भारताचे संविधान ( राज्यघटना )
संघराज्य आणि राज्ये यांच्यामध्ये महसुलांचे वाटप :
अनुच्छेद २६८ :
संघराज्याने आकारणी केलेली पण राज्यांनी वसूल केलेली आणि विनियोजन केलेली शुल्के :
(१) संघ सूचीत उल्लेखिलेली अशी मुद्रांक शुल्के १.(***) यांची आकारणी भारत सरकार करील, पण त्यांची वसुली—–
(क) अशी शुल्के २.(संघ राज्यक्षेत्रात) आकारण्यायोग्य असतील त्या बाबतीत, भारत सरकारद्वारे, आणि
(ख) अन्य बाबतीत, अशी शुल्के ज्या राज्यांमध्ये आकारण्यायोग्य असतील अनुक्रमे त्या राज्याद्वारे, करण्यात येईल.
(२) कोणत्याही राज्यात आकारण्यायोग्य असलेल्या अशा कोणत्याही शुल्काचे कोणत्याही वित्तीय वर्षातील उत्पन्न, भारताच्या एकत्रित निधीचा भाग होणार नाही, तर ते त्या राज्याला नेमून दिले जाईल.
————
१. संविधान (एकशे एकावी सुधारणा) अधिनियम २०१६ याच्या कलम ६ द्वारा आणि औषधीय व प्रसाधन पदार्थांवरील अशी उत्पादन शुल्के हा मजकूर (१६-९-२०१६ पासून) वगळण्यात आले.
२. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २९ व अनुसूची यांद्वारे पहिल्या अनुसूचीच्या भाग-ग मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या राज्यात या मजकुराऐवजी हा मजकूर दाखल केला.