भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३६४ :
मोठी बंदरे व विमानतळ यासंबंधी विशेष तरतुदी :
(१) या संविधानात काहीही असले तरी, राष्ट्रपती जाहीर अधिसूचनेद्वारे असा निदेश देऊ शकेल की, अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा दिनांकास व तेव्हापासून—-
(क) संसदेने किंवा राज्य विधानमंडळाने केलेला कोणताही कायदा, एखादे मोठे बंदर किंवा विमानतळ यांना लागू होणार नाही अथवा त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अपवादांसह किंवा फेरबदलांसह त्यांना लागू होईल, अथवा
(ख) एखादा विद्यमान कायदा हा, एखादे मोठे बंदर किंवा विमानतळ यांच्या बाबतीत उक्त दिनांकापूर्वी केलेल्या किंवा करण्याचे वर्जिलेल्या गोष्टी खेरीजकरून एरव्ही, अंमलात असण्याचे बंद होईल, अथवा अशा बंदराला किंवा विमानतळाला लागू होताना, अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अपवादांसह किंवा फेरबदलांसह अंमलात येईल.
(२) या अनुच्छेदातील,——
(क) मोठे बंदर याचा अर्थ, संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा कोणत्याही विद्यमान कायद्याद्वारे किंवा तद्न्वये मोठे बंदर म्हणून घोषित केलेले बंदर, असा आहे आणि त्या त्या वेळी अशा बंदराच्या सीमांमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व क्षेत्रांचा त्यात समावेश आहे.
(ख) विमानतळ याचा अर्थ, हवाईमार्ग, विमाने व विमानचालन यासंबंधीच्या अधिनियमितींच्या प्रयोजनार्थ व्याख्या केल्याप्रमाणे विमानतळ, असा आहे.