Site icon Ajinkya Innovations

Bns 2023 कलम ३५६ : अब्रुनुकसानी (मानहानी) :

भारतीय न्याय संहिता २०२३
अब्रुनुकसानी (मानहानी) विषयी :
कलम ३५६ :
अब्रुनुकसानी (मानहानी) :
कलम : ३५६ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती किंवा राज्याचा राज्यपाल किंवा संघ राज्यक्षेत्राचा प्रशासक किंवा एखादा मंत्री याने आपली सरकारी कार्ये पार पाडताना केलेल्या वर्तनाबाबत त्याची अब्रुनुकसानी सरकारी अभियोक्त्याने दिलेल्या फिर्यादीवरुन कार्यवाही सुरु झाली असता.
शिक्षा : २ वर्षांचा साधा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही किंवा सामुदायिक सेवा.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अब्रूनुकसानी झालेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
अपराध : अन्य कोणत्याही प्रकरणातील अबु्रनुकसानी.
शिक्षा : २ वर्षांचा साधा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही किंवा सामुदायिक सेवा.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अब्रूनुकसानी झालेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३५६ (३)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एखादे साहित्य राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती किंवा राज्याचा राज्यपाल किंवा संघ राज्यक्षेत्राचा प्रशासक किंवा मंत्री आपली सरकारी कार्ये पार पाडत असतानाच्या त्याच्या वर्तनाबाबत त्याची अबु्रनुकसानी करणारा असल्याचे माहीत असताना तो छापणे किंवा कोरणे – सरकारी अभियोक्त्याने दिलेल्या फिर्यादीवरुन कार्यवाही सुरु झाली असता.
शिक्षा : २ वर्षांचा साधा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अब्रूनुकसानी झालेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
अपराध : अन्य कोणत्याही प्रकरणी एखादे साहित्य अब्रुनुकसानीकारक असल्याचे माहीत असताना ते छापणे किंवा कोरणे.
शिक्षा : २ वर्षांचा साधा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अब्रूनुकसानी झालेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३५६ (४)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती किंवा राज्याचा राज्यपाल किंवा संघ राज्यक्षेत्राचा प्रशासक किंवा मंत्री आपली सरकारी कार्ये पार पाडत असतानाच्या त्याच्या वर्तनाबाबत त्याची अबु्रनुकसानी करणारे साहीत्य एखाद्या छापील किंवा कारीव पदार्थावर असल्याचे माहीत असताना अशा पदार्थाची विक्री – सरकारी अभियोक्त्याने दिलेल्या फिर्यादीवरुन कार्यवाही सुरु झाली असता.
शिक्षा : २ वर्षांचा साधा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अब्रूनुकसानी झालेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
———
अपराध : अन्य कोणत्याही प्रकरणी, एखाद्या छापील किंवा कोरीव पदार्थावर अब्रुनुकसानकारक साहित्य असल्याचे माहीत असताना अशा पदार्थाची विक्री.
शिक्षा : २ वर्षांचा साधा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अब्रूनुकसानी झालेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
१) बोललेल्या किंवा वाचण्यासाठी योजलेल्या शब्दांद्वारे किंवा खुणांद्वारे किंवा दुश्य प्रतिरुपणांद्वारे, कोणत्याही रीतीने, जर कोणी कोणत्याही व्यक्तीसंबंधी कोणताही अभ्यारोप केला, किवा प्रकाशित केला आणि अशा अभ्यारोेपामुळे अशा व्यक्तीच्या लौकिकाला बाध यावा असा त्याला उद्देश असेल, अथवा त्याची त्याला जाणीव असेल, किंवा तसे समजण्यास त्याला कारण असेल तर, यात यापुढे अपवाद केलेली प्रकरणे खेरीज करुन एरव्ही, त्याने त्या व्यक्तीची अब्रुनुकसानी केली असे म्हटले जाते.
स्पष्टीकरण १ :
मृत व्यक्तीच्या बाबतीत करण्यात आलेला अभ्यारोप ती व्यक्ती जिवंत असती तर तिच्या लौकिकास बाध आणू शकला असता आणि तिच्या कुटुंबीयांच्या किंवा इतर जवळच्या नातेवाइकांच्या भावना दुखविण्यासाठी योजलेला आहे असे असेल तर, ते अब्रुनुकसानी या सदरात जमा होऊ शकेल.
स्पष्टीकरण २ :
एखादी कंपनी अथवा व्यक्तींचा अधिसंघ किंवा समूह या नात्याने त्यांच्यासंबंधी अभ्यारोप करणे हे अब्रुनुकसानी या सदरात जमा होऊ शकेल.
स्पष्टीकरण ३ :
पर्याय स्वरुपातील किंवा वक्रोक्तीपूर्वक व्यक्त केलेला अभ्यारोप हा अब्रुनुकसानी या सदरात जमा होऊ शकेल.
स्पष्टीकरण ४ :
एखाद्या अभ्यारोपामुळे इतरांच्या नजरेत प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे एखाद्या व्यक्तीच्या नैतिक किंवा बौद्धिक व्यक्तिमत्वाला उणेपणा आला, अथवा त्या व्यक्तीची जात किंवा तिचा व्यवसाय यासंबंधात तिच्या व्यक्तित्वाला उणेपणा आला, अथवा त्या व्यक्तीच्या विश्वासपात्रतेला उणेपणा आला, अथवा त्या व्यक्तीचे शरीर घृणास्पद अवस्थेत किंवा सर्व सामान्यपणे जी लाजीरवाणी म्हणून मानली जाते अशा अवस्थेत आहे असा समज निर्माण झाला, असे झाल्याशिवाय त्या अभ्यारोपाने त्या व्यक्तीच्या लौकिकाला बाध आणला असे मानले जात नाही.
उदाहरणे :
(a) क) (य) नेच (ख) चे घड्याळ चोरले असा समज निर्माण व्हावा या उद्देशाने (क) म्हणतो – (य) हा प्रामाणिक माणूस आहे, त्याने कधीही (ख) चे घड्याळ चोरलेले नाही. कोणत्याही अपवादाच्या कक्षेत येत नसेल तर ही अब्रुनुकसानी आहे.
(b) ख) (ख) चे घड्याळ कोणी चोरले असे (क) ला विचारले जाते. (य) ने (ख) चे घड्याळ चोरले असा समज निर्माण व्हावा या उद्देशाने (क) हा (य) कडे निर्देश करतो. कोणत्याही अपवादाच्या कक्षेत येत नसेल तर, ही अबु्रनुकसानी आहे.
(c) ग) (य) ने (ख) चे घड्याळ चोरले असा समज निर्माण व्हावा या उद्देशाने (ख) चे घड्याळ घेऊन (य) पळून जात आहे असे एक चित्र (क) काढतो. कोणत्याही अपवादाच्या कक्षेत येत नसेल तर ही अब्रुनुकसानी आहे.
अपवाद १ :
कोणत्याही व्यक्तिच्या संंबंधात खऱ्या असलेल्या कोणत्याही गोष्टीचा अभ्यारोप केला जाणे, किंवा ती प्रकाशित केली जाणे हे लोकहितासाठी आवश्यक असेल तर, असा अभ्यारोप ही अब्रुनुकसानी नव्हे. मात्र तो लोकहितासाठी आहे किंवा नाही हा तथ्यविषयक प्रश्न आहे.
अपवाद २ :
आपली सार्वजनिक कार्ये पार पाडताना एखाद्या लोकसेवकाने केलेल्या वर्तनासंबंधी अथवा त्या वर्तनामध्ये जेथपर्यंत त्याचे व्यक्तिमत्व दिसून येते तिथपर्यंत- त्या पलीकडे मात्र नाही – त्याच्या व्यक्तिमत्वासंबंधी सद्भावपूर्वक कसलेही मत व्यक्त करणे ही अब्रुनुकसानी नव्हे.
अपवाद ३ :
कोणत्याही सार्वजनिक प्रश्नाच्या अनुषंगाने कोणत्याही व्यक्तिने केलेल्या वर्तनासंबंधी आणि त्या वर्तनामध्ये जिथपर्यंत तिचे व्यक्तिमत्व दिसून येत तिथपर्यंत – त्या पलिकडे मात्र नाही – तिच्या व्यक्तित्वासंबंधी सद्भावपूर्वक कसलेही मत व्यक्त करणे ही अब्रुनुकसानी नव्हे.
उदाहरण :
एखाद्या सार्वजनिक प्रश्नावर शासनाला लेखी विनंतीअर्ज करणे, एखाद्या सार्वजनिक प्रश्नाववर सभा बोलावणाऱ्या मागणी-अर्जावर सही करणे, अशा सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारणे किंवा तिला हजर राहणे, जनतेचा पाठिंबा मागण्यासाठी एखादी संस्था स्थापन करणे किंवा तिच्यामध्ये सामील होणे, ज्या पदाची कामे कार्यक्षमतेने पार पाडली जाण्यामध्ये जनतेचे हित आहे अशा कोणत्याही पदाकरता एखाद्या विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने मतदान करणे किंवा प्रचार करणे याबाबतीत (य) ने केलेल्या वर्तनासंबंधी (क) ने सद्भावपूर्वक कसलेही मत व्यक्त करणे ही अब्रुनुकसानी होत नाही.
अपवाद ४ :
एखाद्या न्यायालयाच्या कार्यवाहीचे किंवा अशा कोणत्याही कार्यवाहीच्या निकालाचे बहुअंशी सत्य असे प्रतिवृत्त प्रकाशित करणे ही अब्रुनुकसानी नव्हे.
स्पष्टीकरण :
न्यायालयातील संपरीक्षेच्या पूर्वीची अशी चौकशी करणारा कोणताही न्यायाधिश (मॅजिस्ट्रेट) किंवा अन्य अधिकारी हा वरील कलमाच्या अर्थानुसार न्यायालय असतो.
अपवाद ५ :
न्यायालयाने ज्याचा निर्णय केलेला आहे अशा कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी खटल्याच्या गुणावगुणांबाबत अथवा अशा खटल्यातील पक्षकार, किंवा साक्षीदार, किंवा अभिकर्ता म्हणून कोणत्याही व्यक्तिने केलेल्या वर्तनाबाबत अथवा अशा वर्तनातून जिथपर्यंत अशा व्यक्तिचे व्यक्तिमत्व दिसून येते तिथपर्यंत – त्या पलिकडे मात्र नाही – तिच्या व्यक्तित्वाबाबत सद्भावपूर्वक कसलेही मत व्यक्त करणे ही अब्रुनुकसानी नव्हे.
उदाहरणे :
(a) क) (क) म्हणतो – त्या संपरीक्षेमधील (य) ची साक्ष ही इतकी असंगत आहे की, मला वाटते (य) हा एकतर मूर्ख किंवा अप्रामाणिक तरी असला पाहिजे. (क) हे सद्भावपूर्वक बोलला असेल तर, तो या अपवादाच्या कक्षेत आहे, कारण त्याने व्यक्त केलेले मत हे साक्षीदार म्हणून (य) ने केलेल्या वर्तनामध्ये जितपत (य) चे व्यक्तित्व दिसून येते तितपतच त्याच्या व्यक्तित्वाशी संबंधित आहे, – त्या पलिकडे मात्र नाही.
(b) ख) पण जर (क) असे म्हणाला की, त्या संपरीक्षेमध्ये (य) ने जे प्रपादन केले त्यावर माझा विश्वास नाही, कारण मी त्याला असत्यवादी मनुष्य म्हणून ओळखतो. तर (क) या अपवादाच्या कक्षेत येत नाही. कारण (य) च्या व्यक्तित्वाबाबत (क) जे मत व्यक्त करतो ते (य) ने साक्षीदार म्हणून केलेल्या वर्तनावर आधारलेले मत नाही.
अपवाद ६ :
जी कोणतीही अविष्कृती तिच्या कर्त्याने मूल्यांकनासाठी जनतेपुढे सादर केली असेल तिच्या गुणावगुणांबाबत किंवा अशा आविष्कृतीमध्ये जिथपर्यंत कर्त्याचे व्यक्तित्व दिसून येते तिथपर्यंत – त्या पलीकडे मात्र नाही – त्याच्या व्यक्तित्वाबाबत सद्भावपूर्वक कसलेही मत व्यक्त करणे ही अब्रुनुकसानी नव्हे.
स्पष्टीकरण :
एखादी आविष्कृती मूल्यांकनासाठी जनतेपुढे स्पष्टपणे सादर करता येईल किंवा कर्ताच्या ज्या कृतींमध्ये मूल्यांकनासाठी जनतेपुढे असे सादर करणे हे उपलक्षित आहे त्या कृतींच्या द्वारे सादर करता येईल.
उदाहरणे :
(a) क) जी व्यक्ती एखादे पुस्तक प्रकाशित करते ती ते पुस्तक मूल्यांकनासाठी जनतेपुढे सादर करते.
(b) ख) जी व्यक्ती एखादे जाहीर भाषण करते ती ते भाषण मुल्यांकनासाठी जनतेपुढे सादर करते.
(c) ग) सार्वजनिक मंचावर येणारा अभिनेता किंवा गायक आपला अभिनय किंवा गायन मुल्यांकनासाठी जनतेपुढे सादर करतो.
(d) घ) (क) हा (य) ने प्रकाशित केलेल्या पुस्तकाबद्दल म्हणतो, (य) चे पुस्तक मूर्खपणाचे आहे, (य) नेभळा माणूस असला पाहिजे. (य) चे पुस्तक असभ्य आहे, (य) घाणेरड्या मनोवृत्तीचा माणूस असला पाहिजे. जर (क) हे सद्भावपूर्वक बोलला असेल तर तो अपवादाच्या कक्षेत आहे, कारण (क) हा (य) बद्दल जे मत व्यक्त करतो ते (य) च्या पुस्तकामध्ये जितपत (य) चे व्यक्तित्व दिसून येते तितपतच त्याच्या व्यक्तित्वासंबंधी आहे – त्या पलिकडे मात्र नाही.
(e) ङ) पण जर (क) असे म्हणाला की, (य) चे पुस्तक मूर्खपणाचे आणि असभ्य आहे याचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही, कारण तो नेभळा आणि स्वैराचारी माणूस आहे. तर (क) या अपवादाच्या कक्षेत येत नाही, कारण (क) ने (य) च्या व्यक्तित्वाबद्दल व्यक्त केलेले मत हे (य) च्या पुस्तकावर आधारलेले मत नाही.
अपवाद ७ :
दुसऱ्यावर कायदेशीर हुकमत असलेल्या व्यक्तिने सद्भावपूर्वक निर्भत्सना करणे :
एखाद्या व्यक्तिची अन्य व्यक्तिवर, कायद्याने प्रदान केलेली किंवा त्या व्यक्तीबरोबर केलेल्या कायदेशीर संविदेतून निर्माण होणारी कोणतीही हुकमत असते तेव्हा, तिने अशा कायदेशीर हुकमत ज्यांच्याशी संबंधित आहे त्या बाबींमध्ये त्या अन्य व्यक्तिने केलेल्या वर्तनाबाबत सद्भावपूर्वक निर्भत्सना करणे ही अब्रुनुकसानी नव्हे.
उदाहरण :
साक्षीदाराच्या किंवा न्यायालयीन अधिकाऱ्याच्या वर्तनाबाबत सद्भावपूर्वक निर्भत्र्सना करणारा न्यायाधीश; आपल्या हुकुमाचे ताबेदार असलेल्यांची सद्भावपूर्वक निर्भत्र्सना करणारा विभाग-प्रमुख ; इतर मुलांच्या समक्ष एखाद्या मुलाची सद्भावपूर्वक निर्भत्र्सना करणारी आई वा बाप; विद्याथ्र्यांच्या आई वा बापाकडून हुकूमत प्राप्त झालेला शाळेतील जो शिक्षक सद्भावपूर्वक त्या विद्याथ्र्याची इतर विद्याथ्र्यांच्या देखत निर्भत्र्सना करतो तो शिक्षक; कामचुकारपणाबद्दल सद्भावपूर्वक एखाद्या नोकराची निर्भत्र्सना करणारा मालक; आपल्या बँकेच्या रोखपालाला त्याने असा रोखपाल म्हणून केलेल्या वर्तनाबद्दल सद्भावपूर्वक निर्भत्र्सना करणारा एखादा बँकर – हे या अपवादाच्या कक्षेत येतात.
अपवाद ८ :
प्राधिकृत व्यक्तिकडे सद्भावपूर्वक आरोप सादर करणे :
कोणत्याही व्यक्तीविरुद्ध करावयाचा आरोप, त्या आरोपाच्या विषयवस्तूबाबत त्या व्यक्तीवर ज्यांची कायदेशीर हुकमत असेल त्यांच्यापैकी कोणाकडेही सद्भावपुर्वक सादर करणे ही अबु्रनुकसानी नव्हे.
उदाहरण :
जर (क) ने सद्भावपूर्वक दंडाधिकाऱ्यासमोर (य) वर आरोप केला; जर (क) ने सद्भावपूर्वक (य) या नोकराच्या वर्तनाबाबत (य) च्या मालकाकडे तक्रार केली; जर (क) ने सद्भावपूर्वक (य) या मुलाच्या वर्तनाबाबत (य) च्या वडिलांकडे तक्रार केली तर, (क) या अपवादाच्या कक्षेत येतो.
अपवाद ९ :
एखाद्या व्यक्तीने स्वत:च्या किंवा इतरांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी सद्भावपूर्वक केलेला अभ्यारोप :
दुसऱ्याच्या चारिर्त्यावरील अभ्यारोप जर तो करणाऱ्या व्यक्तीच्या किंवा अन्य कोणत्याही व्यक्तिच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी आणि लोककल्याणासाठी सद्भावपूर्वक केलेला असेल, तर असा अभ्यारोप करणे ही अब्रुनुकसानी नव्हे.
उदाहरणे :
(a) क) (क) हा दुकानदार, त्याच्या धंद्याची व्यवस्था पाहणाऱ्या (ख) ला म्हणतो, (य) ने तुला रोख पैसे दिल्याशिवाय तू त्याला काहीही विकू नकोस, कारण त्याच्या प्रामाणिकपणाविषयी माझी खात्री नाही. जर (क) ने स्वत:च्या हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी सद्भावपूर्वक (य) वर अभ्यारोप केलेला असेल तर, (क) अपवादाच्या कक्षेत आहे.
(b) ख) (क) हा दंडाधिकारी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अहवाल देताना, (य) च्या चारिर्त्यावर अभ्यारोप करतो. याबाबतीत, जर तो अभ्यारोप सद्भावपूर्वक आणि लोककल्याणासाठी केलेला असेल तर, (क) अपवादाच्या कक्षेत आहे.
अपवाद १० :
एखाद्या व्यक्तिला तिचे हित करण्याच्या किंवा लोकहित साधण्याच्या उद्येशाने सावधान सूचना देणे :
सद्भावपूर्वक एखाद्या व्यक्तीस दुसऱ्यापासून सावध रहाण्याबद्दल द्यावयाची सूचना, ज्या व्यक्तिला ती द्यावयाची तिच्या किंवा जिच्यामध्ये ती हितसंबंधित आहे, अशा एखाद्या व्यक्तिच्या हितासाठी किंवा लोकहितासाठी उद्देशित असेल तर, सद्भावपूर्वक अशी सूचना देणे ही अब्रुनुकसानी नव्हे.
२) जो कोणी दुसऱ्याची अब्रुनुकसानी करील त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा किंवा सामुदायिक सेवेची शिक्षा होईल.
३) जो कोणी एखादे साहित्य कोणत्याही व्यक्तीला अब्रूनुसानीकारक आहे हे माहीत असताना किंवा तसे समजण्यास सबळ कारण असताना असे साहित्य छापील किंवा कोरील त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
४) अब्रुनुकसानीकारक साहित्य अंतर्भूत असलेला कोणताही छापील किंवा कोरीव पदार्थ, त्यात असे साहित्य आहे हे माहीत असून, जो कोणी तो विकेल, किंवा विकत देऊ करील त्याला दोन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची, किवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Exit mobile version