भारताचे संविधान ( राज्यघटना )
वैधानिक कार्यपद्धती :
अनुच्छेद १०७ :
विधेयके प्रस्तुत करणे व पारित करणे यासंबंधी तरतुदी :
(१) धन विधेयके व अन्य वित्तीय विधेयके यांबाबत, अनुच्छेद १०९ व ११७ च्या तरतुदींना अधीन राहून, संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहात विधेयकाचा प्रारंभ होऊ शकेल.
(२) अनुच्छेद १०८ व १०९ च्या तरतुदींना अधीन राहून, संसदेच्या सभागृहांनी एखादे विधेयक, सुधारणेशिवाय किंवा दोन्ही सभागृहांना संमत झाल्या असतील अशाच सुधारणांसह, संमत केल्याखेरीज दोन्ही सभागृहांनी ते पारित केले असल्याचे मानले जाणार नाही.
(३) संसदेमध्ये प्रलंबित असलेले विधेयक, सभागृहांची सत्रसमाप्ती झाल्याकारणाने व्यपगत होणार नाही.
(४) राज्यसभेत प्रलंबित असलेले जे विधेयक लोकसभेने पारित केलेले नसेल ते विधेयक, लोकसभेचे विसर्जन झाले असता व्यपगत होणार नाही.
(५) जे विधेयक लोकसभेत प्रलंबित असेल, किंवा जे लोकसभेकडून पारित होऊन राज्यसभेत प्रलंबित असेल ते विधेयक, लोकसभेचे विसर्जन झाले असता, अनुच्छेद १०८ च्या तरतुदींना अधीन राहून व्यपगत होईल.