भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३०९ :
संघराज्य किंवा राज्य यांच्या सेवेत असणाऱ्या व्यक्तींची भरती आणि त्यांच्या सेवाशर्ती :
या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून, समुचित विधानमंडळाच्या अधिनियमांद्वारे संघराज्याच्या किंवा कोणत्याही राज्याच्या कारभारासंबंधातील लोकसेवांमध्ये आणि पदांवर करावयाची भरती व तेथे नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या सेवाशर्ती यांचे विनियमन करता येईल :
परंतु असे की, संघराज्याच्या कारभारासंबंधातील सेवा व पदे यांच्याबाबतीत राष्ट्रपती, किंवा तो निदेश देईल अशी व्यक्ती, आणि राज्याच्या कारभारासंबंधातील सेवा व पदे यांच्या बाबतीत राज्यपाल १.(***) किंवा तो निदेश देईल अशी व्यक्ती, या अनुच्छेदाखालील समुचित विधानमंडळाच्या अधिनियमाद्वारे किंवा त्याअन्वये त्याबाबत तरतूद केली जाईपर्यंत, अशा सेवांमध्ये व पदांवर करावयाची भरती व तेथे नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या सेवाशर्ती यांचे विनियमन करणारे नियम करण्यास सक्षम असेल, आणि याप्रमाणे केलेले कोणतेही नियम अशा कोणत्याही अधिनियमाच्या तरतुदींना अधीन राहून प्रभावी होतील.
———
१.संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २९ व अनुसूची यांद्वारे मूळ मजकूर गाळला.