Bns 2023 कलम ९८ : वेश्याव्यवसाय, इत्यादी प्रयोजनार्थ बालकाची विक्री करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ९८ :
वेश्याव्यवसाय, इत्यादी प्रयोजनार्थ बालकाची विक्री करणे :
कलम : ९८
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : वेश्याव्यवसाय इत्यादी प्रयोजनार्थ बालकाची विक्री करणे किंवा तिला भाड्याने देणे.
शिक्षा : १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कोणत्याही बालकाला वेश्या व्यवसायाच्या किंवा कोणत्याही व्यक्तीशी विधिनिषिद्ध संभोग करण्याच्या प्रयोजनार्थ किंवा कोणत्याही बेकायदेशीर आणि अनैतिक प्रयोजनार्थ कोणत्याही वयाला कामी लावले जावे किंवा त्यासाठी त्याचा वापर केला जावा या उद्देशाने अथवा असा बालक तशा कोणत्याही प्रयोजनार्थ कोणत्याही वयाला कामी लावण्यात येईल किंवा त्यासाठी त्याचा वापर करण्यात येईल असा संभव असल्याची स्वत:ला जाणीव असताना जो कोणी अशा बालकाची विक्री करील, त्याला भाड्याने देईल किंवा त्याची अन्यप्रकारे वासलात लावील त्याला, दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण एक :
अठरा वर्षे वयाखालील स्त्री, एखाद्या वेश्येला किंवा वेश्यागृह बाळगणाऱ्या किंवा त्याची व्यवस्था पाहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला विकली जाईल, भाड्याने दिली जाईल किंवा तिची अन्यथा वासलात लावली जाईल त्याबाबतीत, अशा स्त्रीची अशा प्रकारे वासलात लावणाऱ्या व्यक्तीने, त्या स्त्रीचा वेश्याव्यवसायासाठी वापर करण्यात यावा या उद्देशाने तिची वासलात लावली असे, त्याविरुद्ध शाबीत करण्यात येईपर्यंत, गृहीत धरले जाईल.
स्पष्टीकरण दोन :
या कलमाच्या प्रयोजनार्थ विधिनिषिद्ध संभोग याचा अर्थ, ज्या व्यक्ति विवाहाद्वारे किंवा विवाह या सदरात जमा होण्यासारखे नसले तरी ज्याला, त्या व्यक्ति ज्या समाजातील आहेत त्या समाजाचा किंवा त्या व्यक्ति निरनिराळ्या समाजांतील असतील तर अशा दोन्ही समाजांचा व्यक्तिविषयक कायदा किंवा रुढी यांनी ज्यास त्यांच्यामधील दांपत्यवत संबंध म्हणून मान्यता दिली आहे असा कोणताही संयोग किंवा बंधन याद्वारे एकत्र आलेल्या नसतील त्या व्यक्तींमधील लैंगिक संभोग असा आहे.

Leave a Reply