भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३५३ :
आरोपी व्यक्ती साक्षीदार होण्यास सक्षम :
१) फौजदारी न्यायालयापुढे अपराधाचा आरोप ठेवण्यात आलेली कोणतीही व्यक्ती बचावपक्षाच्या बाजूने साक्षीदार होण्यास सक्षम असेल व स्वत:विरूध्द किंवा त्याच संपरीक्षेत आपल्या बरोबरीने दोषारोप ठेवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीविरूध्द केलेल्या दोषारोपांच्या नाशाबितीसाठी तिला शपथेवर साक्ष देता येईल :
परंतु ,-
(a) क) (अ) त्या व्यक्तीला तिच्या स्वत:च्या लेखी विनंतीखेरीज साक्षीदार म्हणून बोलावले जाणार नाही;
(b) ख) (ब) तिने साक्ष न देणे हे पक्षकारांपैकी कोणलाही किंवा न्यायालयाला कोणत्याही प्रकारे टीकाविषय करता येणार नाही अथवा त्यामुळे, तिच्याविरूध्द किंवा त्याच संपरीक्षेत तिच्या बरोबरीने दोषारोप ठेवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीविरूध्द कोणतेही गृहीतक संभवणार नाही.
२) ज्या कोणत्याही व्यक्तीविरूध्द कोणत्याही फौजदारी न्यायालयात कलम १०१ किंवा कलम १२६ किंवा कलम १२७ किंवा १२८ किंवा कलम १२९ किंवा प्रकरण १० वे किंवा ११ व्या प्रकरणाचा भाग (b) ख, भाग (c) ग किंवा भाग (d) घ याखाली कार्यवाही दाखल करण्यात आली असेल तिला अशा कार्यवाहीत स्वत: साक्षीदार म्हणून पुढे होता येईल:
परंतु, कलम १२७, कलम १२८ किंवा कलम १२९ खालील कार्यवाहीत अशा व्यक्तीने साक्ष न देणे हे पक्षकारांपैकी कोणालाही किंवा न्यायालयाला कोणत्याही प्रकारे टीकाविषय करता येणार नाही अथवा त्यामुळे, तिच्याविरूध्द किंवा त्याच संपरीक्षेत तिच्या बरोबरीने कार्यवाही करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीविरूध्द कोणतेही गृहीतक संभवणार नाही.