भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २३६ :
अपराधाची रीत नमूद करणे केव्हा आवश्यक :
२३४ व २३५ या कलमात उल्लेखिलेला तपशील आरोपीवर ज्या गोष्टीचा दोषारोप ठेवण्यात तिची पुरेशी जाणीव देत नाही असे त्या प्रकरणाचे स्वरूप असेल तेव्हा, दोषारोपात अभिकथित अपराध ज्या रीतीने करण्यात आला तीसंबंधी त्या प्रयोजनार्थ पुरेसा होईल असा तपशील अंतर्भूत असेल.
उदाहरणे :
(a) क) (क) वर विवक्षित वेळी व स्थळी विवक्षित वस्तूची चोरी केल्याचा आरोप आहे. कोणत्या रीतीने चोरी करण्यात आली ते दोषारोपात मांडण्याची जरुरी नाही.
(b) ख) (क) वर विवक्षित वेळी व स्थळी (ख) ला ठवल्याचा आरोप आहे. कोणत्या रीतीने (क) ने (ख) ला ठकवले ते दोषारोपात मांडले पाहिजे.
(c) ग) (क) वर विवक्षित वेळी व स्थळी खोटी साक्ष दिल्याचा आरोप आहे. (क) ने दिलेल्या साक्षीचा जो भाग खोटा असल्याचचे अभिकथन करण्यात आले असेल तो भाग दोषारोपात मांडला पाहिजे.
(d) घ) (ख) हा लोक सेवक विवक्षित वेळी व स्थळी आपली सरकारी कामे पार पाडत असताना त्याला अडथळा केल्याला (क) आरोप आहे. (ख) आपली सरकारी कामे पार पाडत असताना (क) ने त्याला कोणत्या रीतीने अडथळा केला ते दोषारोपात मांडले पाहिजे.
(e) ङ) (क) वर विवक्षित वेळी व स्थळी (ख) चा खून केल्याचा आरोप आहे. कोणत्या रीतीने (क) ने (ख) चा खून केला ते दोषारोपात मांडण्याची जरुरी नाही.
(f) च) (क) वर (ख) ला वाचवण्याच्या उद्देशाने कायद्याच्या निदेशाची अवज्ञा केल्याचा आरोप आहे. कोणत्या प्रकारच्या अवज्ञेचा दोषारोप ठेवण्यात आला व कोणत्या कायद्याचे उल्लंघन झाले ते दोषारोपात मांडले पाहिजे.