भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ६५ :
निगमित निकाय, फर्म आणि सोसायट्या यांचेवर समन्स बजाविणे :
१) कंपनी किंवा निगमावर करावयाची समन्सची बजावणी ते कंपनी किंवा निगमाचा संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा अन्य अधिकारी यांच्यावर बजावून अथवा कंपनीचा किंवा निगमाचा भारतातील संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा अन्य अधिकारी असेल त्याला उद्देशून लिहिलेल्या व नोंदणी डाकेने पाठवलेल्या पत्राव्दारे करता येईल व त्या बाबतीत डाकेच्या सामान्य क्रमानुसार पत्र ज्या वेळी येऊ शकेल त्या वेळी बजावणी घडून आल्याचे मानले जाईल.
स्पष्टीकरण :
या कलमात कंपनी याचा अर्थ कोणतीही निगमित कंपनी असा आहे आणि निगम याचा अर्थ, कंपनी अधिनियम २०१३ (२०१३ चा १८) अन्वये नोंदणी केलेली निगमित कंपनी किंवा अन्य निगम-निकाय किंवा सोसायटी नोंदणी अधिनियम, १८६० (१८६० चा २१) याखाली नोंदणी केलेल्या सोसायटी असा आहे.
२) एखाद्या फर्म (पेढी) किंवा व्यक्तींची इतर संस्था (संघटना / संगम) वर करावयाची समन्सची बजावणी ते फर्म (पेढी) किंवा संस्था (संघटना / संगम) च्या भागीदारावर बजावून अथवा अशा भागीदाराला उद्देशून लिहलेल्या व नोंदणी डाकेने पाठवलेल्या पत्राद्वारे करता येईल व त्या बाबतीत डाकेच्या सामान्य क्रमानुसार पत्र ज्या वेळी येऊ शकेल त्या वेळी बजावणी घडून आल्याचे मानले जाईल.