विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६
कलम ६ :
नौकाधिपती, इत्यादींवरील आबंधने :
१) १.(भारतातील) बंदराला लागणाऱ्या किंवा तेथून प्रवासाला निघणाऱ्या ज्या जलयानातील उतारु समुद्रमार्गे त्या बंदरात येणारे किंवा तेथून जाणारे असतील त्याच्या अधिपतीला आणि भारतातील कोणत्याही ठिकाणी उतरणाऱ्या किंवा तेथून निघणाऱ्या ज्या वायुयानातील उतारु हवाईमार्गे त्या ठिकाणी येणारे किंवा तेथून जाणारे असतील त्याच्या पायलटाला जे विदेशीय असतील असे कोणतेही उतारु किवा यानिकगणाचे सदस्य यांच्याबाबत विहित तपशील पुरवणारे एक प्रतिवेदन विहित करण्यात येईल अशा व्यक्तीकडे आणि तशा पद्धतीने सादर करावे लागेल.
२) कोणताही जिल्हा दंडाधिकारी आणि कोणताही पोलीस आयुक्त किंवा जेथे पोलीस आयुक्त नसेल तेथे कोणताही पोलीस अधीक्षक हा, या अधिनियमाच्या किंवा या अधिनियमाखाली काढलेल्या कोणत्याही जलयानाच्या अधिपतीला किंवा अशा कोणत्याही वायुयानाच्या पायलटाला त्या जलयानातील किंवा वायुयानातील, प्रकरणपरत्वे, उतारु किंवा यानिकगणाचे सदस्य याच्यासंबंधी विहित करण्यात येईल अशी माहिती सादर करण्यास फर्मावू शकेल.
३) अशा जलयानातील किंवा वायुयानातील कोणत्याही उतारुकडून आणि अशा जलयानातील किंवा वायुयानातील यानिकगणाच्या कोणत्याही सदस्याकडून, प्रकरणपरत्वे, जलयानाचा अधिपती किंवा वायुयानाचा पायलट पोटकलम (१) मध्ये उल्लेखिलेले प्रतिवेदन सादर करण्यासाठी मागवील अशी कोणतीही माहिती त्या उतारुला किंवा सदस्याला त्याच्याकडे सादर करावी लागेल.
२.(४) या अधिनियमाच्या कोणत्याही उपबंधाचे किंवा त्याखाली काढलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन करुन एखाद्या विदेशी व्यक्तीने भारतात प्रवेश केला तर, तिने असा प्रवेश केल्यापासून दोन महिन्यांच्या आत विहित प्राधिकरण, ज्याच्याद्वारे असा प्रवेश करण्यात आला त्या जलयानाच्या अधिपतीला किंवा वायुयानाच्या पायलटाला अथवा अशा जलयानाच्या किंवा वायुयानाच्या मालकाला किंवा त्या मालकाच्या अभिकर्त्याला, प्राधिकरणाचे समाधान होईल अशाप्रकारे व सरकारच्या खर्चाने नव्हे तर अन्यथा उक्त विदोी व्यक्तीला भारतातून निष्कासित करण्यासाठी जलयानात किंवा वायुयानात तिला जागा देण्याची व्यवस्था करण्यास फर्माव शकेल.
५) भारतातील एखाद्या बंदरातून किंवा ठिकाणाहून भारताबाहेरील इतर कोणत्याही ठिकाणी जे उतारुंना घेऊन जाणार आहे अशा कोणत्याही जलयानाचा अधिपती किंवा वायुयानाचा पायलट अथवा अशा जलयानाचा किंवा वायुयानाचा मालक किंवा त्या मालकाचा अभिकर्ता, त्याला जर केन्द्र शासनाने तसा निदेश दिला आणि चालू दराने भाड्याची रक्कम भरण्यात आली तर, कलम ३ अन्वये भारतात न राहण्याचा आदेश दिलेल्या विदेशी व्यक्तीला व तिच्यावर अवलंबून असलेल्या कोणी व्यक्ती तिच्यासोबत प्रवास करीत असल्यास त्यांना केन्द्र शासन विनिर्दिष्ट करील अशा ज्या बंदरात किंवा ठिकाणी ते जलयान किंवा वायुयान थांबणार असेल अशा भारताबाहेरील बंदरापर्यंत किंवा ठिकाणापर्यंत जाण्यासाठी आपल्या जलयानात किंवा वायुयानात जागा उपलब्ध करुन देईल.)
२.(६)) या कलमाच्या प्रयोजनासाठी –
(a)क) एखाद्या जलयानाच्या अधिपती आणि कोणत्याही वायुयानाचा पायलट या संज्ञामध्ये या कलमान्वये आपणांकडे सोपवण्यात आलेली आपली कर्तव्ये आपल्या वतीने पार पाडण्यासाठी अशा अधिपतीने किंवा, प्रकरणपरत्वे, पायलटाने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीचा समावेश होतो;
(b)ख) उतारु याचा अर्थ, यानिकगणाचा खराखुरा सदस्य नसलेली आणि जलयानातून किंवा वायुयानातून प्रवास करणारी किंवा प्रवास करु इच्छिणारी कोणतीही व्यक्ती असा होतो.
———
१. १९४७ चा अधिनियम क्रमांक ३८ याच्या कलम २ द्वारे ब्रिटिश भारत याऐवजी समाविष्ट केले.
२. १९४७ चा अधिनियम क्रमांक ३८ याच्या कलम ५ द्वारा पोटकलमे (४) आणि (५) समाविष्ट केली आणि मूळचे पोटकलम ४ यास (६) हा नवीन क्रमांक दिला.
