भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३-ज :
पंचायतींचा कर लादण्याचा अधिकार आणि पंचायतींचे निधी :
राज्य विधानमंडळ, कायद्याद्वारे, त्या कायद्यात विनिर्दिष्ट करण्यात येईल,—-
(क) अशा कार्यपद्धतीनुसार आणि अशा मर्यादांना अधीन राहून असे कर, शुल्क, पथकर आणि फी आकारण्यास, वसूल करण्यास आणि विनियोजित करण्यास पंचायतीला प्राधिकार देऊ शकेल ;
(ख) अशा प्रयोजनांसाठी आणि अशा शर्तींना आणि मर्यादांना अधीन राहून, राज्य शासनाने आकारलेला व वसूल केलेला असा कर, शुल्क, पथकर आणि फी पंचायतीकडे नेमून देऊ शकेल ;
(ग) असे सहायक अनुदान राज्याच्या एकत्रित निधीतून पंचायतींना देण्याची तरतूद करू शकेल ; आणि
(घ) असा निधी, अनुक्रमे पंचायतींद्वारे किंवा पंचायतींच्या वतीने स्वीकारलेला सर्व पैसा जमाखाती टाकण्यासाठी आणि तसेच त्यातून तो काढून घेण्यासाठी स्थापन करण्याची तरतूद करू शकेल.