Bnss कलम १४५ : (निर्वाह-भत्ता अर्ज चालण्याची पध्दत) प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १४५ :
(निर्वाह-भत्ता अर्ज चालण्याची पध्दत) प्रक्रिया :
१) कलम १४४ खालील कार्यवाही कोणत्याही व्यक्तीविरूध्द :
(a) क) (अ) ती व्यक्ती जेथे असेल, किंवा
(b) ख) (ब) जेथे ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीची पत्नी राहत असेल, किंवा
(c) ग) (क) जेथे ती व्यक्ती आपल्या पत्नीबरोबर किंवा प्रकरणपरत्वे, अनौरस अपत्याच्या आईबरोबर निकटपूर्वी राहिला असेल, किंवा
(d) घ) (ड) जेथे त्या व्यक्तीचे वडील राहत असेल किंवा त्या व्यक्तीची आई राहत असेल,
अशा कोणत्याही जिल्ह्यात करता येईल.
२) अशा कार्यवाहीतील सर्व पुरावा निर्वाह-खर्च देण्याचा आदेश ज्या व्यक्तीविरूध्द देण्याची सूचना असेल त्याच्या समक्ष अथवा त्याची जातीनिशी हजेरी अनावश्यक करण्यात आली असेल तर त्याच्या वकिलाच्या समक्ष घेतला जाईल, आणि तो समन्स- खटल्यासाठी विहित केलेल्या रीतीने नोंदला जाईल:
परंतु, निर्वाह-खर्च देण्याचा आदेश ज्या व्यक्तीविरूध्द देण्याची सूचना असेल ती व्यक्ती बजावणी बुध्दिपुरस्सर टाळत आहे, किंवा न्यायालयात हजर राहण्याबाबत बुध्दिपुरस्सर उपेक्षा करीत आहे अशी दंडाधिकाऱ्याची खात्री झाली तर, दंडाधिकाऱ्याला एकतर्फी सुनावणी व निर्णय करण्याची कार्यवाही करता येईल आणि याप्रमाणे देण्यात आलेला कोणताही आदेश, त्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत करण्यात आलेल्या अर्जावरून दंडाधिकाऱ्याला सबळ कारण दाखविण्यात आल्यावर विरूध्द पक्षकाराला वादखर्च देण्याबाबतच्या अटी धरून, न्याय्य व उचित वाटतील अशा अटींच्या अधीनतेने रद्द ठरविता येईल.
३) कलम १४४ खालील अर्जांचे काम पाहताना, न्यायालयाला खर्चाबाबत न्याय्य असेल असा आदेश देण्याचा अधिकार असेल.

Leave a Reply