भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २७३ :
वाजवी कारणाशिवाय आरोप केल्याबद्दल भरपाई :
१) देण्यात आलेल्या फिर्यादीवरून अथवा पोलीस अधिकाऱ्याला किंवा दंडाधिकाऱ्याला देण्यात आलेल्या वर्दीवरून गुदरलेल्या कोणत्याही खटल्यात, दंडाधिकाऱ्याने संपरीक्षा करण्याजोग्या कोणत्याही अपराधाचा एका व्यक्तीवर किंवा अनेक व्यक्तींवर दंडाधिकाऱ्यासमोर आरोप करण्यात आला असेल आणि ज्याने त्या खटल्याची सुनावणी केली त्या दंडाधिकाऱ्याने सर्व आरोपींना किंवा त्यांपैकी कोणालाही विनादोषारोप सोडले असेल किंवा दोषमुक्त केले असेल आणि त्यांच्याविरूध्द किंवा त्यांच्यापैकी कोणाहीविरूध्द आरोप करण्यास वाजवी कारण नव्हते असे त्याचे मत असले तर, आपण काढलेल्या विनादोषारोप सुटकेच्या किंवा दोषमुक्तीच्या आदेशाव्दारे दंडाधिकारी, ज्या व्यक्तीच्या फिर्यादीवरून किंवा वर्दीवरून आरोप ठेवण्यात आला ती व्यक्ती उपस्थित असल्यास, अशा आरोपीला अथवा एकापेक्षा अधिक आरोपी असतील तेव्हा अशा आरोपींपैकी प्रत्येकाला किंवा कोणालाही तिने भरपाई का देऊ नये याबद्दल तत्काळ कारण दाखवण्यास तिला फर्मावू शकेल; अथवा जर अशी व्यक्ती उपस्थित नसेल तर, तिने उपस्थित होऊन वर सांगितल्याप्रमाणे करण दाखवावे यासाठी तिच्यावर समन्स काढण्याचा निदेश देऊ शकेल.
२) असा फिर्याददार किंवा वर्दीदार जे कोणतेही कारण दाखवील ते दंडाधिकारी नमूद करील आणि विचारात घेईल, आणि आरोप करण्यास वाजवी कारण नव्हते याबद्दल स्वत:ची खात्री झाली तर, कारणे नमूद करून या कारणास्तव तो दंडाधिकारी जास्तीतजास्त जेवढा द्रव्यदंड करण्याचा त्याला अधिकार आहे तेवढ्या मर्यादेपर्यंत तो ठरवील एकढी भरपाई रक्कम अशा फिर्याददाराने किंवा वर्दीदाराने आरोपीस किंवा त्यांच्यापैकी प्रत्येकास किंवा कोणासही द्यावी असा आदेश काढू शकेल.
३) पोटकलम (२) खाली भरपाई देण्याचे निदेशित करणारा आदेश काढताना ज्या व्यक्तीने अशी भरपाई द्यावी असा आदेश देण्यात येत आहे त्या व्यक्तीने ती देण्यात कसूर केल्यास, तिला जास्तीत जास्त तीस दिवस इतक्या मुदतीची साध्या कारवासाची शिक्षा भोगावी लागेल असेही आणखी दंडाधिकारी त्या आदेशाव्दारे फर्मावू शकेल.
४) जेव्हा कोणत्याही व्यक्तीला पोटकलम (३) खाली कारावासात ठेवले जाईल तेव्हा, भारतीय न्याय संहिता २०२३ याची कलम ८ च्या पोटकलम (६) चे उपबंध, शक्य तेथवर, लागू होतील.
५) या कलमाखाली भरपाई देण्याचा निदेश जिला देण्यात आला असेल अशा कोणत्याही व्यक्तीला अशा आदेशामुळे, तिने दिलेल्या फिर्यादीबाबतच्या किंवा दिलेल्या वर्दीबाबतच्या कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी दायित्वातून सूट मिळणार नाही:
परंतु कलमाखालील आरोपी व्यक्तीला दिलेली कोणतीही रक्कम, त्याच बाबीच्या संबंधातील कोणत्याही नंतरच्या दिवाणी दाव्यात अशा व्यक्तीला भरपाई देववताना हिशेबात घेतली जाईल.
६) पोटकलम (२) खाली ज्या फिर्याददाराला किंवा वर्दीदाराला द्वितीय वर्ग दंडाधिकाऱ्याने शंभर रूपयांपेक्षा जास्त भरपाई देण्याचा आदेश दिलेला असेल अशा फिर्याददाराला किंवा वर्दीदाराला अशा न्यायाधीशाने केलेल्या संपरीक्षेत जणू काही सिध्ददोष ठरवलेले असावे त्याप्रमाणे त्याला त्या आदेशावर अपील करता येईल.
७) जेव्हा आरोपी व्यक्तीला भरपाई देण्याचा आदेश काढलेला असून पोटकलम (६)खाली ते प्रकरण अपिलास पात्र असेल तर, अपील सादर करण्यासाठी देण्यात आलेला कालावधी संपण्यापूर्वी अथवा अपील सादर करण्यात आले तर अपिलाचा निर्णय लागण्यापूर्वी तिला भरपाई देण्यात येणार नाही; आणि असा भरपाईचा आदेश देण्यात आलेला असून, ते प्रकरण याप्रमाणे अपिलास पात्र नसेल तर; आदेशाच्या दिनांकापासून एक महिना संपण्यापूर्वी भरपाई देण्यात येणार नाही.
८) या कलमाचे उपबंध समन्स-खटल्यांना व त्याचप्रमाणे वॉरंट-खटल्यांना लागू आहेत.