Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम ३६७ : मनोविकल आरोपीच्या बाबतीत प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण २७ :
मनोविकल आरोपी व्यक्तींबाबतचे उपबंध (तरतुदी) :
कलम ३६७ :
मनोविकल आरोपीच्या बाबतीत प्रक्रिया :
१) जेव्हा एखादी चौकशी करणाऱ्या दंडाधिाकऱ्यास, ज्या व्यक्तीविरूध्द चौकशी चालवण्यात येते ती मनोविकल आहे आणि त्यामुळे आपला बचाव करण्यास अक्षम आहे असे सकारण वाटत असेल तेव्हा, दंडाधिकारी अशा मनोविकलतेच्या वस्तुस्थितीबाबत चौकशी करील व जिल्ह्याच्या जिल्हा शल्य चिकित्सकाकरवी किंवा राज्य शासन निदेशित करील अशा अन्य वैद्यकीय अधिकाऱ्याकरवी अशा व्यक्तीची तपासणी करवून घेईल, आणि तदनंतर अशा शल्यचिकित्सकाची किंवा अन्य अधिकाऱ्याची साक्षीदार म्हणून साक्षतपासणी करील, व ती साक्षतपासणी तो लेखनिविष्ट करील.
२) जर जिल्हा शल्य चिकित्सकास आरोपी व्यक्ती मनोविकल असल्याचे आढळून आले असेल तर, तो अशा व्यक्तीची काळजी घेण्यासाठी, तिच्यावर उपचार करण्यासाठी आणि तिच्या स्थितीची रोगचिकित्सा करण्यासाठी अशा व्यक्तीस सरकारी हॉस्पिटल किंवा सरकारी मेडीकल कॉलेजच्यां मनोविकृती चिकित्सकाकडे किंवा चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ अशी आरोपी व्यक्ती मानसिक रुग्ण आहे किंवा कसे याबाबत दंडाधिाकऱ्यास माहिती देईल :
परंतु,जर मनोविकृती चिकित्सकाने किंवा यथास्थिती, चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञाने दंडाधिाकऱ्यास दिलेल्या माहितीमुळे आरोपी व्यक्ती व्यथित झाली असेल तर, ती पुढील व्यक्तींचा समावेश असलेल्या वैद्यकीय मंडळासमोर अपील दाखल करील,-
(a) क) (अ) नजीकच्या शासकीय रूग्णालयातील मनोविकृती चिकित्सा शास्त्र युनिटाचा प्रमुख; आणि
(b) ख) (ब) नजीकच्या शासकीय महाविद्यालयातील मनोविकृती चिकित्सा शास्त्र विद्याशाखेतील सदस्य.
३) अशी तपासणी व चौकशी हाईपावेतो दंडाधिकाऱ्यास अशा व्यक्तीबाबत कलम ३६९ च्या उपबंधांनुसार कार्यवाही करता येईल.
४) जर दंडाधिकाऱ्यास, पोटकलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेली व्यक्ती ही मनोविकल व्यक्ती असल्याची माहिती मिळालेली असेल तर, दंडाधिकरी, मनोविकलतेमुळे आरोपी व्यक्ती आपला बचाव करण्यास अक्षम आहे किंवा कसे हे देखील निर्धारित करील आणि जर आरोपी व्यक्ती, अशा प्रकारे अक्षम असल्याचे आढळून आले असेल तर, दंडाधिकारी, तशा अर्थाचा निष्कर्ष नोंदवील, आणि अभियोगपक्षाने सादर केलेल्या पुराव्याच्या अभिलेखाची तपासणी करील आणि आरोपीच्या वकिलाची सुनावणी घेतल्यानंतर परंतु आरोपी व्यक्तीस प्रश्न न विचारता, सकृतदर्शनी आरोपी व्यक्तीविरूध्द कोणतेही प्रकरण तयार केलेले नाही असे त्यास आढळून आले असेल तर, तो चौकशी लांबणीवर टाकण्याऐवजी, आरोपी व्यक्तीला मुक्त करील आणि कलम ३६९ अन्वये तरतूद केलेल्या रीतीने तिच्याबाबत कार्यवाही करील :
परंतु, दंडाधिाकऱ्यास ज्या आरोपी व्यक्तीच्या बाबतीत, ती मनोविकल असल्याबाबतचा निष्कर्ष आला असेल, त्या व्यक्तीविरूध्द सकृतदर्शनी प्रकरण तयार करता येत असे आढळून आले असेल तर, तो मनोविकृती चिकित्सकाच्या किंवा चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञाच्या मते आरोपी व्यक्तीवर उपचार करण्यासाठी जो कालावधी आवश्यक असेल तितक्या कालावधीसाठी आरोपी व्यक्तीबाबत कार्यवाही लांबणीवर टाकील, आणि कलम ३६९ अन्वये तरतूद केल्याप्रमाणे कार्यवाही करण्याचा आदेश देईल.
५) जर अशा दंडाधिकाऱ्यास, पोटकलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेली व्यक्ती ही, बौद्धिक दिव्यांगताने ग्रस्त व्यक्ती असल्याची माहिती मिळालेली असेल तर, दंडाधिाकरी अशी मनोविकलतेमुळे आरोपी व्यक्ती तिचा बचाव करण्यास अक्षम आहे किंवा कसे हे देखील निर्धारित करील आणि जर आरोपी व्यक्ती अशाप्रकारे अक्षम असल्याचे आढळून आले असेल तर, दंडाधिकारी चौकशी बंद करण्याचा आदेश देईल आणि कलम ३६९ अन्वये तरतूद केलेल्या रीतीने आरोपी व्यक्तीबाबत कार्यवाही करील.

Exit mobile version