महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
प्रकरण ८ :
संकिर्ण (किरकोळ) :
कलम १५३:
फी – बक्षिसे – वगैरेंची व्यवस्था :
या अधिनियमान्वये दिलेले लायसेन्स किंवा लेखी परवानगी यासाठी दिलेली सर्व फी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी आदेशिका बजाविल्याबद्दल दिलेल्या सर्व रकमा आणि माहिती देणारे म्हणून पोलीस अधिकाऱ्यांस विधिअन्वये देणे झालेली सर्व बक्षिसे, समपहरणे आणि दंडाखालच्या सर्व रकमा किंवा त्याचे हिस्से हे, अशी जी कोणतीही फी किंवा रक्कम, त्यावेळी अमलात असलेल्या कोणत्याही अधिनियमाच्या उपबंधान्वये जेथवर त्या कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या असतील तेथवर ती फी किंवा रक्कम खेरीजकरुन, राज्यशासनाकडे जमा करण्यात येतील :
परंतु, असे की, शासनाची मान्यता घेऊन किंवा त्या बाबतीत राज्यशासनाने केलेल्या कोणत्याही नियमान्वये अशी कोणतीही दंडादाखल घेतलेली किंवा दंडाची सगळी रक्कम किंवा तिचा कोणताही भाग, खास सेवेबद्दल पोलीस अधिकाऱ्यास किंवा दोन किंवा अधिक पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वाटून देता येईल.
