महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२ जे-३ :
१.(विशेषीकृत अभिकरणांच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ :
१) राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, गुन्हा अन्वेषण विभाक, राज्य गुप्तवार्ता विभाग, नागरी हक्क संरक्षण, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य राखीव पोलीस दल, दहशतवाद विरोधी पथक, महामार्ग वाहतूक व प्रशिक्षण संचालनालय या विशेषीकृत अभिकरणांच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ या नावाने संबोधण्यात येणारे एक मंडळ घटीत करील.
२) विशेषीकृत अभिकरणांच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ, संबंधित विशेषीकृत अभिरणाचा प्रमुख हा अध्यक्ष आणि त्या विशेषीकृत अभिकरणाचे तीन वरिष्ठतम अधिकारी यांचे मिळून बनलेले असेल :
परंतु, उपरोक्त सदस्यांमध्ये एकही सदस्य मागासवर्गातील नसेल तर, संबंधित विशेषीकृत अभिकरणाचा प्रमुख, अशा प्रवर्गातील कोणत्याही वरिष्ठतम पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करील.
स्पष्टीकरण :
या पोट-कलमाच्या प्रयोजनार्थ, मागासवर्ग या शब्दप्रयोगाचा अर्थ, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग, असा आहे.)
——-
१. सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११ याच्या कलम ४ अन्वये समाविष्ट करण्यात आले.