Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम २३९ : न्यायालयाला दोषारोपात फेरबदल करता येईल :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २३९ :
न्यायालयाला दोषारोपात फेरबदल करता येईल :
१) न्यायनिर्णय अधिघोषित करण्यापूर्वी कोणत्याही न्यायालयाला दोषारोपात कोणताही फेरबदल करता येईल किंवा त्यात अधिक भर घालता येईल.
२) याप्रमाणे फेरबदल केलेला किंवा अधिक घातलेला प्रत्येक मजकूर आरोपीला वाचून दाखवण्यात येईल व समजावून देण्यात येईल.
३) संपरीक्षा पुढे चालवणे हे न्यायालयाच्या मते, आरोपीला आपला बचाव करण्यात किंवा फिर्यादीला खटला चालवण्यात बाधक होण्याच संभव नाही असे दोषारोपातील फेरबदलाचे किंवा अधिक घातलेल्या मजकुराचे स्वरूप असेल तर, असा फेरबदल करण्यात आल्यानंतर किंवा अधिक मजकूर घालण्यात आल्यानंतर स्वविवेकानुसार न्यायालयाला फेरबदल केलेला किंवा अधिक मजकूर घातलेला दोषारोप जणू काही मूळचा दोषारोप असावा त्याप्रमाणे संपरीक्षा पुढे चालवता येईल.
४) संपरीक्षा तत्काळ पुढे चालवणे हे न्यायालयाच्या मते, आरोपीला किंवा फिर्यादीला पूर्वोक्ताप्रमाणे बाधक होण्याचा संभव आहे असे त्या फेरबदलाचे किंवा अधिक घातलेल्या मजकुराचे स्वरूप असेल तर, न्यायालय नव्याने संपरीक्षा करण्याचा निदेश देऊ शकेल किंवा जरूर असेल तितक्या काळापुरती संपरीक्षा तहकूब करू शकेल.
५) फेरबदल केलेल्या किंवा अधिक भर घातलेल्या दोषारोपात नमूद केलेला अपराध हा ज्याबद्दलच्या खटल्यासाठी पूर्वमंजूरीची जरूरी असते असा अपराध असेल तर, फेरबदल केलेला किंवा अधिक भर घातलेला दोषारोप ज्यांवर आधारलेला आहे त्याच तथ्यांवरून खटल्यसाठी आधीच मंजुरी मिळवलेली नसल्यास, अशी मंजुरी मिळेपर्यंत त्या प्रकरणात पुढे कार्यवाही केली जाणार नाही.

Exit mobile version