भारतीय पुरावा अधिनियम २०२३
सपीतेने संलग्न तथ्य (जवळून जोडलेले तथ्य) :
कलम ४ :
एकाच घडामोडीचा भाग असणाऱ्या तथ्यांची संबद्धता :
जेव्हा काही तथ्ये वादनिविष्ट नसली तरी, ती तथ्ये आणि एखादे वादतथ्य किंवा संबद्ध (सुसंगत) तथ्य ही एकाच घडामेडीचा भाग होऊ शकतील अशा रीतीने ती त्या वादतथ्याशी निगडित असतात तेव्हा, ती संबद्ध असतात – मग ती एकाच वेळी व स्थळी घडलेली असोत व निरनिराळ्या वेळी व स्थळी घडलेली असोत.
उदाहरणे :
(a) क) (बी) ला मारहाण करुन त्याचा खून केल्याचा (ऐ) वर आरोप आहे. मारहाणी वेळी किंवा त्याच घडामोडीचा भाग होईल इतके थोडे पूर्वी किंवा नंतर (ऐ) ने किंवा (बी) ने किंवा बघ्यांनी जे काही म्हटले किंवा केले ते संबद्ध (सुसंगत) तथ्य आहे.
(b) ख) एका सशस्त्र उठावात भाग घेऊन भारत सरकार विरुद्ध युद्ध चालवल्याचा (ऐ) वर आरोप आहे. त्यात मालमत्तेचा नाश झाला आहे, सैन्यदलांवर हल्ले झाले आहेत व तुरुंग फोडून खुले केले गेले आहेत. यांपैकी सर्व तथ्ये घडून आली त्या वेळी (ऐ) उपस्थित नसला तरी, ही तथ्ये घडून येणे हे एकंदर घडामोडीचा भाग म्हणून संबद्ध (सुसंगत) आहे.
(c) ग) एका पत्रव्यवहाराचा भाग असलेल्या पत्रातील बदनामीकारक मजकुराबद्दल (ऐ) हा (बी) च्या विरुद्ध दावा लावतो. ज्याच्यातून बदनामी उद्भवली त्या विषयांसंबंधीची आणि बदनामीकारक मजकूर अंतर्भूत असलेल्या पत्रव्यवहाराचा भाग असलेल्या पत्रव्यवहाराचा भाग असलेली पत्रे ही संबद्ध (सुसंगत) तथ्ये आहेत मग त्यांमध्ये प्रत्यक्ष तो मजकूर नसला तरी हरकत नाही.
(d) घ) (बी) कडून मागवलेला विवक्षित माल (ऐ) कडे पोहचविण्यात आला होता किंवा काय हा प्रश्न आहे. माल दरम्यान अनेक व्यक्तिंकडे पोहचविण्यात आला होता. प्रत्येक पोहचवणी हे संबद्ध (सुसंगत) तथ्य आहे.