बाल न्याय अधिनियम २०१५
कलम २ :
व्याख्या :
या अधिनियमात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर,-
१) परित्यक्त मूल (बालक) याचा अर्थ जे मूल जैविक पालकांनी किंवा दत्तक पालकांनी सोडून दिलेले आहे की जे समितीने चौकशीअंती परित्यक्त मूल असे जाहीर केलेले आहे, असा आहे;
२) दत्तकविधान (दत्तकग्रहण) म्हणजे अशी प्रक्रिया की ज्याद्वारे मूल जे आपल्या जैविक पालकांशी (माता-पाता) आपले सर्व हक्क, विशेषाधिकार आणि जबाबदाऱ्या यांनी बांधले गेलेले असते त्यांचेपासून कायमचे विभक्त (वेगळे) केले जाऊन दत्तक घेणाऱ्या पालकाचे कायदेशीर मूल होते;
३) दत्तकविधान नियमन याचा अर्थ, दत्तकविधानाबाबत केन्द्र सरकारकडून अधिकार आणि अधिसूचना देऊन तयार केलेले नियमन, असा आहे;
१.(***)
५) उत्तर रक्षा (नंतरची काळजी घेणे) याचा अर्थ, ज्यांनी वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेली आहेत, परंतु अद्याप एकवीस वर्ष पूर्ण झालेली नाहीत आणि ज्यांची समाजातील मुख्य प्रवाहात जोडणीसाठी (मिळण्यासाठी) संस्थांकडून काळजी घेणे सोडलेले आहे; अशा व्यक्तींना वित्तीय किंवा अन्य मार्गानी आधार देणे, असा आहे;
६) अधिकृत विदेशी दत्तकग्रहण अभिकरण (एजन्सी) याचा अर्थ त्या देशाच्या केन्द्रीय प्राधिकरणाने किंवा त्या देशाच्या सरकारी विभागाने केन्द्रीय दत्तकग्रहण संसाधन प्राधिकरणाकडे शिफारस केलेल्या अनिवासी भारतीय किंवा विदेशी भारतीय नागरिक किंवा भारतीय वंशाच्या व्यक्तीसाठी किंवा विदेशी भावी दत्तक माता-पिता (दत्तकग्रहण) करु इच्छिणाऱ्या पालाकांसाठी दत्तकग्रहणाचे (दत्तकविधान) अधिकृत काम करणारी विदेशी सामाजिक किंवा बालकल्याण अभिकरण (एजन्सी), असा आहे;
७) प्राधिकरण याचा अर्थ कलम ६८ अन्वये घटित केलेले केन्द्रीय दत्तकग्रहण संसाधन प्राधिकरण, असा आहे;
८) भीक मागणे याचा अर्थ, –
एक) एखाद्या सार्वजनिक ठिकाणी भीक मागणे किंवा ती घेणे अथवा भीक मागण्यासाठी किंवा ती घेण्यासाठी कोणत्याही खाजगी जागेमध्ये, मग तो कोणत्याही बहाण्याने असो, प्रवेश करणे;
दोन) भीक मिळविण्याच्या किंवा उकळण्याच्या उद्देशाने कोणतेही क्षत, जखम, इजा, व्यंग किंवा रोग – मग तो स्वत:चा असो, किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीचा किंवा एखाद्या प्राण्याचा असो, उघड्यावर टाकणे किंवा त्याचे प्रदर्शन करणे, असा आहे;
९) बालकाचे किंवा मुलाचे हित याचा अर्थ मुलाचे किंवा बालकाचे बाबतीत कोणताही निर्णय घेण्याचा पायाभूत आधार की ज्यामुळे त्याचे मूलभूत हक्क व गरजा पुरविणे, ओळख, सामाजिक कल्याण (सामाजिकदृष्ट्या भले होणे) आणि शारीरिक (भौतिक), भावनात्मक आणि बौद्धिक विकासाची पुर्तता होणे याची सुनिश्चिती करणे, असा आहे;
१०) मंडळ (बोर्ड) याचा अर्थ कलम ४ अन्वये घटित केलेले बाल न्याय मंडळ (बोर्ड) असा आहे;
११) केन्द्रीय प्राधिकरण याचा अर्थ, हेग अभिसंधी (कन्वेशन) १९९३ अन्वये, आंतरदेशीय दत्तकग्रहण (दत्तकविधान) बाबत बालकांचे (मुलांचे) सरंक्षण आणि सहकार्य याबाबत सरकारी (शासनाच्या) विभागाकडून मान्यता प्राप्त असे प्राधिकरण, असा आहे;
१२) बालक किंवा मूल याचा अर्थ, ज्यास वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेली नाही अशी व्यक्ती, असा आहे;
१३) कायद्याशी संघर्ष (कायद्याचे उल्लंघन) करीत असलेले बालक (मूल) याचा अर्थ, ज्याच्यावर एखादा अपराध केला असल्याचा आरोप आहे आणि असा ज्याने अपराध केल्याच्या तारखेस ज्याने वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेली नाहीत असे बालक (मूल), असा आहे;
१४) काळजी घेण्याची (देखभाल) व संरक्षणाची गरज असलेले मूल, याचा अर्थ,-
एक) ज्याला कोणतेही घर किंवा राहण्याचे निश्चित ठिकाण किंवा वसतिस्थान नसल्याचे आणि जीवन निर्वाहासाठी (उदरनिर्वाह) कोणतेही साधन नसल्याचे आढळून आले आहे; किंवा
दोन) जे २.(या अधिनियमाच्या तरतुदींच्या किंवा) त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कामगार कायद्याच्या विरोधात काम करताना आढळून आले आहे किंवा मागताना किंवा रस्त्यावर राहताना आढळून आले आहे; किंवा
तीन) जे, एखाद्या व्यक्ती बरोबर (मग तो त्या मुलाचे पालक असो वा नसो) रहात असेल आणि अशा व्यक्तीने,-
क) मुलास (बालकास) मुलांच्या (बालकांच्या) संरक्षणासाठी त्या त्या वेळी लागू असेलेल्या नियमाचा भंग करुन वागविले असेल किंवा जखमी केले, शोषण केले, पीडित केले, दुर्लक्षित केले, गैरफायदा घेतला किंवा क्षुब्ध केले असेल; किंवा
ख) मुलास (बालकास) ठार मारण्याची किंवा इजा पोहोचविण्याची किंवा त्याच्यासोबत दुव्र्यवहार करण्याची धमकी दिली असेल आणि त्या धमकीचे पालन केले जाण्याची वाजवी शक्यता असेल; किंवा
ग) इतर कोणत्याही मुलास किंवा मुलांना ठार मारले असेल, गैरफायदा घेतला असेल किंवा दुर्लक्षित केले असेल आणि त्या व्यक्तीकडून संदर्भित मुलाच्या बाबतीत ठार मारण्याची, गैरफायदा घेतला जाण्याची किंवा दुर्लक्षित केले जाण्याची वाजवी शक्यता असेल; किंवा
चार) जे मानसिकदृष्ट्या आजारी आहे किंवा शारीरिक दृष्ट्या किंवा मानसिक दृष्ट्या असुविधाग्रस्त आहे किंवा जे जीवघेण्या किंवा असाध्य रोगाने ग्रासले आहे, ज्याला कोणाचाही आधार नाही किंवा कोणी काळजी घेणारे नाही किंवा ज्यांचे माता-पिता किंवा पालक काळजी घेण्यास असमर्थ आहेत, असे मूल जर मंडळाला (बोर्डाला) आढळले किंवा समितीला आढळले तर; किंवा
पाच) ज्यांचे माता-पिता किंवा पालक हे मंडळाला किंवा समितीला, मुलाची काळजी घेण्यास व संरक्षण करण्यास आणि मुलाचे भले करण्यास अयोग्य किंवा असमर्थ असल्याचे आढळले आहे; किंवा
३.(सहा) ज्यांचे माता-पित नाही आणि ज्यांची काळजी आणि संरक्षण करण्यास कोणीही इच्छुक नाही किंवा ज्याच्या मात्यापित्यांनी त्यांचा परित्याग केला आहे किंवा सोडून दिले आहे;) किंवा
सात) जे हविलेलेले किंवा पळून आलेले मूल आहे किंवा ज्याची विहित पद्धतीने वाजवी चौकशी केल्यानंतरही त्याच्या माता किंवा पित्याचा शोध लागू शकला नाही; किंवा
आठ) ज्याचे लैंगिक दुरुपयोगाच्या प्रयोजनासाठी किंवा अवैध कृत्यांसाठी, दुव्र्यवहार, छळ किंवा शोषण केले जात आहे किंवा केले जाण्याची शक्यता आहे; किंवा
नऊ) जे दुबळे (असहाय) असल्याचे आढळून आहे आहे आणि ज्यास अंमली पदार्थाच्या दुरुपयोगासाठी किंवा अपव्यापारात ४.(गुंतवले आहे किंवा गुंतवले जात आहे किंवा गुंतवले जाण्याची शक्यता आहे;) किंवा
दहा) ज्याचा गैरवाजवी लाभासाठी दुरुपयोग केला जात आहे किंवा केला जाण्याची शक्यता आहे; किंवा
अकरा) जे कोणत्याही सशस्त्र संघर्षाचा, नागरी विक्षोभाचा किंवा नैसर्गिक आपत्तीस बळी पडले आहे; किंवा
बारा) ज्यावर लग्नाचे वय होण्यापूर्वीच लग्नाची न पेलणारी जोखीम येऊन पहलेली आहे आणि असा लग्नसोहळा पार पाडण्यास ज्याचे माता-पिता कुटूंबातील सदस्य, पालक आणि इतर कोणतीही व्यक्ती जबाबदार आहे,
असा आहे;
१५) मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध याचा अर्थ, कोणतीही वर्तणूक, वागणे, सराव, प्रक्रिया, दृष्टिकोन, पर्यावरण किंवा उपचार की जी मानवी, सहृदय विचारात घेण्यास योग्य आणि मुलाचे सर्वोत्तम हिताची असेल, असा आहे;
१६) मूल (बालक) दत्तकग्रहणास (दत्तकविधानास) कायद्याने स्वतंत्र असणे याचा अर्थ, कलम ३८ अन्वये समितीने चौकशी करुन अशा रीतीने जाहीर केलेले मूल, असा आहे;
१७) बाल कल्याण अधिकारी याचा अर्थ, यथास्थिति, जो बालगृहाशी समितीने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यासाठी ५.(बालक देखरेख संस्थेशी) संलग्न आहे किंवा मंडळाने (बोर्डाने) अशी जबाबदारी पार पाडण्यासाठी, अधिसूचित केलेला अधिकारी, असा आहे;
१८) बाल कल्याण पोलीस अधिकारी याचा अर्थ कलम १०७ च्या पोटकलम (१) अन्वये पदनिर्देशित केलेला अधिकारी, असा आहे;
१९) बाल गृह म्हणजे कलम ५० मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या प्रयोजनासाठी नोंदविलेले आणि राज्य सरकार द्वारा स्वत: होऊन किंवा स्वयंसेवी किंवा अशासकीय संस्थेद्वारे प्रत्येक जिल्ह्यात किंवा जिल्ह्यांच्या गटामध्ये स्थापित केलेले किंवा चालविलेले बालगृह होय;
२०) बाल न्यायालय म्हणजे आयोगाच्या बाल हक्क संरक्षण अधिनियम २००५ (२००६ चा ४) अन्वये स्थापित केलेले न्यायालय किंवा लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण अधिनियम २०१२ (२०१२ चा३२) अन्वये स्थापित केलेले विशेष न्यायालय, जेथे अस्तित्वात आहेत तेथे आणि जेथे कोठे अशी न्यायालये पदनिर्देशित केलेली नसतील तेथे उपरोक्त अधिनियमान्वये सत्र न्यायालयांच्या अधिकरितेमधील परिक्षेत्रामध्ये संबंधित अपराधांचा निवाडा करण्यात येतो असे न्यायालय;
२१) मुलांची देखरेख (काळजीवाहू) संस्था म्हणजे बालगृह, निवारागृह, निरीक्षणगृह, विशेषगृह, सुरक्षित जागा, विशेष दत्तकग्रहण (दत्तकविधान) अभिकरण आणि या अधिनियमान्वये मान्यताप्राप्त यथायोग्य सोयीसुविधा असलेली मुलांजी देखरेख (काळजी) आणि संरक्षणाची गरज पुरविणारी संस्था;
२२) समिती याचा अर्थ, कलम २७ अन्वये घटित केलेली बाल कल्याण समिती, असा आहे;
२३) न्यायालय म्हणजे असे दिवाणी न्यायालय ज्याला दत्तकग्रहण (दत्तकविधान) आणि पालकत्व (संरक्षकता) या बाबतीत अधिकारिता दिलेल्या असून त्यामध्ये जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, शहर पातळीवरीची दिवाणी न्यायालये यांचा अंतर्भाव होतो;
२४) शारीरिक दंड म्हणजे कोणत्याही व्यक्तीने एखाद्या बालकाला कोणत्याही अपराधासाठी सदृष्ट मूर्त देहास मुद्दाम होऊन किंवा शिस्त लागावी या हेतूने किंवा मन बदलावे यासाठी वेदना स्वरुपात दंड देणे;
२५) बालकल्याण सेवा म्हणजे अडचणीतील किंवा संकटग्रस्त बालकांसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणारी २४ तास आणीबाणी सेवा, जी आकस्मिक किंवा जी दुरस्थ काळजी आणि पुनर्वसनाच्या सेवा पुरविते;
२६) जिल्हा बाल संरक्षण एकक (युनिट) म्हणजे कलम १०६ अन्वये राज्य सरकार द्वारा, जिल्ह्यासाठी एक बालसंरक्षण एकक (युनिट), जे जिल्ह्यामध्ये या अधिनियमाच्या निग्रहाने (क्रियान्वयण) अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आणि जिल्ह्यातील बालसंरक्षणाचे बाबतीत व इतर उपाय ६.(करण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी यांच्या देखरेखीखालील काम करणारे) स्थापित केले आहे;
७.(२६क) जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या अंतर्गत जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी देखील आहेत;)
२७) योग्य (उचित) सुविधा म्हणजे कलम ५१ च्या पोटकलम (१) अन्वये कथित हेतूसाठी उचित (योग्य) अशी, यथास्थिती, समिती किंवा मंडळाने (बोर्डाने) मान्यता दिलेली कोणत्याही सरकारी संघटनाने किंवा आस्थापनाने चालविलेली किंवा मान्यताप्राप्त स्वयंसेवी किंवा अशासकीय आस्थापनेने चालविलेली, विशिष्ट हेतूने त्या विशिष्ट मुलाची तात्पुरती जबाबदारी स्वीकारण्यास तयार केलेली सुविधा;
२८) योग्य व्यक्ती याचा अर्थ, एका विशिष्ट हेतूने मुलाची जबाबदारी घेण्यास तयार आहे आणि मुलास ताब्यात घेण्यासाठी आणि त्याची काळजी (देखरेख) घेण्यासाठी जी या हेतूने चौकशीअंती योग्य असल्याचे अशा सक्षम प्राधिकरणास, यथास्थिती समिती किंवा मंडळास आढळून आले आहे अशी कोणतीही व्यक्ती, असा आहे;
२९) पोषणकर्ता म्हणजे समितीने मुलाची पर्यायी काळजी घेण्याच्या हेतूने निवडलेल्या, योग्यता किंवा अर्हताप्राप्त, मान्यताप्राप्त आणि पर्यवेक्षित अशा कुटूंबाच्या घरगुती वातावरणणामध्ये नेमणूक करणे की जे कुटूंब त्याच्या जैविक कुटूंबापेक्षा वेगळे आहे;
३०) पोषणकर्ते कुटूंब याचा अर्थ कलम ४४ अन्वये संगोपनासंबंधी काळजी घेण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण गट (युनिट) यांस योग्य असल्याचे आढळले आहे असे कुटूंब, असा आहे;
३१) पालक म्हणजे मुलाशी संबंधित त्याचे नैसर्गिक पालक किंवा समितीच्या किंवा मंडळाच्या मते, यथास्थिती, इतर कोणतीही व्यक्ती की जी या प्रक्रियाकाळात त्या मुलाचा प्रत्यक्ष ताबा घेते आणि जे समिती किंवा मंडळाला मान्य आहे;
३२) पोषणकर्ता गट म्हणजे कुटूंबवत आणि संप्रदाय अधिष्ठित (समस्या) उकल करण्यासाठी, काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या परंतु माता पित्यांच्या काळजीविना असलेल्या मुलांना वैयक्तिक काळजी आणि संगोपन करण्याच्या संवेदनेने आणि ओळख देण्याचा हेतू पुरविण्यासाठी कुटूंबासारखी काळजी घेण्याची सुविधा देणे;
३३) भयंकर अपराध यामध्ये भारतीय दंड संहिता किंवा त्या त्याकाळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यानुसार कारावासाची किमान शिक्षा सात वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी कारावास अशी आहे;
३४) आंतरदेशीय दत्तकग्रहण (दत्तकविधान) म्हणजे भारतातील मुलाचे अनिवासी भारतीय किंवा मूळचा विदेशी व्यक्तीकडून झालेले दत्तकग्रहण (दत्तकविधान);
३५) बालक म्हणजे अठरा वर्षे वयाच्या आतील मूल;
३६) अंमली औषधिद्रव्य आणि मन:प्रभावी प्रदार्थ या शब्दांना अमली औषधीद्रव्य व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ (१९८५ चा ६१) यामध्ये अनुक्रमे जो अर्थ नेमून देण्यात आला आहे, तोच अर्थ येथे असेल;
३७) नाहरकत प्रमाणपत्र म्हणजे केन्द्रीय दत्तकग्रहण संसाधन प्राधिकरणाकडून कथित हेतूसाठी आंतरदेशी दत्तकग्रहणासाठी (दत्तकविधानासाठी) देण्यात आलेले प्रमाणपत्र;
३८) अनिवासी भारतीय म्हणजे जो भारतीय पारपत्रधारक (पासपोर्टधारक) आहे आणि सध्या एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी देशाबाहेर राहत आहे;
३९) अधिसूचना म्हणजे भारत सरकारच्या किंवा यथास्थिति राज्य सरकारच्या राजपत्रामध्ये अधिसूचना म्हणून प्रकाशित केलेले आणि येणेप्रमाणे यथोचित जाहीर व्हावे म्हणून कळविलेले परिपत्रक किंवा अधिसूचना होय;
४०) निरीक्षण गृह म्हणजे कलम ४७ च्या पोटकलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या प्रयोजनासाठी (हेतूसाठी) प्रत्येक जिल्ह्यात किंवा जिल्ह्यांच्या गटामध्ये स्वत: राज्य सरकार कडून किंवा स्वयंसेवी किंवा अशासकीय संस्थेकडून स्थापित केलेले आणि चालविलेले तसेच अधिकृत नोंदणी केलेले निरीक्षण गृह होय;
४१) निवारा गृह (खुला निवारा) म्हणजे कलम ४३ च्या पोटकलम (१) अन्वये त्यामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या प्रयोजनासाठी (हेतूसाठी) अधिकृत नोंदणी केलेले राज्य सरकारने स्वत: किंवा स्वयंसेवी किंवा अशासकीय संस्थेकडून स्थापन केलेले व चालविलेले मुलांच्या सुविधेचे स्थान होय;
४२) अनाथ म्हणजे असे मूल (बालक) की, –
एक) जे जैविक माता-पिता किंवा दत्तकग्रहणकृत किंवा कायदेशीर पालकाविना आहे; किंवा
दोन) ज्याचा कायदेशीर पालक त्याला घेण्यास किंवा देखरेख करण्यास इच्छुक नाही किंवा त्या बालकाची काळजी घेण्यास सक्षम नाही;
४३) विदेशी भारतीय नागरिक म्हणजे जी व्यक्ती, नागरिकत्व अधिनियम १९५५ (१९५५ चा ५७) अन्वये नोंदणीकृत आहे;
४४) मूळ भारतीय व्यक्ती म्हणजे ज्याचे वंशपरंपरागत पूर्वज भारतात होते किंवा जो भारत देशाचा नागरिक होता आणि जो सध्या केन्द्र सरकाचे मूळ भारतीय म्हणून दिलेले पत्र (पर्सन ऑफ इंडियन ओरिजन कार्ड) धारण करतो;
४५) क्षुल्लक (छोट) अपराध यामध्ये भारतीय दंड संहिता १९६० (१८६० चा ४५) किंवा त्या त्या काळी अमलात असलेल्या इतर कायद्यानुसार कारावासाची कमाल शिक्षा तीन वर्षपर्यंताचा कारावास अशी आहे याचा अंतर्भाव होतो;
४६) सुरक्षित ठिकाण म्हणजे असे कोणतेही ठिकाण किंवा संस्था, पोलीस ठाने किंवा तुरुंग नसलेली, की जी वेगळी स्थापित केलेली आहे किंवा निरीक्षणगृहाशी जोडलेली आहे किंवा यथास्थिती विशेष गृह आहे, ८.(की जी एखाद्या आरोपित किंवा कायद्याशी संघर्ष करणाऱ्या बालकाचा, यथास्थिती, मंडळ किंवा बालन्यायालय यांचेकडून आदेशाद्वारे चौकशीमध्ये किंवा आदेशात यथाविनिर्दिष्ट कालावधीसाठी अपराधी म्हणून आढळलेले आहे, त्या पश्चात पुढील पुनर्वसनाच्या कालावधीत स्वीकार करील आणि त्याची काळजी घेईल;)
४७) विहित म्हणजे या अधिनियमान्वये तयार केलेल्या नियमांनुसार विहित होय;
४८) पर्यवेक्षण अधिकारी म्हणजे अपराधी पर्यवेक्षण अधिनियम १९५८ (१९५८ चा २०) अन्वये राज्य सरकारने पर्यवेक्षण अधिकारी म्हणून नेमणूक केलेला अधिकारी किंवा राज्य सरकारचा जिल्हा बाल संरक्षण गटाने (युनिटने) नेमणूक केलेला, कायदा व पर्यवेक्षण अधिकारी होय;
४९) भावी दत्तकग्रहण (दत्तकविधान) पालक म्हणजे कलम ५७ च्या तरतुदींनुसार जी व्यक्ती किंवा ज्या अनेक व्यक्ती ते मूल दत्तक घेण्यास पात्र आहेत;
५०) सार्वजनिक ठिकाण या शब्दाला, अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ (१९५६ चा १०४) यामध्ये जो अर्थ नेमून दिला असेल, तोच अर्थ असेल;
५१) नोंदणीकृत म्हणजे कलम ४१ अन्वये अधिकृत व नोंदणीकृत तात्पुरत्या किंंवा दूरच्या काळापर्यंत मुलांना राहण्याची काळजी घेण्याची सेवा पूरविण्याच्या तत्वावर असेलेली निरीक्षण गृहे, विशेष गृहे, सुरक्षिततेचे ठिकाण, बालगृहे, खुली निवास स्थाने, विशेषकृत दत्तकग्रहण अभिकरण (एजन्सी) किंवा योग्य सुविधा किंवा इतर कोणतीही संस्था की जी विशिष्ट गरजेपोटी तयार केली गेलेली आहे किंवा मुलांची काळजी घेणारी अशी अभिकरणे किंवा सुविधा की ज्या राज्य सरकारने किंवां स्वयंसेवी किंवा अशासकीय संस्थांनी चालविली आहेत;
५२) नातेवाईक म्हणजे मुलासंबंधी दत्तकग्रहणाच्या प्रयोजनासाठी (हेतूसाठी) म्हणजे पैतृक काका-काकू किंवा मातृक मामा-मामी किंवा वडीलांकडून आजी – आजोबा किंवा आईकडून आजी-आजोबा होय;
५३) राज्य अभिकरण म्हणजे कलम ६७ अन्वये दत्तकग्रहण (दत्तकविधान) आणि संबंधित बाबींसाठी काम करणारी राज्य शासनाने उभी केलेले राज्य दत्तकग्रहण (दत्तकविधान) संसाधन अभिकरण (एजन्सी) होय;
९.(५४) गंभीर अपराध यामध्ये भारतीय दंह संहिता किंवा त्या त्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यानुसार,-
क) कारावासाची किमान शिक्षा तीन वर्षेपेक्षा कमी नाही परंतु सात वर्षापर्यंत इतक्या कालावधीसाठी असू शकेल, अशी आहे; किंवा
ख) सात वर्षापेक्षा जास्त कारावासाची तरतुद आहे परंतु किमान कारावासाची किंवा सात वर्षापेक्षा कमी कारावासाची तरतुद नाही, अशी आहे;)
५५) बालकासाठी विशेष पोलीस पथक म्हणजे कलम १०७ अन्वये मुलांना हाताळण्यासाठी पदनिर्देशित केलेले जिल्ह्याचे वा शहराचे किंवा यथास्थिती इतर कोणतेही पोलीस पथक जसे रेल्वे पोलीस;
५६) विशेष गृह म्हणजे राज्य सरकारकडून कलम ४८ अन्वये किंवा स्वयंसेवी किंवा अशासकीय संस्थेकडून स्थापित व नोंदणीकृत संस्था, की जी कायद्याशी संघर्ष करणाऱ्या मुलांना राहत्या घराची आणि पुनर्वसनाची सेवा पुरविते की जी मंडळाच्या आदेशाने चौकशीद्वारे अपराध केल्यानंतर अशा संस्थेकडे पाठविली जातात;
५७) विशेष दत्तकग्रहण अभिकरण (एजन्सी) म्हणजे जी राज्य सरकारने किंवा अशासकीय संस्थेने स्थापन केलेली आणि कलम ६५ अन्वये दत्तकग्रहणाच्या (दत्तकविधानाच्या) प्रयोजनासाठी (हेतूने) समितीच्यया आदेशाने अनाथ, परित्यक्त आणि सोडून दिलेल्या मुलांना अधिकृत राहण्यासाठी ठरवून दिलेली, अशी एक संस्था;
५८) पुरस्कृत करणे किंवा प्रायोजित करणे म्हणजे मुलाच्या वैद्यकीय, शैक्षणिक आणि विकासा संबंधी गरजा भागविण्यासाठी त्याच्या कुटूंबाला पूरक असा आधार देणे किंवा आर्थिक किंवा अन्य प्रकारे सहाय्याची तरतूद करणे;
५९)राज्य सरकार म्हणजे संघ राज्य क्षेत्राच्या संबंधात घटनेच्या अनुच्छेद २३९ अन्वये राष्ट्रपतींनी नेमलेला संघ राज्यक्षेत्राचा प्रशासक होय;
६०) अभ्यर्पित (सोडून दिलेले) मूल म्हणजे मातापित्यांनी किंवा पालकांनी आपल्या नियंत्रणाबाहेरील शारीरिक, भावनिक आणि सामाजिक घटक, कारणांसाठी समितीकडे सोपवून सोडून दिलेले आणि तसे समितीने जाहीर केलेले मूल;
६१) या अधिनियमात वापरलेले परंतू व्याख्या न केलेले सर्व शब्द आणि शब्दप्रयोग यांना अनुक्रमे त्या त्या संहितेमध्ये नेमून दिलेल्याप्रमाणे अर्थ असतील.
———
१. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम २ द्वारा खंड (४) वगळण्यात आला.
२. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम २ द्वारा समाविष्ट करण्यात आले.
३. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम २ द्वारा उपखंड (सहा) ऐवजी समाविष्ट केले.
४. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम २ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले.
५. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम २ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले.
६. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम २ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले.
७. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम २ द्वारा खंड (२६क) समाविष्ट केला.
८. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम २ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले.
९.२०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम २ द्वारा खंड (५४) ऐवजी समाविष्ट केला.