Constitution अनुच्छेद १७० : विधानसभांची रचना :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १७० :
१.(विधानसभांची रचना :
(१) अनुच्छेद ३३३ च्या तरतुदींना अधीन राहून, प्रत्येक राज्याची विधानसभा, राज्यामधील क्षेत्रीय मतदारसंघामधून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले जास्तीत जास्त पाचशे व कमीत कमी साठ इतके सदस्य मिळून बनलेली असेल.
(२) खंड (१) च्या प्रयोजनार्थ, प्रत्येक राज्य अशा रीतीने क्षेत्रीय मतदारसंघामध्ये विभागण्यात येईल की, प्रत्येक मतदारसंघाची लोकसंख्या व त्यास वाटून दिलेल्या जागांची संख्या यांचे गुणोत्तर, व्यवहार्य असेल तेथवर, राज्यात सर्वत्र सारखेच असेल.
२.(स्पष्टीकरण :
या खंडातील लोकसंख्या या शब्दप्रयोगाचा अर्थ, ज्या जनगणनेची संबद्ध आकडेवारी प्रकाशित झालेली आहे अशा लगतपूर्व जनगणनेमध्ये निश्चित करण्यात आलेली लोकसंख्या, असा आहे :
परंतु असे की, या स्पष्टीकरणातील ज्या जनगणनेची संबद्ध आकडेवारी प्रकाशित झालेली आहे त्या जनगणनेची लगतपूर्व जनगणना या उल्लेखाचा अन्वयार्थ, सन ३.(२०२६) नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेची संबद्ध आकडेवारी प्रकाशित होईपर्यंत ४.(२००१) सालच्या जनगणनेचा उल्लेख म्हणून लावला जाईल. )
(३) प्रत्येक जनगणना पूर्ण झाल्यावर, प्रत्येक राज्याच्या विधानसभेतील जागांची एकूण संख्या व प्रत्येक राज्याची क्षेत्रीय मतदारसंघामध्ये केलेली विभागणी यांचे, संसद कायद्याद्वारे निर्धारित करील अशा प्राधिकाऱ्याकडून व अशा रीतीने पुन:समायोजन केले जाईल:
परंतु असे की, अशा पुन:समायोजनामुळे त्यावेळी अस्तित्वात असलेल्या विधानसभेचे विसर्जन होईपर्यंत त्या विधानसभेतील प्रतिनिधित्वावर परिणाम होणार नाही 🙂
५.(परंतु आणखी असे की, असे पुन:समायोजन, राष्ट्रपती आदेशाद्वारे विनिर्दिष्ट करील अशा दिनांकापासून प्रभावी होईल आणि असे पुन:समायोजन प्रभावी होईपर्यंत, विधानसभेची कोणतीही निवडणूक, अशा पुन:समायोजनापूर्वी अस्तित्वात असलेल्या क्षेत्रीय मतदारसंघाच्या आधारे घेता येईल :
परंतु तसेच, सन ३.(२०२६) नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेची संबद्ध आकडेवारी प्रकाशित होईपर्यंत,
६.((एक) १९७१ सालच्या जनगणनेच्या आधारे पुन:समायोजित केलेली प्रत्येक राज्याच्या विधानसभेमधील जागांची एकूण संख्या; आणि
(दोन) ४.(२००१) सालच्या जनगणनेच्या आधारे पुन:समायोजित करण्यात येईल अशी प्रत्येक राज्याच्या क्षेत्रीय मतदार संघामध्ये झालेली विभागणी, या खंडान्वये पुन:समायोजित करण्याची आवश्यकता असणार नाही.))
———————-
१. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम ९ द्वारे अनुच्छेद १७० ऐवजी दाखल केला.
२. संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७६ याच्या कलम २९ द्वारे मूळ स्पष्टीकरणाऐवजी दाखल केले. (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).
३. संविधान (चौऱ्याऐंशीवी सुधारणा) अधिनियम, २००१ याच्या कलम ५ द्वारे मूळ मजकुराऐवजी दाखल केले (२१ फेब्रुवारी २००२ रोजी व तेव्हापासून).
४. संविधान (सत्याऐंशीवी सुधारणा) अधिनियम, २००३ याच्या कलम ४ (दोन) द्वारे मूळ मजकुराऐवजी दाखल केले (२२ जून २००३ रोजी व तेव्हापासून).
५. संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७६ याच्या कलम २९द्वारे अनुच्छेद १७० च्या खंड (३) मधील परंतुकानंतर ही परंतुके समाविष्ट केली (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).
६. संविधान (चौऱ्याऐंशीवी सुधारणा) अधिनियम, २००१ याच्या कलम ५ द्वारे विवक्षित शब्दांऐवजी हा मजकूर दाखल केला.

Leave a Reply