Bnss कलम १०३ : बंदिस्त जागेचा भारसाधक व्यक्ती झडती घेऊ देणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १०३ :
बंदिस्त जागेचा भारसाधक व्यक्ती झडती घेऊ देणे :
१) जेव्हा केव्हा या प्रकरणाखाली झडतीस किंवा तपासणीस पात्र असलेली कोणतीही जागा बंदिस्त असेल तेव्हा, अशा जागी राहणाऱ्या किंवा त्या जागेचा ताबा जिच्याकडे असेल अशा कोणत्याही व्यक्तीने वॉरंटाची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या किंवा व्यक्तीच्या मागणीवरून व वॉरंट दाखवण्यात आल्यावर, त्यांना तेथे मुक्त प्रवेश दिला पाहिजे व तेथे झडती घेण्यासाठी सर्व वाजवी सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
२) जर अशा जागी याप्रमाणे प्रवेश मिळू शकत नसेल तर, वॉरंटाची अंमलबजावणी करणारा अधिकारी किंवा व्यक्ती कलम ४४ च्या पोटकलम (२) व्दारे उपबंधित केलेल्या रीतीने पुढील तजविजीस लागेल.
३) ज्यासाठी झडती घ्यावयाची अशी कोणत्याही वस्तू अशा जागी किंवा तिच्या जवळपास असलेल्या कोणत्याही व्यक्तीने आपल्या अंगावर लपवून ठेवली असल्याचा वाजवी संशय असेल तेव्हा, अशा व्यक्तीची झडती घेता येईल व जर अशी व्यक्ती ही स्त्री असेल तर सभ्यता काटेकोरपणे सांभाळून अन्य स्त्रीकरवी झडती घेतली जाईल.
४) या प्रकरणाखाली झडती घेण्यापूर्वी, ती झडती घेण्याच्या बेतात असलेला अधिकारी किंवा अन्य व्यक्ती झडती घ्यावयाची जागा ज्या स्थानिक भागात असेल तेथील दोन किंवा अधिक नि:पक्ष व संभावित ंरहिवाशांना अथवा सदर भागातील असा कोणताही रहिवासी उपलब्ध नसेल किंवा झडतीचा साक्षीदार होण्यास राजी नसेल तर, अन्य कोणत्याही भागातील अशा रहिवाशांना उपस्थित राहाण्याची व झडतीस साक्षी राहण्याची विनंती करील व त्यांना किंवा त्यांच्यापैकी कोणालाही तसे करण्याचा लेखी आदेश काढू शकेल.
५) झडती त्यांच्या समक्ष घेतली जाईल व असा अधिकारी किंवा अन्य व्यक्ती अशा झडतीच्या ओघात ताब्यात घेतलेल्या सर्व वस्तूंची व त्या जेथे जेथे सापडल्या त्या त्या सर्व जागांची यादी तयार करील व असे साक्षीदार ती यादी स्वाक्षरित करतील; पण या कलमाखाली झडतीस साक्षी राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला न्यायालयाने खास समन्स पाठविल्याशिवाय न्यायालयात झडतीचा साक्षीदार म्हणून उपस्थित राहणे आवश्यक करता येणार नाही.
६) झडती घेतलेल्या जागेच्या ताबाधारकाला किंवा त्याच्या वतीने एखाद्या व्यक्तीला प्रत्येक वेळी झडती चालू असताना उपस्थित राहण्यास परवानगी दिली जाईल व या कलमाखाली तयार केलेल्या यादीची सदर साक्षीदारांनी स्वाक्षरित केलेली प्रत अशा ताबाधारकाकडे किंवा व्यक्तीकडे सुपूर्द केली जाईल.
७) जेव्हा पोटकलम (३)खाली कोणत्याही व्यक्तीची झडती घेतली जाईल तेव्हा, कब्जात घेतलेल्या सर्व वस्तूंची यादी तयार करण्यात येईल व तिची एक प्रत अशा व्यक्तीकडे सुपूर्द केली जाईल.
८) जर एखाद्या व्यक्तीला या कलमाखाली झडतीला उपस्थित राहून साक्षी राहण्यासाठी तिच्याकडे सुपूर्द केलेल्या किंवा देऊ केलेल्या लेखी आदेशाव्दारे फर्मावण्यात आले असता तिन तसे करण्यास वाजवी कारणाशिवाय नकार दिला किंवा त्याबाबत उपेक्षा केली तर, अशा कोणत्याही व्यक्तीने भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम २२२ खाली अपराध केला असल्याचे मानले जाईल.

Leave a Reply