भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण १७ :
दंडाधिकाऱ्यापुढे कार्यवाही सुरु करणे :
कलम २२७ :
आदेशिका काढणे :
१) जर अपराधाची दखल घेणाऱ्या दंडाधिकाऱ्याच्या मते पुढील कार्यवाही करण्यास पुरेसे कारण असेल आणि तो खटला:
(a) क) (अ) समन्स-खटला असल्याचे दिसत असेल तर, तो आरोपीच्या समक्ष हजेरीसाठी आपले समन्स काढील; किंवा
(b) ख) (ब) वॉरंट खटला असल्याचे दिसत असेल तर अशा दंडाधिकाऱ्यापुढे किंवा (त्याला स्वत:ला अधिकारिता नसल्यास) अधिकारिता असलेल्या अन्य एखाद्या दंडाधिकाऱ्यापुढे विवक्षित वेळी आरोपीला आणवण्यासाठी तो एक वॉरंट किंवा आपणांस योग्य वाटल्यास, त्याला तेथे उपस्थित व्हावयास लावण्यासाठी एक समन्स काढू शकेल :
परंतु समन्स किंवा वॉरंट इलैक्ट्रॉनिक साधनांमार्फत जारी केले जाऊ शकतील.
२) फिर्यादीपक्षाच्या साक्षीदारांची यादी दाखल केली जाईपर्यंत आरोपीविरूध्द पोटकलम (१) खाली कोणतेही समन्स किंवा वॉरंट काढले जाणार नाही.
३) लेखी फिर्यादीवरून सुरू केलेल्या कार्यवाहीत, पोटकलम (१) खाली काढलेल्या प्रत्येक समन्सबरोबर किंवा वॉरंटाबरोबर अशा फिर्यादीची प्रत असेल :
४) जेव्हा त्या त्या काळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यानुसार कोणतीही आदेशिका-फी किंवा अन्य फी प्रदेय असेल तेव्हा, फी भरण्यात येईपर्यंत कोणतीही आदेशिका काढली जाणार नाही, आणि अशी फी वाजवी अवधीत भरली गेली नाही तर, दंडाधिकाऱ्याला फिर्याद काढून टाकता येईल.
५) या कलमातील कोणतीही गोष्ट कलम ९० च्या उपबंधावर परिणाम करत असल्याचे मानले जाणार नाही.