महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ३३-अ:
खाद्यगृह, परमीट रुम किंवा बिअर बार यांमधील नृत्याविष्कारावर बंदी आणि इतर परिणामस्वरुप तरतुदी :
(महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान कक्ष (बार रुम) यांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २०१६ (२०१६ चा महा अधि १२) कलम १६ नुसार वगळण्यात आले.)
———
सुधारणे पुर्वी :
१) या अधिनियमामध्ये, किंवा, पोलीस आयुक्ताने किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्याने आपापल्या अधिपत्याखालील क्षेत्रांकरिता कलम ३३ च्या पोट-कलम (१) अन्वये केलल्या नियमांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, मुंबई पोलीस (सुधारणा) अधिनियम, २००५ (२००५ चा महा.३५) याच्या प्रारंभाच्या दिनांकास आणि तेव्हापासून-
क) खाद्यगृहामध्ये, परमीट रुममध्ये किंवा बिअर बारमध्ये कोणत्याही तऱ्हेचा किंवा प्रकारचा नृत्याविष्कार आयोजित करण्यावर बंदी घालण्यात येत आहे;
ख) खाद्यगृहामध्ये, परमीट रुममध्ये किंवा बिअर बारमध्ये कोणत्याही तऱ्हेचा किंवा प्रकारचा नृत्याविष्कार आयोजित करण्यासाठी लायसन प्राधिकारी असलेल्या पोलीस आयुक्ताने, जिल्हा दंडाधिकाऱ्याने, किंवा यथास्थिती, इतर कोणत्याही अधिकाऱ्याने, उपरोक्त नियमांन्वये दिलेली सर्व नृत्याविष्कार लायसने रद्द होतील.
(२) कलम १३१ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, पोट-कलम (१) चे उल्लंघन करुन, खाद्यगृहामध्ये, परमीट रुममध्ये किंवा बिअर बारमध्ये कोणत्याही तऱ्हेचा किंवा प्रकारचा नृत्याविष्कार आयोजित करणाऱ्या किंवा आयोजित करण्याची व्यवस्था करणाऱ्या किंवा आयोजित करण्यास परवानगी देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस, अपराधसिद्धीनंतर, तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची आणि दोन लाख रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल;
परंतु, न्यायालयाच्या न्यायनिर्णयात नमूद करण्यात येतील अशी, त्याविरुद्ध विशेष व पुरेशी कारणे नसतील तर, अशी कारावासाची शिक्षा तीन महिन्यांहून कमी असणार नाही आणि द्रव्यदंड पन्नास हजार रुपयांहून कमी असणार नाही.
३) पोट-कलम (१) अन्वये जिचे नृत्याविष्कार लायसन रद्द करण्यात आले आहे अशी कोणतीही व्यक्ती, तिच्या खाद्यगृहात, परमीट रुममध्ये किंवा बिअर बारमध्ये कोणत्याही तऱ्हेचा किंवा प्रकारचा नृत्याविष्कार आयोजित करीत आहे किंवा आयोजित करण्याची व्यवस्था करीत आहे किंवा आयोजित करण्यास परवानगी देत आहे असे लयसन प्राधिकाऱ्याच्या निदर्शनास आले तर, लायसन प्राधिकारी, कलम ३३ अन्वये तयार केलेल्या नियमांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, खाद्यगृह म्हणून दिलेले नोंदणी प्रमाणपत्र आणि परमीट रुम किंवा बिअर बारला सार्वजनिक करमणुकीची जागा ठेवण्यासाठी दिलेले लायसन (पीपीईएल) निलंबित करील आणि लायसनधारकाला आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर, ते नोंदणी प्रमाणपत्र आणि लायसन निलंबित केल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत एकतर, नोंदणी प्रमाणपत्र आणि लायसन निलंबित करण्याबाबतचा आदेश मागे घेईल किंवा प्रमाणपत्र आणि लायसन रद्द करील.
४) पोट-कलम (३) अन्वये, नोंदणी प्रमाणपत्र आणि लायसन रद्द करणाऱ्या, लायसन प्राधिकाऱ्याच्या आदेशाने व्यथित झालेल्या व्यक्तीस, आदेश प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत राज्य शासनाकडे अपील करता येईल. त्यावरील राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल.
५) पोट-कलम (१) अन्वये जिचे नृत्याविष्कार लायसन रद्द झाले असेल अशा कोणत्याही व्यक्तीस, असे लायसन ज्याने दिले असेल अशा लायसन प्राधिकाऱ्याकडे, योग्य प्रमाणात लायसन फी परत मिळविण्यासाठी अर्ज करता येईल. असा लायसन प्राधिकारी, योग्य ती चौकशी केल्यानंतर, असा अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत, यथाप्रमाण तत्त्वानुसार लायसन फी परत करील.
६) या कलमाखाली शिक्षापात्र असलेला अपराध हा, दखलपात्र व अजामीनपत्र असेल.