Bnss कलम २३४ : दोषारोपांचा मजकूर :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण १८ :
दोषारोप :
(A) क) (अ) – दोषारोपाचे स्वरुप :
कलम २३४ :
दोषारोपांचा मजकूर :
१) या संहितेखालील प्रत्येक दोषारोपात, आरोपीवर ज्या अपराधाचा दोषारोप ठेवण्यात आला असेल तो नमूद केला जाईल.
२) ज्या कायद्याव्दारे तो अपराध ठरवण्यात आला असेल त्यात या अपराधाला एखादे निश्चित नाव दिलेले असेल तर, दोषारोपात त्या अपराधाचे त्याच नावाने वर्णन केले जाईल.
३) ज्या कायद्याद्वारे तो अपराध ठरवण्यात आला असेल त्यात त्या अपराधाला कोणतेही निश्चित नाव दिलेले नसेल तर, आरोपीवर ज्या गोष्टीचा दोषारोप ठेवण्यात येईल त्याची आरोपीला जाणीव देण्यास पुरेसा इतका त्या अपराधाच्या व्याख्येचा भाग नमूद केला जाईल.
४) ज्याविरूध्द अपराध घडला असल्याचे म्हटलेले असेल त्या कायद्याचा आणि कायद्याच्या त्या कलमाचा उल्लेख दोषारोपात केला जाईल.
५) दोषारोप ठेवण्यात आला आहे ही वस्तुस्थिती म्हणजे ज्याचा दोषारोप ठेवण्यात आला तो अपराध घडण्यासाठी कायद्याने अपेक्षित असलेल्या प्रत्येक वैध आवश्यक घटकाची त्या विशिष्ट प्रकरणात पूर्तता झालेली आहे असे म्हणण्यासारखेच आहे.
६) दोषारोप न्यायालयाच्या भाषेत लिहिण्यात येईल.
७) जर पूर्वी कोणत्याही अपराधाबद्दल सिध्ददोष झालेला आरोपी, अशा पूर्वीच्या दोषसिध्दीमुळे नंतरच्या अपराधाबद्दल वाढीव शिक्षेस किंवा निराळया प्रकारच्या शिक्षेस पात्र असेल आणि नंतरच्या अपराधाबद्दल जी शिक्षा देणे न्यायालयाला योग्य वाटेल तिच्यावर परिणाम करण्याच्या हेतूने अशी पूर्वीची दोषसिध्दी शाबीत करणे उद्देशित असेल तर, पर्वीची दोषसिध्दी झाली होती हे तथ्य, त्याचा दिनांक व स्थळ दोषारोपात नमूद केले जाईल; आणि असे कोणतेही विधान वगळण्यात आले असेल तर, शिक्षादेश देण्यापूर्वी कोणत्याही वेळी न्यायालयाला ते त्यात घालता येईल.
उदाहरणे :
(a) क) (क) वर (ख) च्या खुनाचा दोषारोप ठेवलेला आहे. हा दोषारोप करणे म्हणजे (क) ची कृती भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या १०० आणि १०१ या कलमांमध्ये दिलेल्या खुनाच्या व्याख्येत मोडत असून, ती उक्त संहितेतील कोणत्याही सर्वसाधारण अपवादात बसत नाही, आणि ती कृती कलम १०१ च्या पाच अपवादांपैकी कोणत्याही अपवादात येत नाही किंवा जर ती कृती पहिल्या अपवादाच्या अंतर्गत येत असलीच तर त्या अपवादाच्या तीन परंतुकापैकी एक किंवा अन्य परंतुके तिला लागू होती असे विधान करण्यासारखे आहे.
(b) ख) भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ११८ च्या पोटकलम (२) खाली गोळीबार करण्याच्या साधनाने (ख) ला बुद्धिपुरस्सर जबर दुखापत केल्याचा दोषारोप (क) वर ठेवण्यात आला आहे. हा दोषारोप म्हणजे उक्त संहितेच्या कलम १२२ च्या पोटकलम (२) द्वारे या प्रकरणाबाबत उपबंध केलेला नव्हता आणि सर्वसाधारण अपवाद त्याला लागू होत नव्हते असे म्हणण्यासारखे आहे.
(c) ग) (क) वर खुनाचा, ठकवणुकीचा, चोरीचा, बलाद्ग्रहणाचा किंवा फौजदारीपात्र धाकदपटशाचा किंवा खोटे स्वामित्व-चिन्ह वापरल्याचा आरोप आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ यात अंतर्भूत असलेल्या त्या त्या अपराधाच्या व्याख्येचा निर्देश न करता दोषारोपात, (क) ने खून किंवा ठकवणूक किंवा चोरी किंवा बलाद्ग्रहण किंवा फौजदारीपात्र धाकदपटशा हा अपराध केला किंवा त्याने खोटे स्वामित्व-चिन्ह वापरले असे नमूद करता येईल; पण ज्या कलमाखाली अपराध शिक्षापात्र आहे ती कलमे दोषारोपात प्रत्येक बाबतीत निर्देशिली पाहिजेत.
(d) घ) (क) वर, लोकसेवकाच्या वैध प्राधिकारान्वये विक्रीला काढलेल्या संपत्तीच्या विक्रीला उद्देशपूर्वक अडथळा आणण्याचा दोषारोप भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम २१९ खाली ठेवण्यात आला आहे. दोषारोप त्या शब्दांत असावा.

Leave a Reply