भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १०० :
सभागृहांमधील मतदान, जागा रिक्त असतानाही कार्य करण्याचा सभागृहांचा अधिकार व गणपूर्ती :
(१) या संविधानात अन्यथा तरतदू केली असेल त्याव्यतिरिक्त इतर बाबतीत, कोणत्याही सभागृहाच्या बैठकीतील किंवा सभागृहांच्या संयुक्त बैठकीतील सर्व प्रश्न, अध्यक्षाच्या अथवा सभापती किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त, अन्य उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने निर्णीत केले जातील.
सभापती किंवा अध्यक्ष किंवा त्या नात्याने कार्य करणारी व्यक्ती, पहिल्या फेरीत मतदान करणार नाही, पण समसमान मते पडल्यास, तिला निर्णायक मत देण्याचा अधिकार असेल व तो अधिकार ती वापरील.
(२) संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या सदस्यत्वाची कोणतीही जागा रिक्त असली तरी, त्या सभागृहाला कार्य करण्याचा अधिकार असेल,आणि संसदेतील कोणतेही कामकाज, त्या कामकाजाच्या वेळी तेथे स्थानापन्न होण्याचा किंवा मतदान करण्याचा किंवा अन्यथा भाग घेण्याचा जिला हक्क नव्हता अशा एखाद्या व्यक्तीने ते केले आहे, असे मागाहून आढळून आले तरीही, विधिग्राह्य राहील.
१.(३) संसद कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करीपर्यंत, संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाची सभा होण्यासाठी गणपूर्ती ही त्या सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या एक दशांशाइतकी असेल.
(४) एखाद्या सभागृहाची सभा चालू असताना एखाद्या वेळी गणपूर्ती झालेली नसेल तर, सभागृह तहकूब करणे किंवा गणपूर्ती होईपर्यंत सभा स्थगित करणे, हे सभापतीचे किंवा अध्यक्षाचे किंवा त्या नात्याने कार्य करणाऱ्या व्यक्तीचे कर्तव्य असेल.)
———
१. खंड (३) आणि (४) संविधान (बेचाळीसावी दुरुस्ती) अधिनियम १९७६ च्या कलम १८ द्वारे वगळण्यात आले (तारीख अधिसूचित केलेली नाही) परंतु संविधान (चव्वेचाळीसावी सुधारणा) अधिनियम १९७८ (२०-६-१९७८ पासून) कलम ४५ द्वारे ही दुरुस्ती रद्द करण्यात आली.