Bns 2023 कलम १२२ : प्रक्षोभकारणामुळे (चिथावणीमुळे) इच्छापूर्वक दुखापत किंवा जबर दुखापत पोचवणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १२२ :
प्रक्षोभकारणामुळे (चिथावणीमुळे) इच्छापूर्वक दुखापत किंवा जबर दुखापत पोचवणे :
कलम : १२२ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : गंभीर व आकस्मिक प्रक्षोभकारणामुळे इच्छापूर्वक दुखापत पोचवणे – ज्या व्यक्तिने प्रक्षोभित केले तिच्याहून अन्य कोणत्याही व्यक्तीला दुखापत पोचवण्याचा उद्देश नसताना.
शिक्षा : १ महिन्यांचा कारावास, किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : जिला दुखापत पोचवण्यात आली ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : १२२ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : गंभीर व आकस्मिक प्रक्षोभकारणामुळे जबर दुखापत पोचवणे – ज्या व्यक्तीने प्रक्षोभित केले तिच्याहून अन्य कोणत्याही व्यक्तीला दुखापत पोचवण्याचा उद्देश नसताना.
शिक्षा : ५ वर्षाचा कारावास, किंवा १०००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : जिला दुखापत पोचवण्यात आली ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
१) जो कोणी गंभीर व आकस्मिक प्रक्षोभकारणामुळे (चिथावणीमुळे) इच्छापूर्वक दुखापत पोचवील त्याला, ज्या व्यक्तीने प्रक्षोभित केले (चिथावणी दिली) अशा व्यक्तीहून अन्य कोणत्याही व्यक्तीस दुखापत करण्याचा त्याचा उद्देश नसेल व तसेच, दुखापत होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव नसेल तर त्याला, एक महिन्यापर्यन्त असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा पाच हजार रुपयांपर्यन्त असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
२) जो कोणी गंभीर व आकस्मिक प्रक्षोभकारणामुळे (चिथावणीमुळे) इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवील त्याला, ज्या व्यक्तीने प्रक्षोभित केले अशा व्यक्तीहून अन्य कोणत्याही व्यक्तीस, जबर दुखापत पोचवण्याचा त्याचा उद्देश नसेल किंवा जबर दुखापत होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव नसेल तर त्याला, पाच वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा पाच हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
स्पष्टीकरण :
हे कलम, कलम १०१ च्या अपवाद १ प्रमाणे त्याच परंतुकास अधीन आहेत.

Leave a Reply