भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १६६ :
जमिनीचा किंवा पाण्याचा वापर करण्याच्या हक्कासंबंधीचा तंटा :
१) आपल्या स्थानिक अधिकारितेतील कोणत्याही जमिनीचा किंवा पाण्याचा वापर करण्याच्या अभिकथित हक्काविषयी-मग असा हक्क सुविधाधिकार म्हणून सांगितलेला असो वा अन्य प्रकारे असो- ज्यामुळे शांतताभंग होण्याचा संभव आहे असा एखादा तंटा अस्तित्वात आहे अशी जेव्हा केव्हा पोलीस अधिकाऱ्याच्या अहवालावरून किंवा मिळालेल्या अन्य खबरीवरून कार्यकारी दंडाधिकाऱ्याची खात्री होईल तेव्हा, तो याप्रमाणे आपली खात्री झाल्याची कारणे निवेदन करून एक लेखी आदेश काढील आणि त्याव्दारे, अशा तंटयाशी संबंधित असणाऱ्या पक्षांना आपल्या कार्यालयात विनिर्दिष्ट दिनांकी व वेळी, जातीने किंवा वकिलामार्फ त हजर राहण्यास आणि आपापल्या दाव्यांची लेखी निवेदने मांडण्यास फर्मावील.
स्पष्टीकरण :
या पोटकलमाच्या प्रयाजेनासाठी जमीन किंवा पाणी या शब्दप्रयोगाला, कलम १६४ च्या पोटकलम, (२) मध्ये दिलेला अर्थ आहे.
२) त्यानंतर दंडाधिकारी याप्रमाणे मांडलेल्या निवेदनाचे अवलोकन करील, पक्षांचे म्हणणे ऐकून घेईल, त्यांच्यापैकी प्रत्येकजण हजर करील असा सर्व पुरावा स्वीकारील, अशा पुराव्याचा परिणाम विचारात घेईल, त्याला जरूर वाटल्यास तसा आणखी पुरावा घेईल आणि शक्य असल्यास, असा हक्क विद्यमान आहे किंवा काय हे निर्णित करील; आणि कलम १६४ चे उपबंध, शक्य तेथवर, अशा चौकशीच्या बाबतीत लागू होतील.
३) असा हक्क विद्यमान आहे असे जर अशा दंडाधिकाऱ्याला दिसून आले तर, अशा हक्काच्या वापरास कसलीही आडकाठी करण्यास मनाई करणारा आदेश व योग्य बाबतीत अशा कोणत्याही हक्काच्या वापरास असलेला अडथळा दूर करण्यासाठी द्यावयाचा आदेशसुध्दा तो देऊ शकेल :
परंतु,जर तो हक्क बारमहा वापरता येण्यासारखा असेल तर, ज्यामुळे चौकशी सूरू करावी लागली असा पोटकलम (१) खालील पोलीस अधिकाऱ्याचा अहवाल किंवा अशी अन्य खबर मिळण्याच्या लगतपूर्वीच्या तीन महिन्यांमध्ये असा हक्क वापरलेला असल्याशिवाय अथवा जर तो हक्क केवळ किंवा विशिष्ट हंगामात किंवा विशिष्ट प्रसंगीच वापरता येण्यासारखा असेल तर असा अहवाल किंवा खबर मिळण्यापूर्वीच्या अशा हंगामांपैकी अखेरच्या हंगामाला किंवा अशा प्रसंगांपैकी अखेरच्या प्रसंगी असा हक्क वापरलेला असल्याशिवाय असा कोणताही आदेश काढण्यात येणार नाही.
४) कलम १६४ च्या पोटकलम (१)खाली सुरू केलेल्या कोणत्याही कार्यवाहीत जेव्हा, जमिनीचा किंवा पाण्याचा वापर करण्याच्या अभिकथित हक्काविषयी तंटा आहे असे दंडाधिकाऱ्याला आढळून येईल तेव्हा, ती कार्यवाही जणू काही पोटकलम (१) खाली सुरू केलेली असावी त्याप्रमाणे ती त्याला आपल्या कारणांची नोंद करून पुढे चालू ठेवाता येईल.
आणि पोटकलम (१) खाली सुरू केलेल्या कोणत्याही कार्यवाहीत जेव्हा, कलम १६४ खाली त्या तंटयाचा परामर्श घेतला पाहिजे असे दंडाधिकाऱ्याला आढळून येईल तेव्हा, ती कार्यवाही जणू काही कलम १६४ च्या पोटकलम (१) खाली सुरू केली असावी त्याप्रमाणे ती त्याला आपल्या कारणांची नोंद करून पुढे चालू ठेवता येईल.