६) चलन, नाणेयोजना आणि वैध निविदा ; परकीय चलन.
३७) विदेशी कर्जे.
३८) भारतीय रिझव्र्ह बँक.
३९) डाकघर बचत बँक.
४०) भारत सरकारने किंवा राज्य शासनाने आयोजित केलेल्या लॉटरी.
४१) परदेशांशी व्यापार व वाणिज्य; सीमाशुल्क सरहद्दींवरुन आयात व निर्यात ;
४२) आंतरराज्यीय व्यापार व वाणिज्य.
४३) बँक व्यवसायी, विमा व्यवसायी व वित्तीय निगम यांसह व्यापारी निगमांचे विधिसंस्थापन, विनियमन व परिसमापन-पण यात सहकारी सोसायट्यांचा समावेश नाही.
४४) ज्यांची उद्दिष्टे एका राज्यापुरती मर्यादित नाहीत अशा निगमांचे-मग ते व्यापारी असोत व नसोत-विधिसंस्थापन, विनियमन व परिसमापन-पण यामध्ये विद्यापीठांचा समावेश नाही.
४५) बँक व्यवसाय.
४६) विनिमयपत्रे, धनादेश, वचनचिठ्ठ्या व अन्य तत्सम संलेख.
४७) विमा.
४८) रोखे-बाजार व वायदे-बाजार.
४९) पेटंटस्, नवशोध व संकल्पचित्रे, कॉपीराइट; व्यापारचिन्हे व पण्यचिन्हे.
५०) वचने व मापे यांची मानके प्रस्थापित करणे.
५१) भारतातून निर्यात करावयाच्या किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहतूक करावयाच्या मालाच्या प्रतीची मानके प्रस्थापित करणे.
५२) ज्यांचे नियंत्रण सार्वजनिक हितार्थ संघराज्याकडून होणे समयोचित आहे, असे संसदेने कायद्याद्वारे घोषित केले असेल ते उद्योगधंदे.
५३) तेलक्षेत्रे व खनिज तेलाची साधनसंपत्ती यांचे विनियमन व विकास; पेटड्ढोलियम व पेटड्ढोलियम उत्पादने; संसदेने कायद्याद्वारे भयंकर ज्वालाग्राही असल्याचे घोषित केलेले अन्य द्रव पदार्थ व घन पदार्थ.
५४) खाणीचे विनियमन व खनिज विकास हा जितक्या व्याप्तीपर्यंत सार्वजनिक हितार्थ संघराज्याच्या नियंत्रणाखाली असणे समयोचित आहे. असे संसदेने कायद्याद्वारे घोषित केले असेल तेथवर असे विनियमन व विकास.
५५) खाणीतील व तेलक्षेत्रातील श्रमिकांचे विनियमन व सुरक्षितता.
५६) आंतरराज्यीय नद्या व नद्यांची खोरी विनियमन व विकास ज्या व्याप्तीपर्यंत सार्वजनिक हितार्थ संघराज्याच्या नियंत्रणाखाली असणे समयोचित आहे, असे संसदेने कायद्याद्वारे घोषित केले असेल तेथवर, असे विनियमन व विकास.
५७) क्षेत्रीय जलधीच्या पलीकडील मासेमारी व मत्स्यक्षेत्रे.
५८) संघीय यंत्रणाच्या द्वारे मीठाचे उत्पादन, पुरवठा व वितरण; अन्य यंत्रणाच्या द्वारे होणारे मीठाचे उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन व नियंत्रण.
५९) निर्यातीसाठी अफूची लागवड, निर्मिती व विक्री.
६०) चलचित्रपटांना प्रदर्शनार्थ मंजुरी देणे.
६१) संघराज्याच्या कर्मचाऱ्यांच्या संबंधातील औद्योगिक विवाद.
६२) या संविधानाच्या प्रारंभी, राष्ट्रीय ग्रंथालय, भारतीय संग्रहालय, इम्पिरिअल युद्ध संग्रहालय, व्हिक्टोरिया स्मारक व भारतीय युद्ध स्मारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्था आणि भारत सरकारकडून संपूर्णत: किंवा अंशत: जिला वित्तपुरवठा केला जातो अशी व संसदेने कायद्याद्वारे राष्ट्रीय महत्वाची संस्था म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही तत्सम संस्था.
६३) या संविधानाच्या प्रारंभी, बनारस qहदू विद्यापीठ, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ व ४.(दिल्ली विद्यापीठ; अनुच्छेद ३७१ङ अनुसार स्थापन केलेले विद्यापीठ;) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्था आणि संसदेने कायद्याद्वारे राष्ट्रीय महत्वाची संस्था म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही संस्था.
६४) भारत सरकारकडून संपूर्णत: किंवा अंशत: ज्यांना वित्तपुरवठा केला जातो अशा व संसदेने कायद्याद्वारे राष्ट्रीय महत्वाच्या संस्था म्हणून घोषित केलेल्या वैज्ञानिक किंवा तांत्रिक शिक्षणाच्या संस्था.
६५) (क) व्यवसायविषयक, व्यावसायिक किंवा तांत्रिक प्रशिक्षण – पोलीस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण यासह, किंवा
ख) विशेष अभ्यास किंवा संशोधन यांचे प्रवर्धन ; किंवा
ग) गुन्ह्याचे अन्वेषण किंवा तपास करण्याच्या कामी वैज्ञानिक किंवा तांत्रिक सहाय्य. यासाठी केंद्रीय अभिकरणे व संस्था.
६६) उच्च शिक्षणाच्या किंवा संशोधनाच्या संस्था आणि वैज्ञानिक व तांत्रिक संस्था यांमधील समन्वयन व दर्जाचे निर्धारण.
६७) ५.(संसदेने केलेल्या कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये) राष्ट्रीय महत्वाची म्हणून घोषित केलेली प्राचीन व ऐतिहासिक स्मारकशिल्पे व अभिलेख, आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष.
६८) भारताचे सर्वेक्षण, भारताची भूशास्त्रीय, वनस्पतिशास्त्रीय, प्राणिशास्त्रीय आणि मानवशास्त्रीय सर्वेक्षण; हवामानशास्त्रीय संघटना.
६९) जनगणना.
७०) संघ लोकसेवा; आखिल भारतीय सेवा; संघ लोकसेवा आयोग.
७१) संघीय पेन्शने म्हणजे, भारत सरकारकडून किंवा भारताच्या एकत्रित निधीतून प्रदेय असलेली पेन्शने.
७२) संसदेच्या, राज्याच्या विधानमंडळाच्या आणि राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या पदांच्या निवडणुका; निवडणूक आयोग.
७३) संसदेचे सदस्य, राज्यसभेचा सभापती व उप सभापती आणि लोकसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे वेतन व भत्ते.
७४) संसदेचे प्रत्येक सभागृह आणि प्रत्येक सभागृहाचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेषाधिकार व उन्मुक्ती ; संसदेच्या समित्यांपुढे किंवा संसदेने नियुक्त केलेल्या आयोगापुढे साक्ष देण्यासाठी किंवा दस्तऐवज दाखल करण्यासाठी व्यक्तींना उपस्थित राहण्यास भाग पाडणे.
७५) राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या वित्तलब्धी, भत्ते, विशेषाधिकार व अनुपस्थिति-रजेसंबंधीचे अधिकार ; संघराज्याच्या मंत्र्यांचे वेतन व भत्ते ; नियंत्रक व महा लेखापरीक्षक यांचे वेतन, भत्ते व अनुपस्थिति-रजेसंबंधीचे अधिकार आणि अन्य सेवाशर्ती.
७६) संघराज्याच्या व राज्यांच्या लेख्यांची लेखापरीक्षा.
७७) सर्वोच्च न्यायालय घटित करणे, त्याची रचना, अधिकारिता व अधिकार (अशा न्यायालयाच्या अवमानासंबंधीच्या अधिकारांसह) आणि त्यात घेतल्या जाणाऱ्या फी ; सर्वोच्च न्यायालयात व्यवसाय करण्यास हक्कदार असलेल्या व्यक्ती.
७८) उच्च न्यायालयांचे अधिकारी व कर्मचारी यांबाबतच्या तरतुदी खेरीजकरुन उच्च न्यायालये घटित करणे व त्याची रचना ६.(दीर्घ सुट्यांचा काळ धरुन); उच्च न्यायालयात व्यवसाय करण्यास हक्कदार असलेल्या व्यक्ती.
७.(७९) एखाद्या उच्च न्यायालयाची अधिकारिता कोणत्याही संघ राज्यक्षेत्रावर विस्तारित करणष व त्यापासून त्या अधिकारितेचे वर्जन करणे.)
८०) कोणत्याही राज्याच्या पोलीस दलांच्या सदस्यांचे अधिकार व अधिकारिता त्या राज्याबाहेरील कोणत्याही क्षेत्रावर विस्तारित करणे पण ज्यायोगे एका राज्याच्या पोलीस दलाला त्या राज्याबाहेरील कोणत्याही क्षेत्रात, ज्या राज्यात ते क्षेत्र असेल त्यांच्या शासनाच्या अनुमतीशिवाय अधिकाराचा व अधिकारितेचा वापर करणे शक्य होईल अशा प्रकारे नव्हे, कोणत्याही राज्याच्या पोलीस दलाच्या सदस्यांचे अधिकार व अधिकारिता त्या राज्याबाहेरील रेल्वे क्षेत्रांवर विस्तारित करणे.
८१) आंतरराज्यीय स्थलांतर, आंतरराज्यीय पृथक्वास.
८२) कृषि-उत्पन्नाव्यतिरिक्त अन्य उत्पन्नावरील कर.
८३) निर्यात शुल्कांसह सीमा शुल्के.
८.(८४) भारतात निर्मिलेल्या किंवा उत्पादिलेल्या पुढील वस्तूंवरील उत्पादन शुल्क :-
क) पेट्रोलियम क्रूड;
ख) हाय स्पीड डिझेल;
ग) मोटर स्पिरिट (सामान्यत: पेट्रोल म्हणून ओळखले जाणारे);
घ) नैसर्गिक वायू;
ङ) विमानचालन टर्बाइन इंधन;
च) तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादने;)
८५) निगम कर.
८६) व्यक्ती व कंपन्या यांच्या मत्तेच्या – शेतजमिनी वगळून – भांडवली मूल्यावरील कर, कंपन्यांच्या भांडवलांवरील कर.
८७) शेतजमिनीहून अन्य मालमत्तेच्या संबंधातील संपदा शुल्क.
८८) शेतजमिनीहून अन्य मालमत्तेच्या उत्तराधिकाराच्या संबंधातील शुल्के.
८९) रेल्वेमार्ग, समुद्रमार्ग किंवा हवाईमार्ग यांद्वारे ने-आण केल्या जाणाऱ्या मालावरील किंवा उतारुंवरील सीमा कर; रेल्वे भाडी व वाहणावळी यांवरील कर.
९०) रोखे-बाजार व वायदे-बाजार यांमधील संव्यवहारांवरील मुद्रांक शुल्कांव्यतिरिक्त अन्य कर.
९१) विनिमयपत्रे, धनादेश, वचनचिठ्ठ्या, भरणपत्रे, पतपत्रे, विमापत्रे, शेअर्सचे हस्तांतरण, ऋणपत्रे, प्रतिपत्रे व पावत्या यांच्या संबंधातील मुद्रांक शुल्कांचे दर.
९.(९२) ***)
१०.(९२क) वृत्तपत्राव्यतिरिक्त अन्य मालाची विक्री किंवा खरेदी, जेथे आंतरराज्यीय व्यापार किंवा वाणिज्यव्यवहार यांच्या ओघात घडते तेथे, अशी विक्री किंवा खरेदी यांवरील कर.)
११.(९२ख) आंतरराज्यीय व्यापार किंवा वाणिज्यव्यवहार यांच्या ओघात, मालाची पाठवरी करण्यात आली असेल तर, अशा मालाच्या पाठवणीवरील कर (मग असा माल तो पाठवणाऱ्या व्यक्तीकडेच पाठवण्यात आला असो वा अन्य कोणत्याही व्यक्तीकडे पाठवण्यात आला असो).
१२.(९२ग) *** )
९३) या सूचीत असलेल्या बाबींपैकी कोणत्याही बाबीसंबंधीच्या कायद्याविरुद्ध अपराध.
९४) या सूचीत असलेल्या बाबींपैकी कोणत्याही बाबींच्या प्रयोजनार्थ चौकशी, सर्वेक्षणे व आकडेवारी.
९५) या सूचीत असलेल्या बाबींपैकी कोणत्याही बाबींसंबंधी सर्वोच्च न्यायालय खेरीजकरुन सर्व न्यायालयांची अधिकारिता व त्यांचे अधिकार ; नाविक अधिकारिता.
९६) या सूचीत असलेल्यांपैकी कोणत्याही बाबीसंबंधातील फी, -पण यामध्ये कोणत्याही न्यायालयात घेतल्या जाणाऱ्या फीचा समावेश नाही.
९७) सूची दोन किंवा सूची तीन यामध्ये नमूद न केलेली अन्य कोणतीही बाब तसेच त्यांपैकी कोणत्याही सूचीत न उल्लेखिलेला कोणताही कर.
——–
१. संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम १९७६ याच्या कलम ५७ द्वारे ही नोंद समाविष्ट केली (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).
२. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम १९५६ याच्या कलम २९ व अनुसूची यांद्वारे पहिल्या अनुसूचीचा भाग क किंवा भाग ख यात विनिर्दिष्ट केलेल्या हा मजकूर गाळला.
३. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम १९५६ याच्या कलम २६ नोंद ३३ गाळली.
४. संविधान (बत्तिसावी सुधारणा) अधिनियम १९७३ याच्या कलम ४ द्वारे दिल्ली विद्यापीठ व याऐवजी हा मजकूर दाखल केला (१ जुलै १९७४ रोजी व तेव्हापासून).
५. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम १९५६ याच्या कलम २७ द्वारे संसदेने कायद्याद्वारे या मजकुराऐवजी दाखल केला.
६. संविधान (पंधरावी सुधारणा) अधिनियम १९६३ याच्या कलम १२ द्वारे समाविष्ट केला. (भूतलक्षी प्रभावासह).
७. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम १९५६ याच्या कलम २९ व अनुसूची याद्वारे नोंद ७९ ऐवजी दाखल केली.
८. संविधान (एकशे एकावी सुधारणा) अधिनियम २०१६ याच्या कलम १७ द्वारा (१६-१-२०१६ पासून) नोंद ८४ ऐवजी समाविष्ट केली.
९. संविधान (एकशे एकावी सुधारणा) अधिनियम २०१६ याच्या कलम १७ द्वारा (१६-१-२०१६ पासून) नोंद ९२ वगळण्यात आली.
१०. संविधान (सहावी सुधारणा) अधिनियम १९५६ याच्या कलम २ द्वारे ही नोंद समाविष्ट केली.
११. संविधान (शेहेचाळिसावी सुधारणा) अधिनियम १९८२ याच्या कलम ५ द्वारे ही नोंद समाविष्ट केली (२ फेब्रुवारी १९८३ रोजी व तेव्हापासून).
१२. संविधान (एकशे एकावी सुधारणा) अधिनियम २०१६ याच्या कलम १७ द्वारा (१६-१-२०१६ पासून) नोंद ९२ग वगळण्यात आली.

सूची दोन – राज्य सूची :
१) सार्वजनिक सुव्यवस्था (पण यात मुलकी सहाय्यार्थ १.(नौसेना, भूसेना किंवा वायुसेना अथवा संघराज्याची अन्य कोणतीही सशस्त्र सेना यांचा किंवा संघराज्याच्या नियंत्रणाधीन असणाऱ्या अन्य कोणत्याही सेनेचा किंवा तिची कोणतीही तुकडक्ष अगर पथक यांचा वापर समाविष्ट नाही).
२.(२) पोलीस (रेल्वे व ग्राम पोलीस यांसह)-सूची एक मधील नोंद क्रमांक २क च्या तरतुदींना अधीन.)
३) ३.(***) उच्च न्यायालयाचे अधिकारी व कर्मचारी, भाडे व महसूल न्यायालयांतील प्रक्रिया; सर्वोच्च न्यायालय खेरीजकरुन सर्व न्यायालयांत घेतली जाणारी फी.
४) कारागृहे, सुधारालये, बोस्र्टल संस्था व तत्सम स्वरुपाच्या अन्य संस्था आणि त्यात स्थानबद्ध केलेल्या व्यक्ती; कारागृहांच्या व अन्य संस्थांच्या वापराकरता अन्य राज्यांबरोबर व्यवस्था.
५) स्थानिक शासन म्हणजे महानगरपालिका, सुधारणा विश्वस्तमंडळे, जिल्हा मंडळे, खाण वसाहत प्राधिकरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ग्राम प्रशासन यांच्या प्रयोजनार्थ असेलेली अन्य स्थानिक प्राधिकरणे घटित करणे व त्यांचे अधिकार.
६) सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, रुग्णालये व दवाखाने.
७) भारताबाहेरील स्थळांच्या तीर्थयांत्राहून अन्य तीर्थयात्रा.
८) मादक दारु म्हणजे मादक दारुचे उत्पादन, निर्मिती, कब्जा, वाहतूक, खरेदी व विक्री.
९) नि:समर्थ व निकामी असलेल्यांना सहाय्य.
१०) दफन व दफनभूमी ; दहन व दहनभूमी.
४.(११) ***)
१२) राज्याच्या नियंत्रणाखाली असलेली किंवा त्याच्याकडून ज्यांना वित्तपुरवठा केला जातो अशी ग्रंथालये, संग्रहालये व अन्य तत्सम संस्था, ५.(संसदेने केलेल्या कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये) राष्ट्रीय महत्वाची म्हणून घोषित केलेल्यांहून अन्य प्राचीन व ऐतिहासिक स्मारकशिल्पे व अभिलेख.
१३) दळणवळण म्हणजे, सडका, पूल, तरी व सूची एकमध्ये विनिर्दिष्ट न केलेली अन्य दळणवळणाची साधने; नगरपालिका टड्ढाममार्ग ; रज्जुमार्ग; देशांतर्गत जलमार्ग व त्यांवरील वाहतूक, अशा जलमार्गासंबंधी सूची एक व सूची तीनमध्ये असलेल्या तरतुदींना अधीन राहून; यंत्रचालित वाहनांहून अन्य वाहने.
१४) कृषि, कृषिविषयक शिक्षण व संशोधन, उपद्रवी जीवजंतूपासून संरक्षण व वनस्पतिरोगांस प्रतिबंध यांसह.
१५) पशुधनाचे जतन, संरक्षण व सुधारणा आणि पशुरोगांस प्रतिबंध, पशुवैद्यकीय प्रशिक्षण व व्यवसाय.
१६) कोंडवाडे व पशु-अतिचारास प्रतिबंध.
१७) पाणी म्हणजे, सूची एकमधील नोंद ५६ च्या तरतुदींना अधीन राहून पाणीपुरवठा, जलसिंचन व कालवे, जलनिस्सारण व बंधारे, पाण्याची साठवण व जलशक्ती.
१८) जमीन म्हणजे, जमिनीतील किंवा तिच्यावरील हक्क, जमीन मालक व कूळ यांच्या संबंधासह भूधृती आणि खंडांची वसुली; शेतजमिनीचे हस्तांतरण व अन्यसंक्रामण; जमीन सुधारणा व कृषिविषयक कर्जे; वसाहतीकरण.
६.(१९) ***
२०) ***)
२१) मत्स्यव्यवसाय
२२) पाल्याधिकरणे, सूची एकमधील नोंद ३४ च्या तरतुदींना अधीन राहून ; भारग्रस्त व जप्त केलेल्या संपदा.
२३) खाणींचे विनियमन व खनिज विकास-सूची एकमधील संखराज्याच्या नियंत्रणाखाली होणारे विनियमन व विकास यासंबंधीच्या तरतुदींना अधीन राहून.
२४) उद्योगधंदे, सूची एकमधील ७.(७ व ५२ या नोंदीच्या) तरतुदींना अधीन राहून.
२५) गॅस व गॅस -कार्य.
२६) राज्यातील व्यापार व वाणिज्यव्यवहार – सूची तीनमधील नोंद ३३ च्या तरतुदींना अधीन राहून.
२७) मालाचे उत्पादन, पुरवठा व वितरण – सूची तीनमधील नोंद ३३ च्या तरतुदींना अधीन राहून.
२८) बाजार व जत्रा.
८.(२९) ***)
३०) सावकारी व सावकार; शेतकऱ्यांची कर्जबाजारीपणातून मुक्तता.
३१) पांथगृहे व पांथगृहपाल.
३२) सूची एकमध्ये विनिर्दिष्ट केलेल्यांहून अन्य निगमांचे व विद्यापीठांचे विधिसंस्थापन, विनियमन व समापन; विधिसंस्थापित नसलेल्या अशा व्यापारी, वाङ्मयीन, वैज्ञानिक, धार्मिक व अन्य संस्था व अधिसंघ; सहकारी सोसायट्या.
३३) नाट्यगृहे व नाट्यप्रयोग, चित्रपट-सूची एकमधील नोंद ६० च्या तरतुदींना अधीन राहून; क्रीडा, करमणूक व मनोरंजन.
३४) पैज लावणे व जुगार खेळणे.
३५) राज्याच्या ठायी निहित असेलेली किंवा त्यांच्या कब्जातील बांधकामे, जमिनी व इमारती.
९.(३६) ***)
३७) राज्य विधानमंडळाच्या निवडणुका – संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून.
३८) राज्य विधानमंडळाचे सदस्य, विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि जेथे विधानपरिषद असेल तेथे तिचा सभापती व उप सभापती यांचे वेतन व भत्ते.
३९) विधानसभा आणि तिचे सदस्य व समित्या आणि जेथे विधानपरिषद असेल तेथे, ती परिषद आणि तिचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेषाधिकार व उन्मुक्ती; राज्याच्या विधानमंडळाच्या समित्यांपुढे साक्ष देण्याकरिता किंवा दस्तऐवज दाखल करण्याकरिता व्यक्तींना उपस्थित राहण्यास भाग पाडणे.
४०) राज्याच्या मंत्र्यांचे वेतन व भत्ते.
४१) राज्य लोकसेवा; राज्य लोकसेवा आयोग.
४२) राज्य पेन्शने, म्हणजे राज्याकडून किंवा राज्याच्या एकत्रित निधीतून प्रदेय असलेली पेन्शने.
४३) राज्याचे लोकऋण.
४४) निखात निधी.
४५) जमीन महसूल – महसुलाची आकारणी व वसुली व भूमिअभिलेख ठेवणे, महसूली प्रयोजनांकरिता भूमापन व हक्कनोंदी आणि महसूलांचे अन्यसंक्रामण यांसह.
४६) कृषि उत्पन्नावरील कर.
४७) शेतजमिनीच्या उत्तराधिकारासंबंधी शुल्क.
४८) शेतजमिनीसंबंधी संपदा शुल्क.
४९) जमिनी व इमारती यांवरील कर.
५०) खनिज हक्कांवरील कर – खनिज विकासासंबंधीच्या कायद्याद्वारे संसदेने घातलेल्या कोणत्याही मर्यादांना अधीन राहून;
५१) राज्यात निर्मिलेल्या किंवा उत्पादिलेल्या अशा पुढील मालावरील उत्पादन शुल्के आणि भारतात इतरत्र निर्मिलेल्या किंवा उत्पादिलेल्या सदृश मालावरील त्याच दराची किंवा त्याहून कमी दराची प्रतिशुल्के :-
क) मानवी सेवनाकरता मद्यार्कयुक्त दारु;
ख) अफू, भारतीय भांग, अन्य अंमली औषधिद्रव्ये व अंमली पदार्थ;
पण मद्यार्काने किंवा या नोंदीच्या उपपरिच्छेद (ख) मध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही द्रव्याने युक्त असलेले औषधीय व प्रसाधन सिद्धपदार्थ सोडून.
१०.(५२) *** )
५३) विजेचा वापर किंवा विक्री यांवरील कर.
११.(५४) पेट्रोलियम क्रूड, हायस्पीड डिझेल, मोटार स्पिरिट (सामान्यत: पेट्रोल म्हणून ओळखले जाणारे), नैसर्गिक वायू, विमानचालन टर्बाइन इंधन व मानवी सेवनाकरिता असलेली मद्यार्कयुक्त दारु यांच्या विक्रीवरील कर, परंतु यामध्ये, अशा वस्तूंच्या, आंतरराज्यीय व्यापार किंवा वाणिज्य यांच्या ओघात केल्या जाणाऱ्या विक्रीचा अथवा आंतराष्ट्रीय व्यापार किंवा वाणिज्य यांच्या ओघात केल्या जाणाऱ्या विक्रीचा समावेश होत नाही.)
१२.(५५) ***)
५६) सडकेने किंवा देशांतर्गत जलमार्गांनी ने-आण केल्या जाणाऱ्या मालावरील किंवा उतारुंवरील कर.
५७) सडकांवर चालवण्यास योग्य अशा, यंत्रचालित असलेल्या वा नसलेल्या वाहनांवर-यात टड्ढामगाड्यांचा समावेश आहे – आकारण्यात येणारा कर, सूची तीनमधील नोंद ३५ च्या तरतुदींना अधीन राहून.
५८) प्राणी व नौका यांवरील कर.
५९) पथकर.
६०) व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील कर.
६१) डोईपट्टी.
१३.(६२) पंचायतीने किंवा नगरपालिकेने किंवा प्रादेशिक किंवा जिल्हा परिषदेने आकारलेल्या व वसूल केलेल्या मर्यादेत, करमणूक व मनोरंजन यांवरील कर)
६३) मुद्रांक शुल्काच्या दरांविषयी सूची एकमध्ये असलेल्या तरतुदींमध्ये विनिर्दिष्ट केलेल्यांहून अन्य दस्तऐवजांच्या संबंधातील मुद्रांक शुल्कांचे दर.
६४) या सूचीत असलेल्यापैकी कोणत्याही बाबीसंबंधीच्या कायद्यांविरुद्ध अपराध.
६५) या सूचीत असलेल्यांपैकी कोणत्याही बाबींसंबंधी, सर्वोच्च न्यायालय खेरीजकरुन अन्य सर्व न्यायालयांची अधिकारिता व त्यांचे अधिकार.
६६) या सूचीत असलेल्यांपैकी कोणत्याही बाबीसंबंधातील फी, – पण कोणत्याही न्यायालयात घेतल्या जाणाऱ्या फींचा त्यात समावेश नाही.
———
१. संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम १९७६ याच्या कलम ५७ द्वारे विवक्षित मजकुराऐवजी दाखल केले. (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).
२. संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम १९७६ याच्या कलम ५७ द्वारे नोंद २ ऐवजी दाखल केली (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).
३. संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम १९७६ याच्या कलम ५७ द्वारे विवक्षित मजकूर गाळला. (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).
४. संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम १९७६ याच्या कलम ५७ द्वारे नोंद ११ गाळली (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).
५. सविधान (सातवी सुधारणा) अधिनियम १९५६ याच्या कलम २६ द्वारे संसदेने कायद्याद्वारे घोषित केलेली या मजकुराऐवजी दाखल केला.
६. संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम १९७६ याच्या कलम ५७ द्वारे नोंदी १९ व २० गाळल्या (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).
७. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम १९५६ याच्या कलम २८ द्वारे मूळ मजकूराऐवजी दाखल केले.
८. संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम १९७६ याच्या कलम ५७ द्वारे नोंद २९ गाळली (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).
९. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम १९५६ याच्या कलम २६ द्वारे नोंद ३६ गाळली.
१०. संविधान (एकशे एकावी सुधारणा) अधिनियम २०१६ याच्या कलम १७ द्वारा (१६-९-२०१६ पासून) नोंद ५२ गाळण्यात आली.
११. संविधान (सहावी सुधारणा) अधिनियम १९५६ याच्या कलम २ द्वारे नोंद ५४ ऐवजी दाखल केली पुन्हा (एकशे एकावी सुधारणा) अधिनियम २०१६ याच्या कलम १७ द्वारा (१६-९-२०१६ पासून) मूळ मजकुराऐवजी दाखले केली.
१२. संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम १९७६ याच्या कलम ५७ द्वारे समाविष्ट केला (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).
१३. संविधान (एकशे एकावी सुधारणा) अधिनियम २०१६ याच्या कलम १७ द्वारा (१६-९-२०१६ पासून) नोंद ६२ याऐवजी समाविष्ट करण्यात आली.

सूची तीन – समवर्ती सूची :
१) फौजदारी कायदा, या संविधानाच्या प्रारंभी भारतीय दंड संहितेत समाविष्ट असलेल्या सर्व बाबींसह, पण सूची एक किंवा सूची दोन यामध्ये विनिर्दिष्ट केलेल्यांपैकी कोणत्याही बाबीसंबंधातील कायद्यांविरुद्ध केलेले अपराध वगळून आणि मुलकी सत्तेच्या सहाय्यार्थ नौसेना, भूसेना किंवा वायुसेना यांचा अथवा संघराज्याच्या अन्य कोणत्याही सशस्त्र सेनांचा वापर वगळून.
२) फौजदारी प्रक्रिया, या संविधानाच्या प्रारंभी फौजदारी प्रक्रिया संहितेत समाविष्ट असलेल्या सर्व बाबींसह.
३) एखाद्या राज्याची सुरक्षितता, सार्वजनिक सुव्यवस्था राखणे किंवा जनतेला अत्यावश्यक असलेल्या वस्तुंचा पुरवठा व सेवा चालू ठेवणे यांच्याशी संबंधित असलेल्या कारणांस्तव प्रतिबंधक स्थानबद्धता ; अशा स्थानबद्धतेत ठेवलेल्या व्यक्ती.
४) कैदी, आरोपी व्यक्ती आणि या सूचीच्या नोंद ३ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कारणांकरता प्रतिबंधक स्थानबद्धतेत ठेवलेल्या व्यक्ती यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात हलवणे.
५) विवाह व घटस्फोट ; अर्भके व अज्ञान व्यक्ती; दत्तक विधान; इच्छापत्रे, विनाइच्छापत्रता व उत्तराधिकार; एकत्र कुटुंब व वाटण्या; न्यायिक कार्यवाहीतील पक्षकार या संविधानाच्या प्रारंभापूर्वी ज्या बाबतीत आपल्या व्यक्तिगत कायद्यास अधीन होते त्या सर्व बाबी.
६) शेतजमिनीहून अन्य मालमत्तेचे हस्तांतरण; विलेख व दस्तऐवज यांची नोंदणी.
७) संविदा-भागीदारी, अभिकरण, परिवहन-संविदा व संविदांचे अन्य विशेष प्रकार यांसह-पण यामध्ये शेतजमिनीसंबंधातील संविदांचा समावेश नाही.
८) कारवाईयोग्य अपकृत्य.
९) दिवाळखोरी व नादारी.
१०) विश्वस्तव्यवस्था व विश्वस्त.
११) महाप्रशासक आणि पदस्थ विश्वस्त.
१.(११क) न्यायदान, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालये खेरीजकरुन सर्व न्यायालये घटित करणे व त्यांची रचना).
१२) साक्षीपुरावा व शपथा; कायदे, सार्वजनिक कृती व अभिलेख आणि न्यायिक कार्यवाही यांना मान्यता.
१३) या संविधानाच्या प्रारंभास दिवाणी प्रक्रिया संहितेत समाविष्ट असलेल्या सर्व बाबींसह दिवाणी प्रक्रिया, मुदत व लवाद.
१४) न्यायालयाचा अवमान – पण यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाचा समावेश नाही.
१५) भटकेगिरी; भटक्या व फिरत्या जनजाती.
१६) वेड व मनोविकलता – वेड्या व मनोविकल व्यक्तींचा स्वीकार करण्यासाठी किंवा त्यांच्यावर उपचार करण्यासाठी असलेल्या ठिकाणांसह.
१७) प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध.
१.(१७क) वने.
१७ख) वन्य पशू व पक्षी यांचे संरक्षण.)
१८) खाद्यपदार्थातील व अन्य मालातील भेसळ.
१९) औषधिद्रव्ये व विषद्रव्ये – अफूसंबंधी सूची एकमधील नोंद ५९ च्या तरतुदींना अधीन राहून.
२०) आर्थिक व सामाजिक नियोजन.
१.(२०क) लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन.)
२१) वाणिज्यिक व औद्योगिक मक्तेदारी; व्यापार संघ व न्यास.
२२) श्रमिक संघ; औद्योगिक व कामगार विवाद.
२३) सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा; रोजगार व बेरोजगारी.
२४) कामगार कल्याण-कामाबाबतची परिस्थिती, भविष्य निर्वाह निधी, सेवायोजकाचे दायित्व, कामगार भरपाई, अपंगता व वार्धक्य पेन्शने व प्रसुतिविषयक लाभ यांसह.
२.(२५) शिक्षण, तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि विद्यापीठे यांसह सूची एकमधील ६३, ६४, ६५ व ६६ या नोंदीमधील तरतुदींना अधीन राहून कामगारांचे व्यवसाय शिक्षण व तंत्र शिक्षण.)
२६) विधिव्यवसाय, वैद्यकीय व्यवसाय व अन्य व्यवसाय.
२७) भारत व पाकिस्तान ही डोमिनिअन स्थापन झाल्याकारणाने आपल्या राहण्याच्या मूळ ठिकाणापासून विस्थापित झालेल्या व्यक्तींना सहाय्य व त्यांचे पुनर्वसन.
२८) धर्मादाय व धर्मादायी संस्था, धर्मादायी व धार्मिक दाननिधी व धार्मिक संस्था.
२९) माणसे, प्राणी किंवा वनस्पती यांना बाधक होणारे संसर्गजन्य रोग किंवा उपद्रवी जीवजंतू यांचा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात फैलाव होण्यास प्रतिबंध.
३०) जीवनविषयक आकडेवारी-जन्म व मृत्यू यांच्या नोंदणीसह.
३१) संसदेने केलेल्या कायद्याच्या किंवा विद्यमान कायद्याच्या द्वारे किंवा त्याअन्वये मोठी बंदरे म्हणून घोषित केलेल्या बंदरांहून अन्य बंदरे.
३२) यंत्रचालित जलयानापुरते देशांतर्गत जलमार्गाबाबत नौपरिवहन व नौकानयन आणि अशा जलमार्गावरील पथनियम आणि देशांतर्गत जलमार्गानी उतारुंची व मालाची ने-आण-राष्ट्रीय जलमार्गाबाबत सूची एकमध्ये असलेल्या तरतुदींस अधीन राहून.
३.(३३) क) एखाद्या उद्योगाचे नियंत्रण सार्वजनिक हितार्थ संघराज्याकडून होणे समयोचित आहे असे संसदेने कायद्याद्वारे घोषित केले असेल त्याबाबतीत, अशा उद्योगातील उत्पादने आणि असे उत्पादन म्हणून तशाच प्रकारचा आयात केलेला माल;
ख) खाद्य पदार्थ – तेलबिया व तेले यांसह;
ग) गुरांची वैरण – पेंड आणि अन्य खुराक यांसह;
घ) कच्चा कापूस – मग तो सरकी काढलेला असो वा नसो – व सरकी ; आणि
ङ) कच्चा ताग;
यांचा व्यापार व वाणिज्य, आणि त्यांचे उत्पादन, पुरवठा व वितरण.)
४.(३३क) वजने व मापे – मानके प्रस्थापित करण्याखेरीज)
३४) किंमतीचे नियंत्रण.
३५) यंत्रचलित वाहने – ज्यांनुसार अशा वाहनांवर कर बसवायचा त्या तत्वांसह.
३६) कारखाने.
३७) बॉयलर्स.
३८) वीज.
३९) वृत्तपत्रे, पुस्तके व मुद्रणालये.
४०) ५.(संसदेने केलेल्या कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये) राष्ट्रीय महत्वाची म्हणून घोषित केलेल्या स्थळांहून अन्य पुरातत्वीय स्थळे व अवशेष.
४१) निर्वासितांची मालमत्ता म्हणून कायद्यांद्वारे घोषित करण्यता आलेल्या (शेतजमिनीसह) मालमत्तेची अभिरक्षा, व्यवस्थापन व विल्हेवाट.
६.(४२) मालमत्तेचे संपादन व अधिग्रहण.)
४३) कर व अन्य लोक मागण्या यांच्या बाबतीतील दाव्यांची राज्यातील वसुली – त्या राज्याबाहेरुन प्राप्त होणाऱ्या जमीन महसुलाची थकबाकी व अशी थकबाकी म्हणून वसुलीयोग्य असलेल्या रकमा यांसह.
४४) न्यायिक मुद्रांकाद्वारे वसूल केलेली शुल्के किंवा फी यांहून अन्य मुद्रांक शुल्के – पण यामध्ये मुद्रांक शुल्क दरांचा समावेश नाही.
४५) सूची दोन किंवा सूची तीन यात विनिर्दिष्ट केलेल्या बाबींपैकी कोणत्याही बाबींच्या प्रयोजनार्थ चौकशी व आकडेवारी.
४६) या सूचीत असलेल्या बाबींपैकी कोणत्याही बाबीसंबंधात सर्वोच्च न्यायालय खेरीजकरुन अन्य सर्व न्यायालयांची अधिकारिता व त्यांचे अधिकार.
४७) या सूचीत असलेल्या बाबींपैकी कोणत्याही बाबीसंबंधातील फी – पण कोणत्याही न्यायालयात घेतल्या जाणाऱ्या फींचा यात समावेश नाही.
——–
१. संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम १९७६ याच्या कलम ५७ द्वारे समाविष्ट केला (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).
२. संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम १९७६ याच्या कलम ५७ नोंद २५ ऐवजी दाखल केली (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).
३. संविधान (तिसरी सुधारणा) अधिनियम १९५४ याच्या कलम २ द्वारे नोंद ३३ ऐवजी दाखल केली.
४. संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम १९७६ याच्या कलम ५७ द्वारे समाविष्ट केला (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).
५. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम १९५६ याच्या कलम २७ द्वारे संसदेने कायद्याद्वारे याऐवजी दाखल केला.
६. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम १९५६ याच्या कलम २६ द्वारे ४२ ऐवजी दाखल केला.

Leave a Reply