Bns 2023 कलम ३४२ : कलम ३३८ मध्ये वर्णन केलेले दस्तऐवज अधिप्रमाणित करण्यासाठी वापरले जाणारे बोधचित्र किंवा चिन्ह नकली तयार करणे, किंवा अशी नकली चिन्हाने अंकित सामग्री कब्जात बाळगणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३४२ :
कलम ३३८ मध्ये वर्णन केलेले दस्तऐवज अधिप्रमाणित करण्यासाठी वापरले जाणारे बोधचित्र किंवा चिन्ह नकली तयार करणे, किंवा अशी नकली चिन्हाने अंकित सामग्री कब्जात बाळगणे :
कलम : ३४२ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३८ मध्ये वर्णन केलेले दस्तऐवज अधिप्रमाणित करण्यासाठी वापरले जाणारे बोधचित्र किंवा चिन्ह नकली तयार करणे किंवा तशा नकली चिन्हाने अंकित असलेली सामग्री जवळ बाळगणे.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३४२ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : भारतीय दंड संहितेच्या कलम ३३८ मध्ये वर्णन केलेल्याहून अन्य दस्तऐवज अधिप्रमाणित करण्यासाठी वापरले जाणारे बोधचित्र किवा चिन्ह नकली तयार करणे किंवा तशा नकली चिन्हाने अंकित असलेली सामग्री जवळ बाळगणे.
शिक्षा : ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
१) जर कोणी कोणत्याही सामग्रीवर किंवा तिच्या मुख्य द्रव्यात या संहितेच्या कलम ३३८ मध्ये वर्णन केलेला कोणताही दस्तऐवज अधिप्रमाणात करण्यासाठी वापरले जाणारे कोणतेही बोधचित्र किंवा चिन्ह नकली तयार केले आणि अशा सामग्रीवर त्या वेळी बनावट तयार केलेला किंवा त्यानंतर बनावट तयार करायचा कोणताही दस्तऐवज अधिप्रमाणित असल्याचे भासविण्यासाठी असे बोधचित्र किंवा चिन्ह यांचा वापर केला जावा असा त्यामागे त्याचा उद्देश असेल तर, अथवा जिच्यावर किंवा जिच्या मुख्य द्रव्यात असे कोणतेही नकली बोधचित्र किंवा चिन्ह अंकित केलेले आहे अशी कोणतीही सामग्री जर कोणी अशा उद्देशाने कब्जात बाळगली तर, त्याला आजन्म कारावासाची किंवा सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
२) जर कोणी कोणत्याही सामग्रीवर किंवा तिच्या मुख्य द्रव्यात या संहितेच्या कलम ३३८ मध्ये वर्णन केलेल्याहून अन्य कोणताही दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख अधिप्रमाणित करण्यासाठी वापरले जाणारे कोणतेही बोधचित्र किंवा चिन्ह नकली तयार केले आणि अशा सामग्रीवर त्या वेळी बनावट तयार केलेला किंवा त्यानंतर बनावट तयार करायचा कोणताही दस्तऐवज अधिप्रमाणित असल्याचे भासविण्यासाठी असे बोधचित्र किंवा चिन्ह यांचा वापर केला जावा असा त्यामागे उद्देश असेल तर, अथवा जिच्यावर किंवा जिच्या मुख्य द्रव्यात असे कोणतेही नकली बोधचित्र किंवा चिन्ह अंकित केलेले आहे अशी कोणतीही सामग्री जर कोणी तशा उद्देशाने कब्जात बाळगली, तर त्याला सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply