भारतीय न्याय संहिता २०२३
प्रकरण १० :
नाणे, चलनी नोट किंवा बँक नोट आणि शासकिय मुद्रांक अपराधांविषयी :
कलम १७८ :
नाणे, चलनी नोट किंवा बँक नोट किंवा शासकीय मुद्रांक नकली तयार करणे (कूटकरण) :
कलम : १७८
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : चलनी नोटा किंवा बँक नोटा नकली तयार करणे.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
जो कोणी कोणतेही नकली नाणे तयार करील किंवा जाणीवपूर्वक कोणतेही नाणे, चलनी नोट किंवा बँक नोट किंवा महसूलाच्या उद्देशाने शासनाने जारी केलेला मुद्रांक यांच्या नकलीकरणाच्या प्रक्रियेतील कोणताही भाग पार पाडील, त्याला आजीवन कारावास किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण :
या प्रकरणाच्या प्रयोजनासाठी,-
१) बँक नोट या शब्दप्रयोगाचा अर्थ, जगाच्या कोणत्याही भागामध्ये बँक व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, अथवा कोणत्याही राजसत्तेच्या किंवा सार्वभौम सत्तेच्या प्राधिकारान्वये किंवा त्याखाली जे वचनपत्र किंवा अभिसंकेतपत्र मागणी होताच धारणकर्त्याला पैसे चुकते करण्यासाठी काढलेले असून, पैशाचा सममुल्यक म्हणून किंवा पर्याय म्हणून वापरण्यासाठी योजलेले असते असे कोणतेही वचनपत्र किंवा अभिसंकेतपत्र असा आहे.
२) नाणे याचा अर्थ जो नाणे निर्माण अधिनियम २०११ याच्या कलम २ मध्ये दिलेला आहे तो असेल आणि याच्या अंतर्गत त्या त्या काळी पैसा म्हणून वापरला जाणारा आणि याप्रमाणे वापरला जावा म्हणून एखाद्या देशाच्या किंवा सार्वभौम सत्तेच्या अधिकारानुसार छाप मारलेला व चलनात आणलेला धातू याचा समावेश आहे.
३) जी व्यक्ती एका अभिधानाच्या (दराचा) अस्सल मुद्रांक निराळ्या अभिधानाच्या (दराच्या) अस्सल मुद्रांकासारखा दिसेल असे करते, ती शासकीय मुद्रांक नकली तयार करण्याचा अपराध करते.
४) जी व्यक्ती फसगत करण्याच्या उद्देशाने अगर त्यामुळे फसगत होणे संभवनीय आहे हे माहीत असताना, अस्सल नाणे हे वेगळ्या नाण्यासारखे दिसण्याची व्यवस्था करील ती व्यक्ती नाणे नकली तयार करण्याचा अपराध करते. आणि
५) नाणे नकली तयार करण्यामध्ये, नाण्याचे वजन कमी करणे किंवा त्याच्या मिश्रणात बदल करणे किंवा दृश्य रुपामध्ये बदल करणे यांचा समावेश आहे.
Pingback: Ipc कलम २३० : नाणे याची व्याख्या :
Pingback: Ipc कलम २३२ : भारतीय नाणे नकली तयार करणे :
Pingback: Ipc कलम २३१ : नाणे नकली तयार करणे:
Pingback: Ipc कलम २५५ : शासकीय मुद्रांक नकली तयार करणे :