Site icon Ajinkya Innovations

विदेशी व्यक्ती अधिनियम कलम ३ : आदेश काढण्याची शक्ती :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६
कलम ३ :
आदेश काढण्याची शक्ती :
१) केन्द्र शासन आदेश काढून त्याद्वारे, सर्वसाधारणपणे किंवा सर्व विदेशी व्यक्तींच्या बाबतीत किंवा एखाद्या विशिष्ट विदेशी व्यक्तीबाबत किंवा एखाद्या विहित वर्गाच्या किंवा वर्णनाच्या विदेशी व्यक्तीबाबत, विदेशी व्यक्तींनी १.(भारतात) प्रवेश करणे किंवा तेथून प्रयाण करणे किंवा त्यांनी तेथे उपस्थित असणे किंवा त्यांची तेथील उपस्थिती चालू राहाणे या गोष्टींना मनाई करणारा, त्यांचे नियमन करणारा किंवा त्यांवर निर्बन्ध घालणारा उपबंध करु शकेल.
२) विशेषकरुन आणि पूर्वगामी शक्तीच्या व्यापकतेला बाध न येता, या कलमाखाली दिलेल्या आदेशामध्ये असा उपबंध करता येईल की,-
(a)क) विदेशी व्यक्तीस १.(भारतात) प्रवेश करता येणार नाही, किंवा विहित करण्यात येईल अशा वेळीच व अशा मार्गानेच, तसेच विहित अशाच बंदरात किंवा ठिकाणी आणि आगमनाच्या वेळी विहित अशा शर्तींचे पालन करुनच १.(भारतात) प्रवेश करावा लागेल;
(b)ख) विदेशी व्यक्तीस १.(भारतातून) प्रयाण करता येणार नाही, किंवा विहित करण्यात येईल अशा वेळीच व अशाच मार्गाने, तसेच विहित अशा बंदरातून किंवा ठिकाणाहून आणि प्रयाणाच्याच वेळी विहित अशा शर्तींचे पालन करुनच भारतातून प्रयाण करावे लागेल;
(c)ग) विदेशी व्यक्तीस १.(भारतात) किंवा तेथील एखाद्या विहित भागात थांबून राहता येणार नाही;
(cc)२.(गग) विदेशी व्यक्तीस या कलमाखालील आदेशाद्वारे भारतात तिने थांबून राहू नये असे फर्मावण्यात आले असेल तर, त्या विदेशी व्यक्तीस भारतातून होणाऱ्या तिच्या निष्कासनाचा व असे निष्कासन होईतोवर तिच्या निर्वाहाचा खर्च तिला जमेल त्या मार्गाने भागवावा लागेल;)
(d)घ) विदेशी व्यक्तीस १.(भारतातील) जे क्षेत्र विहित करण्यात येईल अशा क्षेत्रात स्थानांतरण करुन तेथेच राहावे लागेल;
(e)ङ) विदेशी व्यक्तीस विहित किंवा विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा शर्तींचे पालन करावे लागेल, त्या अशा :-
एक) विशिष्ट ठिकाणी वास्तव्य करावयास लावणारी शर्त;
दोन) तिच्या हालचालींवर कोणतेही निर्बन्ध लादणारी शर्त;
तीन) विहित किंवा विनिर्दिष्ट करण्यात येईल त्याप्रमाणे तिने आपली ओळख पटवणारा तसा पुरावा सादर करणे आणि विहित किंवा विनिर्दिष्ट असा तपशील तथा प्राधिकरणाला तशा पद्धतीने आणि तशा वेळी व ठिकाणी कळवणे या गोष्टी आवश्यक करणारी शर्त;
चार) तिने आपले छायाचित्र व बोटांचे ठसे घेऊ देणे आणि आपल्या हस्ताक्षराचे व स्वाक्षरीचे नमुने विहित किंवा विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा वेळी व ठिकाणी सादर करणे या गोष्टी आवश्यक करणारी शर्त;
पाच) विहित किंवा विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा प्राधिकरणाकडून आणि अशा वेळी व ठिकाणी तिला स्वत:ची वैद्यकीय तपासणी करुन घ्यावयास लावणारी शर्त;
सहा) विहित किंवा विनिर्दिष्ट वर्णनाच्या व्यक्तींशी संबंध ठेवण्यास तिला मनाई करणारी शर्त;
सात) विहित किंवा विनिर्दिष्ट वर्णनाच्या कृती करण्यास तिला मनाई करणारी शर्त;
आठ) विहित किंवा विनिर्दिष्ट वस्तू वापरण्यास किंवा जवळ बाळगण्यास तिला मनाई करणारी शर्त;
नऊ) विहित किंवा विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा कोणत्याही बाबतीत तिच्या वर्तणुकीचे अन्यथा नियमन करणारी शर्त;
(f)च) विदेशी व्यक्तीस, विहित किंवा विनिर्दिष्ट केलेल्यांपैकी कोणत्याही किंवा सर्व निर्बन्धाचे किंवा शर्तीचे योग्य रीतीने पालन होण्यासाठी, किंवा त्यांच्या अंमलबजावणीला पर्याय म्हणून, जामीनदारांसह किंवा त्यांच्याविना बंधपत्र करुन द्यावे लागेल;
(g)३.(छ) विदेशी व्यक्तीला अटक करण्यात यावी आणि तिला स्थानबद्ध किंवा बंदिवान करण्यात यावे;)
आणि ४.(विहित करावयाच्या किंवा करता येईल अशा कोणत्याही गोष्टीसाठी आणि) केन्द्र शासनाच्या मते, या अधिनियमाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने समयोचित किंवा आवश्यक असलेल्या कोणत्याही आनुषंगिक व पूरक बाबीसाठी त्या आदेशाद्वारे उपबंध करता येईल.
३) यासंबंधात विहित केलेले कोणतेही प्राधिकरण, कोणत्याही विशिष्ट विदेशी व्यक्तीच्या बाबतीत, पोटकलम (२) चा खंड (ङ) ५.(किंवा खंड (च)) याअन्वये आदेश काढू शकेल.
———
१. १९४७ के अधिनियम सं० ३८ की धारा २ द्वारा ब्रिटिश भारत के स्थान पर प्रतिस्थापितŸ।
२. १९४७ चा अधिनियम क्रमांक ३८ याच्या कलम ४ द्वारा समाविष्ट केले.
३. १९५७ चा अधिनियम ११ याच्या कलम ३ द्वारे गाळलेला हा मजकूर १९६२ चा अधिनियम ४२ च्या कलम ३ द्वारे पुन्हा समाविष्ट केला.
४. १९४७ चा अधिनियम ३८ चा कलम ४ द्वारे समाविष्ट केले.
५. १९५७ चा अधिनियम ११ याच्या कलम ३ द्वारे खंड (च) किंवा खंड (छ) याऐवजी समाविष्ट केले (१९-१-१९५७ रोजी व तेव्हापासून).

Exit mobile version