महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ४५ :
यातनापीडित किंवा वाईट स्थितीतील प्राण्यांचा नाश करणे:
१) ज्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, एखाद्या रस्त्यावर किंवा उपासनेच्या जागेखेरीज इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वळू किंवा गाय याशिवाय इतर कोणताही प्राणी त्याच्या मते, त्याचे हाल झाल्याशिवाय त्यास हलविता येणार नाही इतका रोगाने पीडलेला किंवा इतकी जबर दुखापत झालेला आणि इतक्या वाईट शारीरिक स्थितीत असलेला आढळेल तर, तो जर मालक गैरहजर असेल किंवा तो त्या प्राण्याचा नाश करु देण्याचे नाकारील तर, ज्या क्षेत्रांत तो प्राणी आढळला असेल त्या क्षेत्राच्या प्रभारी पशुवैद्यक व्यवसायीस ताबडतोब बोलावील आणि जर, पशुवैद्यक व्यवसायी असे प्रमाणपत्र देईल की, त्या प्राण्यास इतकी प्राणांतिक दुखापत झालेली आहे किंवा इतकी जबर दुखापत झालेली आहे किंवा इतकी जबर दुखापत झालेली आहे किंवा ता इतका रोगपीडित किंवा इतक्या वाईट शारीरिक स्थितीत आहे की, त्यास जिवंत ठेवणे हेच क्रूरपणाचे ठरेल तर पोलीस अधिकाऱ्यास, मालकाच्या संमतीशिवाय, त्या प्राण्याचा नाश करता किंवा करविता येईल:
परंतु असे की, जर पशुवैद्यक व्यवसायीच्या मते तो प्राणी जेथे आढळून आला त्या ठिकाणाहून त्याचे हाल न होता नेता येण्यासारखा असेल आणि जर त्या प्राण्याचा मालक किंवा तो ज्या व्यक्तीच्या ताब्यात असेल अशी व्यक्ती किंवा त्याच्या गैरहजेरीत त्या ठिकाणी जी कोणी इतर व्यक्ती असेल ती त्या प्राण्यास गुरांच्या दवाखान्यात किंवा पांजरपोळात पशुवैद्यक व्यवसायीस योग्य वाटेल अशा वेळात नेण्यास कबूल असेल किंवा नेण्याचे आपण होऊन पत्करील तर अशा मालकाने, तो प्राणी ज्या व्यक्तीच्या ताब्यात असेल अशा व्यक्तीने किंवा इतर व्यक्तीने तो प्राणी तेथून नेण्यास पशुवैद्यक व्यवसायीने परवानगी दिली पाहिजे; जर मालक किंवा तो प्राणी ज्या व्यक्तीच्या ताब्यात असेल ती व्यक्ती किंवा इतर व्यक्ती तो प्राणी नेण्यास नाकबूल असेल किंवा तसे नेण्यात कसूर करील तर, पशुवैद्यक व्यवसायीस, त्या प्राण्याचा नाश करण्यापूर्वी तो प्राणी जेथे आढळून आला त्या ठिकाणाहून त्यास योग्य वाटेल अशा इतर ठिकारी तो नेण्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यास निदेश देता येईल:
परंतु आणखी असे की, जेव्हा त्या प्राण्याचा कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी नाश करण्यात येईल तेव्हा त्याचा नाश करतेवेळी तो शक्यतोवर लोकांच्या नजरेआड ठेवला पाहिजे.
२) राज्य शासनाला पशुवैद्यक व्यवसायी म्हणून त्याला योग्या वाटतील अशा व्यक्ती नेमता येतील आणि ह्या अधिनियमाच्या प्रयोजनाकरिता त्यांच्या प्रभाराखाली जी क्षेत्रे देण्यात येतील ती क्षेत्रे जाहीर करता येतील.