Constitution तिसरी अनुसूची : (अनुच्छेद ७५(४), ९९, १२४(६), १४८(२), १६४(३), १८८ व २१९)*.

भारताचे संविधान ( राज्यघटना )
तिसरी अनुसूची :
(अनुच्छेद ७५(४), ९९, १२४(६), १४८(२), १६४(३), १८८ व २१९)*.
शपथांचे किंवा प्रतिज्ञांचे नमुने
एक :
संघराज्याच्या मंत्र्यांकरता पदाच्या शपथेचा नमुना :-
मी, क.ख., ईश्वरसाक्ष शपथ घेतो / गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, १.(मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन,) मी संघराज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्सद्विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यांनुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व नि:पक्षपातीपणे, तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन.
दोन :
संघराज्याच्या मंत्र्यांकरता गुप्ततेच्या शपथेचा नमुना :-
मी, क. ख., ईश्वरसाक्ष शपथ घेता / गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, संघराज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब, असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीजकरुन एरव्ही, मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही.
२.(तीन :
क :
संसदेच्या निवडणुकीतील उमेदवाराने घ्यावयाच्या शपथेचा किंवा करावयाच्या प्रतिज्ञेचा नमुना :-
मी, क. ख., राज्यसभेतील (किंवा लोकसभेतील) जागा भरण्यासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वरसाक्ष शपथ घेतो / गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, आणि भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन.
ख :
संसदेच्या सदस्याने घ्यावयाच्या शपथेचा किंवा करावयाच्या प्रतिज्ञेचा नमुना :-
मी, क. ख., राज्यसभेचा (किंवा लोकसभेचा) सदस्य म्हणून निवडून आलो (किंवा नामनिर्देशित झालो) असल्याने, ईश्वरसाक्ष शपथ घेतो / गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन.)
चार :
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आणि भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक याने घ्यावयाच्या शपथेचा किंवा करावयाच्या प्रतिज्ञेचा नमुना :-
मी, क. ख., भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती (किंवा न्यायाधीश)(अथवा भारताचा नियंत्रक व महा लेखापरिक्षक) म्हणून नियुक्त झालो असल्याने, ईश्वरसाक्ष शपथ घेतो / गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, १.(मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन,) मी यथायोग्य व निष्ठापूर्वक आणि माझ्या सामथ्र्याच्या, ज्ञानाच्या व निर्णयशक्तीच्या पराकाष्ठेपर्यंत, निर्भयपणे व नि:पक्षपातीपणे, तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव आणि आकस न बाळगता माझ्या पदाची कामे पार पाडीन आणि मी संविधान व कायदा उन्नत राखीन.
पाच :
राज्याच्या मंत्र्यांकरता पदाच्या शपथेचा नमुना :-
मी, क. ख., ईश्वरसाक्ष शपथ घेतो / गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे, अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, १.(मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन,) मी —— राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्सद्विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यांनुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व नि:पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन.
सहा :
राज्याच्या मंत्र्यांकरता गुप्ततेच्या शपथेचा नमुना :-
मी, क. ख., ईश्वरसाक्ष शपथ घेतो / गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की,—— राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब, असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीजकरुन एरव्ही, मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना, प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही.
३.(सात :
क :
राज्य विधानमंडळाच्या निवडणुकीतील उमेदवाराने घ्यावयाच्या शपथेचा किंवा करावयाच्या प्रतिज्ञेचा नमुना :-
मी, क. ख., विधानसभेतील (किंवा विधानपरिषदेतील) जागा भरण्यासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने, ईश्वरसाक्ष शपथ घेतो / गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन आणि भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन.
ख :
राज्य विधानमंडळाच्या सदस्याने घ्यावयाच्या शपथेचा किंवा करावयाच्या प्रतिज्ञेचा नमुना :-
मी, क. ख., विधानसभेचा (किंवा विधानपरिषदेचा) सदस्य म्हणून निवडून आलो (किंवा नामनिर्देशित झालो) असल्याने, ईश्वरसाक्ष शपथ घेतो / गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन.)
आठ :
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घ्यावयाच्या शपथेचा किंवा करावयाच्या प्रतिज्ञेचा नमुना :-
मी, क. ख., —– येथील (किंवा याच्या) उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती (किंवा न्यायाधीश) म्हणून नियुक्त झालो असल्याने, ईश्वरसाक्ष शपथ घेतो / गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, १.(मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन,) मी यथायोग्य व निष्ठापूर्वक आणि माझ्या सामथ्र्याच्या, ज्ञानाच्या व निर्णयशक्तीच्या पराकाष्ठेपर्यंत, निर्भयपणे व नि:पक्षपातीपणे, तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता माझ्या पदाची कामे पार पाडीन आणि मी संविधान व कायदा उन्नत राखीन.
———
*. अनुच्छेद ८४(क) आणि १७३(क) देखील पहा.
१. संविधान (सोळावी सुधारणा) अधिनियम १९६३ याच्या कलम ५ द्वारे समाविष्ट केले.
२. संविधान (सोळावी सुधारणा) अधिनियम १९६३ याच्या कलम ५ द्वारे तीन ऐवजी दाखल केला.
३. संविधान (सोळावी सुधारणा) अधिनियम १९६३ याच्या कलम ५ द्वारे सात ऐवजी दाखल केला.

Leave a Reply