भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २७० :
१.(आकारणी केलेले आणि संघराज्य व राज्ये यांच्यामध्ये वितरित करण्यात येणारे कर :
(१)२.(अनुच्छेद २६८, २६९ व २६९क) मध्ये निर्दिशिलेले अनुक्रमे शुल्क व कर यांव्यतिरिक्त, संघ सूचीमध्ये निर्दिशिलेले केलेले सर्व कर व शुल्क, अनुच्छेद २७१ मध्ये निर्देशिलेले कर व शुल्क यावरील अधिभार आणि संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्यान्वये विवक्षित प्रयोजनांसाठी आकारलेला कोणताही उपकर यांची आकारणी व वसुली, भारत सरकारकडून केली जाईल आणि खंड (२) मध्ये तरतूद केलेल्या रीतीने ते संघराज्य व राज्ये यांच्यामध्ये वितरित केले जातील.
३.(१क) अनुच्छेद २४६ च्या खंड (१) अन्वये संघराज्याने वसूल केलेला कर, खंड (२) मध्ये तरतूद केलेल्या रीतीने संघराज्य व राज्ये यांच्यामध्ये वितरित करण्यात येईल.
(१ख) अनुच्छेद २४६क च्या खंड (१) अन्वये संघरायाने आकारलेल्या कराचे प्रदान करण्यासाठी ज्याचा वापर करण्यात आला आहे. असा, अनुच्छेद २४६क चा खंड (२) आणि अनुच्छेद २६९क यांअन्वये संघराज्याने आकारलेला व वसूल केलेला कर, आणि अनुच्छेद २६९क च्या खंड (१) अन्वये संघराज्याला संविभाजित केलेली रक्कम देखील, खंड (२) मध्ये तरतूद केलेल्या रीतीने संघराज्य व राज्ये यांच्यामध्ये वितरित करण्यात येईल.)
(२) कोणत्याही वित्तीय वर्षांतील अशा कोणत्याही कराच्या किंवा शुल्काच्या निव्वळ उत्पन्नाची विहित करण्यात येईल इतकी टक्केवारी ही, भारताच्या एकत्रित निधीचा भाग होणार नाही, तर ज्या राज्यांमध्ये त्या वर्षात तो कर किंवा ते शुल्क आकारण्यायोग्य असेल त्या राज्यांना नेमून दिली जाईल आणि खंड (३) मध्ये तरतूद केलेल्या रीतीने विहित करण्यात येईल अशा रीतीने व अशा वेळेपासून त्या राज्यांमध्ये वितरित केली जाईल.
(३) या अनुच्छेदात, विहित याचा अर्थ,—-
(एक) वित्त आयोग घटित होईपर्यंत, राष्ट्रपतीने, आदेशाद्वारे विहित केलेले, आणि
(दोन) वित्त आयोग घटित झाल्यानंतर राष्ट्रपतीने वित्त आयोगाच्या शिफारशींचा विचार करून आदेशाद्वारे विहित केलेले, असा आहे.)
————-
१. संविधान (ऐंशीवी सुधारणा) अधिनियम, २००० याच्या कलम ३ द्वारे मूळ अनुच्छेदाऐवजी हा अनुच्छेद दाखल केला (१ एप्रिल १९९६ रोजी व तेव्हापासून).
२. संविधान (एकशे एकवी सुधारणा) अधिनियम २०१६ याच्या कलम १० द्वारा अनुच्छेद २६८, २६८क व २६९ या मजकुराऐवजी (१६-९-२०१६ पासून) समाविष्ट करण्यात आले.या पूर्वी संविधान (अठ्ठ्यांऐशीवी सुधारणा) अधिनियम, २००३ याच्या कलम ३ द्वारे अनुच्छेद २६८, २६८क व २६९ या मजकुराऐवजी दाखल केला. (तो अद्यााप अंमलात आलेला नाही, त्याचा दिनांक नंतर अधिसूचित करण्यात येईल).
३. संविधान (एकशे एकवी सुधारणा) अधिनियम २०१६ याच्या कलम १० द्वारा (१६-९-२०१६ पासून) समाविष्ट करण्यात आले.