भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३६८ :
न्यायलयासमोर संपरीक्षा केल्या जाणाऱ्या मनोविकल व्यक्तीच्या बाबतीतील प्रक्रिया :
१) दंडाधिकाऱ्यासमोर किंवा सत्र न्यायालयासमोर कोणत्याही व्यक्तीची संपरीक्षा चालू असताना जर, अशा व्यक्ती मनोविकल आहे व त्यामुळे आपला बचाव करण्यास अक्षम आहे असे दंडाधिाकाऱ्याला किंवा न्यायालयाला वाटले तर, तो दंडाधिकारी किंवा ते न्यायालय प्रथमत: अशा मनोविकलतेच्या किंवा अक्षमतेच्या तथ्याबाबत संपरीक्षा करील आणि आपणांसमोर हजर केला जाईल असा वैद्यकीय किंवा अन्य पुरावा विचारात घेतल्यानंतर त्या तथ्याबाबत आपली खात्री झाली तर, तो दंडाधिकारी किंवा ते न्यायालय तशा आशयाचा निष्कर्ष नमूद करील व खटल्यातील पुढील कामकाज लांबणीवर टाकील.
२) जर न्याय चौकशीमध्ये दंडाधिकाऱ्यास किंवा सत्र न्यायालयास आरोपी व्यक्ती मनोविकल असल्याचे आढळून आले असेल तर, तो किंवा ते अशा व्यक्तीची काळजी घेण्यासाठी व तिच्यावर उपचार करण्यासाठी अशी व्यक्तीस मनोविकृती चिकित्सकाकडे किंवा चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञाकडे पाठवील आणि असा मनोविकृती चिकित्सक किंवा यथास्थिती, चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ अशी आरोपी व्यक्ती, मनोविकल व्यक्ती आहे किंवा कसे याबाबत दंडाधिकाऱ्यास किंवा न्यायालयास माहिती देईल.
परंतु,जर मनोविकृती चिकित्सकाने किंवा यथास्थिती, चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञाने दंडाधिकाऱ्यास दिलेल्या माहितीमुळे आरोपी व्यक्ती व्यथित झाली असेल तर, ती पुढील व्यक्तीचा समावेश असलेल्या वैद्यकीय मंडळासमोर अपील दाखल करील :
(a) क) (अ) नजीकच्या शासकीय रूग्णालयातील मनोविकृतीचिकित्सा शास्त्र युनिटाचा प्रमुख; आणि
(b) ख) (ब) नजीकच्या वैद्यकीय महाविद्यालयातील मनोविकृतिचिकित्सा शास्त्र विद्याशाखेंतील सदस्य.
३) जर अशा दंडाधिकाऱ्या किंवा न्यायालयास, पोट-कलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेली व्यक्ती ही मनोविकल व्यक्ती असल्याची माहिती मिळालेली असेल तर, दंडाधिकारी किंवा न्यायालय, मनोविकलतेमुळे आरोपी व्यक्ती तिचा बचाव करण्यास अक्षम आहे किंवा कसे हे देखील निर्धारित करील आणि जर आरोपी व्यक्ती, अशा प्रकारे अक्षम असल्याचे आढळून आले असेल तर, दंडाधिकारी किंवा न्यायालय, तशा अर्थाचा निष्कर्ष नोंदवील, आणि अभियोगपक्षाने सादर केलेल्या पुराव्याच्या अभिलेखाची तपासणी करील आणि आरोपीच्या वकीलाची सुनावणी घेतल्यानंतर परंतु आरोपी व्यक्तीस प्रश्न न विचारता, सकृतदर्शनी आरोपी व्यक्तीविरूध्द कोणतेही प्रकरण तयार केलेले नाही असे दंडाधिकाऱ्यास किंवा न्यायालयास आढळून आले असेल तर, तो किंवा ते न्यायचौकशी लांबणीवर टाकण्याऐवजी आरोपी व्यक्तीला मुक्त करील आणि ३६९ अन्वये तरतूद केलेल्या रीतीने तिच्याबाबत कार्यवाही करील :
परंतु, दंडाधिकाऱ्यास किंवा न्यायालयास ज्या आरोपी व्यक्तीच्या बाबतीत, ती मनोविकल असल्याबाबतचा निष्कर्ष आला असेल त्या व्यक्तीविरूध्द सकृतदर्शनी प्रकरण तयार करता येते असे आढळून आले असेल तर, तो मनोविकृती चिकित्सकाच्या किंवा चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञाच्या मते, आरोपी व्यक्तीवर उपचार करण्यासाठी जो कालावधी आवश्यक असेल तितक्या कालावधीसाठी कार्यवाही लांबणीवर टाकील.
४) जर अशा दंडाधिकाऱ्यास किंवा न्यायालयास, सकृतदर्शनी आरोपी व्यक्तीविरूध्द प्रकरण तयार करता येते आणि ती व्यक्ती बौद्धिक द्विव्यांगतेमुळे तिचा बचाव करण्यास अक्षम आहे असे आढळून आले असेल तर, दंडाधिकारी किंवा न्यायालय, न्यायचौकशी सुरू करणार नाही आणि कलम ३६९ अन्वये तरतूद केल्यानुसार आरोपी व्यक्तीबाबत कार्यवाही करील.