भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण ९ :
शांतता राखण्यासाठी अणि चांगल्या वागणुकीसाठी जामीन :
कलम १२५ :
दोषसिध्दी झाल्यावर शांतता राखण्यासाठी जामीन :
१) जेव्हा सत्र न्यायालय किंवा प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याचे न्यायालय एखाद्या व्यक्तीला पोटकलम (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्यांपैकी कोणत्याही अपराधाबद्दल किंवा अशा कोणत्याही अपराधास अपप्रेरणा दिल्याबद्दल सिध्ददोष ठरवील आणि शांतता राखण्यासाठी अशा व्यक्तीकडून जामीन घेणे जरूरीचे आहे असे त्याचे मत होईल तेव्हा, न्यायालय अशा व्यक्तीला शिक्षादेश देण्याच्या वेळी त्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे जास्तीत जास्त तीन वर्षांच्या कालावधीपुरते शांतता राखण्यासाठी, बंधपत्र किंवा जामीनपत्र निष्पादित करण्याचा तिला आदेश देऊ शकेल.
२) पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेले अपराध पुढीलप्रमाणे आहेत:
(a) क) (अ) भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या ११ व्या प्रकरणाखाली शिक्षापात्र असलेला, पण कलम १९३ च्या पोटकलम (१) किंवा १९६ किंवा १९७ याखाली शिक्षापात्र असणाऱ्या अपराधाहून अन्य असा कोणताही अपराध;
(b) ख) (ब) हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग किंवा आगळीक करणे यामुळे जो अपराध घडतो किंवा हे ज्यात समाविष्ट आहे असा कोणताही अपराध;
(c) ग) (क) फौजदारीपात्र धाकदपटशाचा कोणताही अपराध;
(d) घ) (ड) ज्यामुळे शांतताभंग घडला किंवा घडावा असे उद्देशित होते किंवा तो घडण्याचा संभव असल्याचे माहीत होते असा अन्य कोणताही अपराध.
३) जर अपिलान्ती किंवा अन्यप्रकारे दोषसिध्दी रद्द ठरवण्यात आली तर, याप्रमाणे निष्पादित केलेले बंधपत्र किंवा जामीनपत्र शून्य होईल.
४) या कलमाखालील आदेश अपील न्यायालयालाही किंवा एखादे न्यायालय आपले पुनरीक्षणाचे अधिकार वापरत असताना त्यालाही काढता येईल.