Bnss कलम १९४ : आत्महत्या वगैरेबाबत पोलिसांनी चौकशी करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १९४ :
आत्महत्या वगैरेबाबत पोलिसांनी चौकशी करणे :
१) एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे अथवा दुसऱ्याकडून किंवा एखाद्या जनावराकडून किंवा यंत्राद्वारे किंवा अपघाताने तिची हत्या घडून आलेली आहे अथवा अशा परिस्थितीत ती मृत्यू पावली आहे की, अन्य एखाद्या व्यक्तीने अपराध केलेला असावा असा वाजवी संशय निर्माण होतो अशी जेव्हा पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला किंवा राज्य शासनाने त्या संबंधात खास अधिकार प्रदान केलेल्या अन्य एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला खबर मिळेल तेव्हा, मरणान्वेषण करण्याचा अधिकार प्रदान झालेल्या सर्वात जवळच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याला तो तत्काळ त्याची सूचना देईल आणि राज्य शासनाने विहित केलेल्या कोणत्याही नियमाद्वारे अथवा जिल्हा किंवा उप-विभागीय दंडाधिकाऱ्याच्या कोणत्याही सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे अन्यथा निदेशित करण्यात आले नसेल तर, जेथे अशा मृत व्यक्तीचा देह असेल त्या जागी तो जाईल व तेथे जवळपासच्या दोन किंवा अधिक प्रतिष्ठित रहिवाशांच्या समक्ष अन्वेषण करील व त्या मृतदेहावर जेथे कोठे जखमा झाल्याचे, हाड मोडल्याचे. अंग खरचटल्याचे आणि दुखापतीच्या इतर खुणा असल्याचे आढळून येईल त्यांचे वर्णन व कशा प्रकारे किंवा कोणत्या हत्यारामुळे किंवा साधनामुळे (वापरले असल्यास) अशा खुणा झाल्या असल्याचे दिसते ते नमूद करून मृत्यूच्या दर्शनी कारणांचा अहवाल तयार करील.
२) पोलीस अधिकारी व अन्य व्यक्ती यांना किंवा त्यांच्यापैकी जितक्या व्यक्ती त्या अहवालाशी सहमत असतील तितक्या व्यक्तींना त्यावर स्वाक्षरी करावी लागेल व तो २४ तासाच्या आत जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे किंवा उप-विभागीय दंडाधिकाऱ्याकडे पाठवला जाईल.
३) जेव्हा –
एक) ते प्रकरण एखाद्या स्त्रीने तिचा विवाह झाल्यापासून सात वर्षाच्या आत आत्महत्या केल्यासंबंधीचे असेल तेव्हा; किंवा
दोन) ते प्रकरण एखाद्या स्त्रीचा, विवाह झाल्यापासून सात वर्षांच्या आत अशा कोणत्याही परिस्थितीत तिचा मृत्यू घडण्यासंबंधीचे असेल की, ज्या परिस्थितीत असा स्त्रीच्या संबंधात दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने अपराध केलेला असावा असा वाजवी संशय निर्माण होऊ शकतो तेव्हा; किंवा
तीन) ते प्रकरण एखाद्या स्त्रीचा विवाह झाल्यापासून सात वर्षांच्या आत तिचा मृत्यू घडण्यासंबंधीचे असेल आणि त्या स्त्रीच्या कोणत्याही नातलगाने विनंती केली असेल तेव्हा; किंवा
चार) मृत्यूच्या कारणांविषयी कोणताही संशय असेल तेव्हा; किंवा
पाच) इतर कोणत्याही कारणासाठी पोलीस अधिकाऱ्याला तसे करणे समयोचित वाटेल तेव्हा,
राज्यशासन यासंबंधात विहित करील नियमांच्या अधीनतेने, तो पोलीस अधिकारी त्या मृतदेहाची तपासणी केली जावी या हेतून सर्वांत जवळच्या जिल्हा शल्यचिकित्सकाकडे किंवा राज्य शासनाने यासंबंधात नियुक्त केलेला व्यक्ती अन्य अर्हताप्राप्त वैद्यकीय तज्ज्ञाकडे तो मृतदेह पाठवील मात्र जेणेकरून अशी तपासणी निरूपयोगी होईल इतपत तो मृतदेह वाटेत कुजेल असा धोका न पत्करता तो याप्रमाणे पाठवणे शक्य व्हावे अशा प्रकारे हवामानाची स्थिती व अंतर अनुकूल असावे.
४) मरणान्वेषण करण्यास पुढील दंडाधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्यात आला आहे, ते असे; कोणताही जिल्हा दंडाधिकारी किंवा उप-विभागीय दंडाधिकारी व राज्य शासनाने किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्याने या संबंधात खास अधिकार प्रदान केलेला अन्य कोणताही कार्यकारी दंडाधिकारी.

Leave a Reply